पाण्याची टंचाई, कोरडे हवामान आणि अडचणींनी भरलेली शेती… पण बीड जिल्ह्यातील परमेश्वर थोरात यांनी या सगळ्यावर मात करत एक अनोखी वाट निवडली ती अव्होकॅडोची शेतीची ! परदेशात गाजणाऱ्या या ‘अव्होकॅडो’ फळाची शेती महाराष्ट्रात करून त्यांनी शेतकऱ्यांसमोर नवा मार्ग उभा केला. फक्त 1.75 एकरात 1,200 किलो उत्पादन घेतले. आज ते अव्होकॅडो रोपविक्रीतून प्रति एकर 10 लाख रुपयांचा नफा कमवत आहे.

बीड जिल्हा, जो मराठवाड्याच्या मध्यभागी वसलेला आहे, हा कमी पावसाचे प्रमाण आणि सातत्याने खालावत जाणारी भूगर्भातील पाणी पातळी यामुळे ओळखला जातो. या भागात पारंपरिक शेती विशेषतः ज्या पिकांना भरपूर पाणी लागते, ती फारशी यशस्वी होत नाही. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीतही परमेश्वर थोरात यांनी पारंपरिक पिकांऐवजी अव्होकॅडो शेतीचा धाडसी निर्णय घेतला. “माझ्या भागात कोणीही हे पीक घेत नव्हते, म्हणून काहीतरी वेगळे आणि नाविन्यपूर्ण करायचे ठरवले,” असे ते आत्मविश्वासाने सांगतात.

पोषणमूल्यांनी भरलेले अव्होकॅडो
अव्होकॅडो हे फळ भारतात आणि विशेषतः मराठवाड्यासारख्या भागात अद्याप नवीन मानले जाते. मात्र, यामध्ये असलेली उच्च पोषणमूल्ये, तसेच हृदयविकार, मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणासाठी होणारे फायदे पाहता, या फळाला हळूहळू बाजारात चांगली मागणी निर्माण होत आहे. “मी यावर सखोल अभ्यास केला आणि लक्षात आले की हे पीक फक्त माझ्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण भागासाठी एक सकारात्मक परिवर्तन घडवू शकते,” असे परमेश्वर थोरात आत्मविश्वासाने सांगतात.
अव्होकॅडोची मिळाली माहिती
परमेश्वर थोरात हे शेतकरी कुटुंबातून आले आहेत. परमेश्वर यांनी शेती डिप्लोमा केला. डिप्लोमा केल्यानंतर त्यांनी आधुनिक शेतीची कास धरत शेतीत आपले ज्ञान वाढवले. आज ते त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत शेती करत आहेत. शेतीत काहीतरी वेगळे करून दाखवायचे त्यांनी ठरवले होते. 2018 साली दक्षिण भारताच्या एका प्रवासात परमेश्वर थोरात यांना ‘अर्का सुप्रीम’ या अव्होकॅडोच्या विशिष्ट जातीबद्दल माहिती मिळाली. या जातीची खासियत म्हणजे ती उष्ण व कोरड्या हवामानात, तब्बल 40 ते 45 अंश सेल्सिअस तापमानातही सहज फळधारणा करू शकते. हीच क्षमता पाहून त्यांनी कर्नाटकातून अवघ्या 50 रोपांची मागणी करून आपल्या प्रयोगाची सुरुवात केली.

पाण्यासाठी शेततळे केले तयार
“बीडमध्ये कुणालाही अव्होकॅडोची माहिती नव्हती. त्यात हवामान उष्ण, पाण्याची टंचाई – पण परमेश्वर थोरात यांनी हार मानली नाही. त्यांनी प्रथम 0.75 एकर जमिनीत 2 फूट खोल खड्डे घेऊन त्यात शेणखत भरले, माती सुधारण्यावर भर दिला. त्यानंतर ठिबक सिंचन प्रणाली बसवून पाणी थेट मुळांपर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था केली. पावसाचे पाणी साठवण्यासाठी शेततळे तयार करून ते मार्च-एप्रिलमध्ये सिंचनासाठी वापरण्याची शाश्वत योजना केली.” परमेश्वर यांनी अव्होकॅडोची लागवड केली आणि 2021 मध्ये पहिल्यांदा अव्होकॅडोचे फळ मिळाले. 2022 मध्ये त्यांनी प्रत्यक्ष विक्रीला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी 200 रुपये प्रति फळ असा दर ठेवत जवळपास 3 लाख रुपयांचा नफा मिळवला. “सुरुवातीला लोकांना अव्होकॅडो माहीतच नव्हते. मी त्यांना मोफत नमुने दिले आणि मगच त्यांचे कुतूहल वाढले. त्यामुळे मागणी आपोआप तयार झाली,” असे ते सांगतात.

जैविक शेतीकडे वळण्याचा निर्णय
सुरुवातीला रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर करणाऱ्या परमेश्वर यांनी नंतर जैविक शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. गोठ्याचे खत, नैसर्गिक पद्धतीने कीटक नियंत्रणामुळे उत्पादनाचा दर्जा वाढला. “फळांचा स्वाद अधिक चांगला झाला आणि ते आठवडाभर फ्रिज शिवाय टिकतात,” असे सिस्टर अॅनी सांगतात, ज्यांनी परमेश्वर थोरात जैविक शेतीकडे वळवण्यास मदत केली. ग्राफ्टिंग (कलम जोडणी) तंत्र वापरून त्यांनी 2022 मध्ये 250 नवीन झाडांची लागवड केली. प्रत्येक झाडासाठी सुमारे 100 रुपये खर्च आला. ग्राफ्टिंगमुळे झाडांचे आरोग्य सुधारते आणि उत्पादनक्षमता वाढते. हे कलम त्यांनी तामिळनाडू येथून मागवले. कर्नाटकचे निवृत्त पोस्ट कर्मचारी कृष्णा यांनी त्यांना झाडे पुरवली. ते कन्नड बोलत नसल्यानेच आमची भेट झाली आणि मी त्यांना सर्व माहिती समजावून सांगितली. कृष्णा सांगतात, आज माझी झाडे फळे देत नाहीत, पण परमेश्वर यांची शेती तेजीत आहे.
प्रति एकर 10 लाखांचा नफा
आज परमेश्वर थोरात यांची अव्होकॅडो शेती 1.75 एकरवर विस्तारली असून, सुमारे 300 झाडे आहेत. 2023 मध्ये त्यांनी 1,200 किलो फळे विकून 5-6 लाखांचा नफा, तसेच 2,300 रोपांची विक्री करून 4 ते 6 लाखांचा नफा कमावला. एकूण मिळून प्रति एकर सुमारे 10 लाख रुपयांचा निव्वळ नफा त्यांनी मिळवला. मी आता माझी अव्होकॅडोची फळे दिल्ली, मुंबई, पुणे व बीडमध्ये विकण्याचं उद्दिष्ट ठेवले आहे. त्याचबरोबर इतर शेतकऱ्यांना देखील अव्होकॅडो शेतीची माहिती देतो, असे ते सांगतात. अव्होकॅडो शेती केवळ नफा देणारीच नाही, तर समाजासाठी आरोग्यदायी आहे, असेही ते सांगतात.
संपर्क :-
परमेश्वर थोरात
7875185032













