शेतकऱ्यांनी एकत्र येत केलेला अभिनव प्रयोग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सांगली येथील कृष्णा ब्लूम शेतकरी ग्रुपमधील शंभरहून अधिक शेतकऱ्यांनी राईस एन शाईन बायोटेक प्रा. लि. या कंपनीकडून ब्लू जावा या विदेशी केळीच्या वाणाची 100 एकर क्षेत्रावर लागवड केली आहे. सध्या या केळीची यशस्वी हार्वेस्टिंग सुरू असून पनेट पॅकिंगद्वारे 500 ग्रॅम केळी 50 रुपये दराने विक्री केली जात आहे.
भारतात सर्वात दुर्मिळ आणि परदेशी केळी वाण म्हणून ओळखली जाणारी ब्लू जावा केळी आता देशांतर्गत पातळीवर यशस्वीरीत्या पिकवली जात आहे. या केळीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे तिची नैसर्गिक निळसर छटा असलेली साल, तसेच आइसक्रीमसारखी मऊ आणि गोड चव. संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन करण्यात आलेली ही केळी साध्या पारंपरिक केळ्यांच्या तुलनेत अधिक पोषक घटकांनी समृद्ध आहे.
![]()
राईस एन शाईनकडून ब्लू जावा केळीच्या रोपांची खरेदी
कृष्णा ब्लूम शेतकरी ग्रुपमध्ये शंभरहून अधिक शेतकऱ्यांचा समावेश असून, या ग्रुपने एकत्र येत ब्लू जावा या विदेशी केळीच्या रोपांची 100 एकर क्षेत्रावर लागवड केली आहे. या लागवडीसाठी ब्लू जावा केळीचे रोपे राईस एन शाईन बायोटेक प्रा. लि. या कंपनीकडून घेण्यात आले आहे. सध्या या केळीची हार्वेस्टिंग सुरू असून, नुकत्याच पार पडलेल्या एका कृषी प्रदर्शनात ब्लू जावा केळीला 100 रुपये प्रति किलो असा दर मिळाला आहे, अशी माहिती शेतकरी रामचंद्र विठ्ठल पवार यांनी ॲग्रोवर्ल्डशी बोलताना दिली. कृष्णा नदीच्या सुपीक पट्ट्यात पहिल्यांदाच 100 एकरांवर ब्लू जावा केळीची लागवड करण्यात आली असून, या संपूर्ण प्रकल्पासाठी राईस एन शाईन बायोटेक प्रा. लि. यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले आहे.

आज ब्लू जावा केळी सांगलीच्या बाजारात नव्या स्वादाची आणि वेगळ्या ओळखीची छाप उमटवत आहेत. देशभरातील ग्राहक, फळप्रक्रिया उद्योग तसेच प्रीमियम मार्केट्सकडून या केळ्यांना उत्स्फूर्त आणि उत्कृष्ट प्रतिसाद मिळू लागला आहे. तज्ज्ञांच्या मते, “सांगली जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या ब्लू जावा केळीमुळे शेतकऱ्यांना थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडले जाण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.” हे यश केवळ एका पिकाचे नसून, सांगलीतील प्रगतशील शेतकऱ्यांच्या अथक मेहनत, नवकल्पनांचा स्वीकार आणि आधुनिक शेती व्यवस्थापनाच्या प्रभावी अंमलबजावणीचे प्रतीक आहे.

नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही दिली भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच ब्लू जावा केळीला भेट देत या अनोख्या केळी वाणाविषयी सविस्तर माहिती घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी “ही कोणती व्हरायटी आहे? कोणत्या देशातून आणली आहे? रोपे कुठे तयार करण्यात आली आहेत आणि या केळीचे खास वैशिष्ट्य काय आहे?” असे प्रश्न विचारले. यावर माहिती देताना शेतकऱ्यांनी सांगितले की, ब्लू जावा ही इंडोनेशियामधील केळीची व्हरायटी असून ती भारतामध्ये यशस्वीरीत्या पिकवण्यात आली आहे. या केळीची रोपे पुणे येथील थेऊर परिसरातील राईस अँड शाईन बायोटेक कंपनीकडून तयार करण्यात आली असून, सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील कोठे मंगळ परिसरात 100 एकर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे ब्लू जावा केळी खाल्ल्यानंतर तिची साल फेकून दिली असता ती साधारण दोन तासांनंतर उन्हात पुन्हा निळसर रंग धारण करते, तर सामान्य केळीची साल फक्त सुकून जाते. हेच या केळीचे वेगळेपण ठरते.
ब्लू जावा फार्मर ग्रुप – Krishna Bloom FPO
संपर्क : रामचंद्र विठ्ठल पवार
मोबाइल: 7440407777
पत्ता: आट. मणेरी (Manerajuri), ता. तासगाव, जि. सांगली – 416408, महाराष्ट्र















