मुंबई – या वर्षी ईशान्य मान्सून हा नियमित नैऋत्य मान्सूनसारखाच वावरत असल्याने पाऊस जाता जायचे नाव घेत नव्हता. आता मात्र एकदाचा पाऊस जाणार आहे. उत्तर भारतात थंडीचा मोसम सुरू झाला असून महाराष्ट्रातही हवेत गारवा निर्माण झाला आहे. आता फक्त दक्षिण भारतात ईशान्य मान्सूनचे शेवटचे 3-4 पावसाळी दिवस राहिले आहेत त्या प्रभावातून राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण राहण्याचा व तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. मात्र, बहुतांश भागात कोरडे हवामान, स्वच्छ आकाश, दिवसभर उकाडा आणि पहाटे-रात्री थंडी राहण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविली आहे.

यंदा अभूतपूर्व जागतिक तापमानवाढीमुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात झाले आहे. ही अतिरिक्त आर्द्रता वाऱ्यांसोबत जोडली जात आहे आणि वाहून नेली जात आहे, ज्यामुळे अतिरिक्त पाऊस पडत आहे. पुढील 8-15 दिवस जवळजवळ 95% भारत पाऊसमुक्त राहण्याची शक्यता आहे. 12 ते 20 नोव्हेंबर दरम्यान बहुतांश देशभरातील हवामान खूप कोरडे राहण्याची शक्यता आहे. दक्षिण द्वीपकल्पातील काही भाग वगळता संपूर्ण भारतात आता पावसाळी उपक्रम जवळजवळ थांबले आहेत, ज्यामुळे कोरड्या खंडीय हवेला देशाच्या अनेक भागात प्रवेश करण्यास मार्ग मोकळा झाला आहे. फक्त केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये काही प्रमाणात पाऊस पडेल. उर्वरित भारतात हवामान उन्हाळी राहील, पाऊस आणि ढग राहणार नाहीत. मात्र, रात्रीचे तापमान घसरण्याची शक्यता आहे.

दक्षिण भारतात आज-उद्या मुसळधार पाऊस
आज तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, केरळ, माहे आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकमध्येही काही ठिकाणी विजांसह गडगडाटी वादळी वारे वाहतील. पुढील 48 तासांत मध्य भारतात किमान तापमान 2 ते 4 अंश सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता आहे.

देशभरात हवामान बदल
देशभरात हवामान बदल होत आहे. काही ठिकाणी पावसाचा इशारा तर काही ठिकाणी बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जम्मू, उत्तराखंड, हिमाचलमध्ये तुफान बर्फवृष्टीचा इशारा असून दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. येत्या 35 तासांत 9 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून जोरदार वादळाची शक्यता आहे. मणिपूर, मिझोरम, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सिक्कीम, मिझोरम आणि मध्य प्रदेशच्या काही भागात गडगडाटी वादळे आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, उत्तर भारतात थंडीचा जोर वाढला आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या शीतलहरी महाराष्ट्राच्या हावेवराही परिणाम करतील. पूर्वोत्तर भारताच्या काही भागात थंड वाऱ्यांसह आता पावसाचे दुहेरी संकट आहे. दिल्लीतील तापमान 10 ते 14 अंशांनी घसरले आहे. आज दिल्ली-एनसीआरवर विषारी धुराची चादर पसरली असून हवेची गुणवत्ता (एक्यूआय) 300 पर्यंत खालावली आहे. थंडी वाढल्याने शहरातील प्रदूषणही वाढत आहे..

महाराष्ट्रात ढगाळ वातावरण; हवेत गारवा
सध्या राज्याच्या किनारी भागात ढगाळ वातावरण असून हवेत गारवा निर्माण झाला आहे. निफाड (नाशिक) आणि महाबळेश्वरसह नागपूरमध्येही रात्री-पहाटेच्या तापमानात घट नोंदविली जात आहे. येत्या 24 तासांत कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हलक्या-मध्यम पावसाची शक्यता आहे. किनारपट्टी भागात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
सागरी वाऱ्यांच्या दिशेत बदल झाल्यास दक्षिण-मध्य महाराष्ट्र, कोल्हापूर आणि सातारा घाटमाथा परिसरात पावसाची शक्यता आहे. मुंबई-ठाण्यात वातावरण ढगाळ राहणार असून, हवेत गारवा जाणवू शकतो. एकूणच, महाराष्ट्राच्या काही भागात 1-2 दिवस अवकाळीचे सावट आणि बहुतांश भागात हिवाळ्याची चाहूल असे मिश्र वातावरण आहे. राज्यातून पाऊस पूर्णत: परतल्यानंतरच येत्या 2-3 दिवसात किमान तापमानात घट होऊन राज्यातील थंडीचा कडाका खऱ्या अर्थाने वाढणार आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.

















