मुंबई – बंगालच्या उपसागरात सलग दोन कमी दाब प्रणाली निर्माण होत आहेत. त्यामुळे कोकण, मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या अनेक भागात पुढील 5-6 दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे. गुरुवारपासून महिना अखेरपर्यंत पावसाचा जोर जास्त राहू शकेल, असा भारतीय हवामान विभागाचा (IMD) अंदाज आहे.

पाऊस पुन्हा सक्रीय
यंदा मान्सूनने सरासरी वेळेच्या तीन दिवस आधी म्हणजेच 14 सप्टेंबरलाच परतीची वाट धरली होती. मात्र, परतीचा प्रवास सलग असण्याऐवजी अडखळत सुरू आहे. पंजाब, राजस्थान, हरियाणा, गुजरातच्या काही भागातून माघारीनंतर परतीचा प्रवास लांबला आहे. त्यातच आता 24 सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्यातून पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे.
नव्या प्रणालीमुळे किमान 30 सप्टेंबरपर्यंत तरी राज्यातून पाऊस निरोप घेण्याची शक्यता नाही. बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकणार असल्याने राज्यातील विविध भागांमध्ये 24 ते 28 सप्टेंबर दरम्यान पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यातील पूर्व-दक्षिणेकडील भागांमध्ये दुपारनंतर पावसात वाढ होण्याची शक्यता आहे.

आज इथे मुसळधार
छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गंगीय पश्चिम बंगाल परिसरात आज, बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे. “आयएमडी”ने आज सकाळी दहा वाजता जारी केलेल्या अपडेटनुसार,x जळगाव, अमरावती, अकोला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
