Agriculture Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प मांडला. यामध्ये त्यांनी राज्यांच्या सहकार्याने पंतप्रधान धन धान्य कृषी योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान धन धान्य कृषी योजना राबवण्याची घोषणा केली आहे. ही योजना राज्यांच्या सहकार्याने राबवली जाईल आणि यामध्ये 100 जिल्ह्यांवर विशेष लक्ष दिले जाईल. या योजनेचा लाभ देशातील 1.7 कोटी शेतकऱ्यांना होईल, अशी माहिती अर्थमंत्री सीतारामन यांनी दिली आहे. याशिवाय, किसान क्रेडिट कार्डाची मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे. ही मर्यादा 3 लाख रुपये वरून 5 लाख रुपये केली गेली आहे, ज्यामुळे देशातील शेतकऱ्यांना मोठा फायदेशीर ठरणार आहे.
Agriculture Budget 2025 : शेती क्षेत्रासाठी विविध महत्त्वाच्या योजनांची घोषणा
दरम्यान, पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेबरोबरच, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26 च्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी विविध योजनांची घोषणा केली आहे. डाळींमध्ये ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्यासाठी सहा वर्षांच्या मिशनची घोषणाही त्यांनी केली आहे. याचप्रमाणे कृषी क्षेत्राला आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी विशेष लक्ष दिले जाणार आहे.
फळ आणि भाजी उत्पादनासाठी एक विशेष योजना राबवली जाईल, तसेच कापसाच्या उत्पादन वाढवण्यासाठी 5 वर्षांचा मिशन सुरू करण्यात येईल. कापसाच्या विविध जाती विकसित करण्यासाठी तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून कापूस उत्पादनाला चालना दिली जाईल. याशिवाय, किसान क्रेडिट कार्डसाठी शेतकऱ्यांना 3 लाख रुपये वरून 5 लाख रुपये देण्यात येणार आहेत. याशिवाय, देशात 3 नवीन युरिया प्लॅंट उभारण्यात येणार आहेत, जे युरीया निर्मितीत आत्मनिर्भरता आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.