दीपक देशपांडे, पुणे
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुका मुळशी पॅटर्न सिनेमामुळे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झाला. मुळशी तालुका हा अत्यंत दुर्गम भागात असून आजूबाजूने डोंगर, काही महत्त्वाच्या नद्या वाहत असतात. मुळशी तालुक्याच्या अर्ध्या भागात मार्च एप्रिल मे महिन्यात पाण्याची टंचाई तीव्रतेने जाणवते. तसेच या भागातील अनेक शेतकरी अत्यावश्यक विकसक कामाला मान्यता देताना मोठे रस्ते किंवा इंडस्ट्री याला मात्र विरोध करताना दिसून येतात. त्याचे महत्त्वाचे एकच कारण म्हणजे येथील शेतकरी मोठे जमीनदार नाही. कोणताही शेतकरी एक एकर क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र असलेला नाही. आपल्या शेतामधील किती गुंठे जमीन माझी आहे हे सांगताना त्यांचे मन अभिमानाने भरून येते. अशाच या मुळशी तालुक्यातील केमसेवाडी जवळी जवळगाव येथील एका दूध उत्पादकाची यशोगाथा आपण आज पाहणार आहोत.
रोहिदास हरिभाऊ केमसे 42 वर्ष वय असलेले हे जवळगाव, केमसेवाडी जवळील पोस्ट रिहे तालुका मुळशी येथे राहतात. त्यांचे शिक्षण फक्त दहावी उत्तीर्ण. आई-वडिलांसह दोन भावाचे एकत्र कुटुंब असलेल्या या कुटुंबाकडे एकूण तीन एकर जमीन असो.. रोहिदास यांच्या वाटणीला फक्त 35 गुंठे जमीन आली आहे. सध्या त्यांच्या कुटुंबात त्यांच्या पत्नी मनीषा, मुलगा चिरंजीव आर्यन व मुलगी कुमारी आर्या असेच चार जण राहतात. वडिलोपार्जित जमिनीत गहूचाळ, हरभरा तर खरिपात इंद्रायणी भात, रत्ना व हळदी ही पिके घेऊन संपूर्ण कुटुंबाची एकत्र बेगमी होत आहे. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर रोहिदास यांनी सहा सीटर गाडी चालवण्याचा व्यवसाय सुरू केला. कारण, बारा जणांच्या एकत्र कुटुंबात अडीच एकर शेतातील पिकावर वर्षभर काढणे कठीण होते. त्यामुळे रोहिदास यांनी सहा सीटर गाडी घेऊन प्रवासी उद्योग सुरू केला.
आणि दुग्ध व्यवसायाची मिळाली माहिती
प्रवासी वाहतूक करत असताना रोहिदास यांनी एका प्रवासीच्या तोंडून दुग्ध व्यवसायाविषयी ऐकले. काही शहरी भागातील जाणारे येणारे प्रवासी रोहिदास यांना म्हणत तुम्ही तुमच्या भागातील दूध गोळा करून आम्हाला दररोज द्या. आम्ही तुम्हाला त्या बदल्यात चांगली किंमत देऊ पण दुधाची प्रतवारी चांगलीच पाहिजे. यातून रोहिदास यांच्या मनात दुग्ध व्यवसाय करण्यासंदर्भात विचार सुरु झाले. मग रोहिदास यांनी 2001 मध्ये स्थानिक प्रजातीची एक म्हैस विकत घेतली. ही म्हैस दररोज 12 लिटर दूध द्यायची. त्यावेळी त्या दुधाचा दर विक्रीसाठी 25 रुपये लिटर होता. त्यातून त्यांना या व्यवसायाची चटक लागली व त्यांची पाळीमुळे आज खोलवर रुजलेली आहेत.
स्वखर्चातून उभा केला दुग्ध व्यवसाय
रोहिदास केमसे यांच्या मतानुसार, दररोजचे दूध उत्पादन दहा ते बारा हजार रुपयांचे होते. सकाळचे दूध नागरिकांना घरपोच केले जाते तर सायंकाळचे दूध डेअरीवर घातले जाते. दुधाचा व्यवसाय वाढविण्यासाठी त्यांनी गेल्या एक वर्षातून आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडून पन्नास रुपये लिटर प्रमाणे म्हशीचे शंभर लिटर दूध दररोज व गाईचे 32 रुपये लिटर प्रमाणे सुमारे 15 लिटर दूध दररोज खरेदी केले जाते व हे सर्व दूध ते त्यांच्या ग्राहकांना व डेअरीला नेऊन विक्री करतात. रोहिदास केमसे यांच्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नसून त्यांनी स्वखर्चातून संपूर्ण व्यवसाय उभा केला आहे. गेल्या दहा ते बारा वर्षात कृषी विभाग किंवा दुग्धोत्पादन विभाग यांच्यापैकी कोणीही या गावालाच भेट दिलेली नाही. त्यामुळे शासकीय योजनांचा या गावाला स्पर्श सुद्धा नाही.
दुग्ध व्यवसायातून वर्षाला लाखोंची कमाई
रोहिदास यांचा जमाखर्चाचा अंदाज द्यावयाचा झाला तर सर्व खाद्य खुराक व गड्यांचा रोजगार लागणारा वीजपुरवठा व इतर किरकोळ खर्च हा मासिक 2 लाख रुपयांच्या आसपास आहे तर त्यांना दुधापासून अंदाजे उत्पन्न 4 लाख 70 हजार रुपये महिना मिळते. या खर्चामध्ये गाडीला लागणारे इंधन त्यांचा व त्यांच्या मंडळीचा होणारा खर्च त्याचा समावेश केलेला नसून वर्षाला पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला देण्यात येणारे 50 हजार रुपये त्याचा खर्च सुद्धा समाविष्ट केलेला नाही. म्हणजेच एकूण अंदाज पाहता मासिक खर्च त्यांना तीन लाख रुपये होतो असा गृहीत धरला तरीही दीड लाख रुपये महिना त्यांना निवड नफा मिळतोच. असेच गृहीत धरले तर वार्षिक पंधरा लाख रुपयांची उत्पन्न आयटी सारख्या क्षेत्रात स्वकर्तृत्वाने निर्माण करणारी दूध उद्योग हा व्यवसाय त्यांच्यासाठी अत्यंत आनंददायी व यशदायी आहे असे म्हटले जाते तर वावगे ठरणार नाही.
तर शेती यशस्वी व आनंददायी ठरेल – रोहिदास केमसे
भविष्यात त्यांना पिरंगुट येथे स्वतःची डेअरी उभी करायची असून दुधापासून तयार झालेले सर्व पदार्थ व दूध विक्री डेअरीच्या माध्यमातून या परिसरात विक्री करावयाची आहे. त्याचबरोबर त्यांच्या भावाच्या शेतामध्ये घरातील महिला नित्य नियमित भाजीपाला उत्पादन करतात. या उत्पादनाला पिरंगुट येथील बाजारात चांगली मागणी असून त्यांचा भाजीपाला बाजारात जाताच दोन तासातच विक्री होतो. पण, हा पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला व अवीटचव असलेला भाजीपाला असतो. त्यामुळे अर्थातच दूध व्यवसाय व भाजीपाला व्यवसाय या माध्यमातून पिरंगुट येथे त्यांना चांगलेच यश मिळते आहे. नवीन तरुणांना विशेषतः शेतकरी तरुणांना संदेश देताना रोहिदास केमसे म्हणतात, शेतीचे प्लॅनिंग असणे आवश्यक असते. निसर्ग व त्याधुनिक तंत्रज्ञान यांची योग्य पद्धतीने सांगड घालून व एखादा पूरक उद्योग उभा करू नाविन्यपूर्ण पद्धतीने शेती केली तर ही शेती यशस्वी व आनंददायी ठरते. आपण त्यामध्ये कोणाचे मंदिर राहत नाही आणि आपला अमूल्य वेळ सुद्धा अत्यंत चांगल्या कामासाठी दिला जातो याचे समाधान लागते.
संपर्क :-
रोहिदास हरिभाऊ केमसे
रा. जवळगाव केमसेवाडी पो. रीहे,
ता. मुळशी, जि. पुणे.
मो. 8796238606