प्रत्येक आईला तिच्या मुलांनी निरोगी आणि तंदुरुस्त राहावे, असे वाटते. कविता देव ही अशीच एक आई आहे जी आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. आई होण्यापासून ते ‘मिलेट माँ’ होण्यापर्यंतचा प्रवास तिने आपल्या मेहनतीने पार पाडला. रायपूरच्या कविता देव ‘मिलेट माँ’ म्हणून ओळखल्या जात आहेत. त्या 12 एकर शेतात फळे, भाजीपाला आणि बाजारीचे उत्पादन तर घेतात त्यासोबतच बाजारीपासून डोसा, इडली, उपमा आणि प्रिमिक्स यासारखे अनेक पदार्थही बनवत आहेत.
मूळच्या विशाखापट्टणमच्या असलेल्या कविता या लग्नानंतर रायपूरला स्थित झाल्या. पण, एक सामान्य गृहिणीपासून ते आई होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास हा प्रेरणादायी आहे. वास्तविक, कविता आपल्या मुलांना सकस आहार देण्याबाबत आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत खूप जागरूक होत्या. ताज्या भाज्यांचे ज्यूस आणि हंगामी भाज्या मुलांना खायला देण्याचा त्यांचा नेहमीच आग्रह असायचा. पण, एका दिवशी रोजच्या प्रमाणेच त्यांनी मुलांसाठी भाजीचा रस बनवला. मुलांनी तो रस पिला नाही आणि लपवून ठेवला. संध्याकाळी कविता यांनी भरलेल्या ज्यूसच्या ग्लासकडे पाहिले तेव्हा त्यांना त्यात तेलाचा थर दिसला. त्यांनी याची तपासणी केली असता ते तेल नसून केवळ भाजीपाल्यामध्ये केमिकल असल्याचे आढळून आले. जे कविता यांना निरोगी वाटत होते तेच खरे विष आहे आणि इथूनच त्याच्या आयुष्यात मोठा बदल झाला.
या घटनेनंतर त्यांनी ज्यूस बनवणे बंद केले आणि सेंद्रिय भाज्या पिकवायला सुरुवात केली. कविता यांनी एका कार्यशाळेत भाग घेतला आणि तिथे त्यांनी टेरेस गार्डनिंगची माहिती घेतली. यानंतर त्यांनी त्यांच्या बागेत सेंद्रिय भाजीपाला पिकवायला सुरुवात केली. सुमारे चार वर्षे टेरेस गार्डनिंग केल्यानंतर त्यांना शेतीची आवड निर्माण झाली. थोड्या दिवसांनी त्यांनी त्यांच्या पतीच्या मदतीने एक शेत विकत घेतले.. शेतजमीन विकत घेतल्यानंतर त्यांनी त्यात फळे, भाजीपाला आणि भरडधान्य पिकवायला सुरुवात केली.
अशा बनल्या ‘मिलेट माँ’ ; वार्षिक 5 लाखांपेक्षा अधिक उलाढाल
कविता यांनी फळे, भाजीपाला आणि भरडधान्य पिकवायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाप्रमाणे इतर घरांपर्यंत सेंद्रिय अन्न पोहोचवायचे होते. आज त्या अनेक कुटुंबांना सकस अन्न पुरवण्यात सक्षम आहे. सुमारे सात- आठ वर्षांपूर्वी त्यांनी या दिशेने काम सुरु केल्यामुळे आज त्या ‘मिलेट माँ’ म्हणून ओळखल्या जात आहेत. कविता देव वार्षिक 5 लाखांपेक्षा अधिक उलाढाल करत असून डॉक्टर, बीएसएफ सैनिक, रुग्ण, विद्यार्थी यासह अनेकांना मिलेट बनविण्याचे प्रशिक्षणही देत आहेत.
संपर्क :
सौ. कविता देव, संस्थापक, इम्युनो मिलेट्स.
806, सुंदर नगर, रायपूर, छत्तीसगड
मोबाईल : 9302616888