ही यशोगाथा आहे राजस्थानातील भावेश चौधरी या बेरोजगार तरुणाची. त्यावेळी त्याच्या मित्रांनी सरकारी नोकऱ्या मिळवल्या होत्या. भावेशच्या आयुष्याला मात्र कोणतीही दिशा नव्हती. काय करायचे, कसे करायचे हे काहीही ठरलेले नव्हते; भविष्याचे काही कळतही नव्हते. त्याच्या खिशात घरच्यांनी ड्रायव्हिंग लायसन्ससाठी दिलेले 3,000 रुपये होते. त्यातून भावेशने एका व्यवसायात उडी घेतली. आज 26 वर्षांच्या या तरुणाने 8 कोटी रुपयांच्या पारंपरिक, शुद्ध बिनोला देशी तुपाचा व्यवसाय उभा केला आहे. त्याने “कसुतम” ब्रँड उभा करून नावारूपाला आणला आहे. भावेश आज महिन्यात 70 लाख रुपये कमावतो आणि देशभरात त्याचे 15 हजारांहून अधिक लॉयल ग्राहक आहेत.
“याचा काही उपयोग नाही,” … “हा पोरगा आपले घर गहाण ठेवेल. तो आपला सत्यानाश करेल.” … “त्याला मालमत्तेपासून बेदखल करा.”….. अशी टीका, टोमणे, उपेक्षा सहन करत भावेश कुमार लहानाचा मोठा झाला. मूळच्या राजस्थानातील असलेल्या व हरियाणात राहणाऱ्या त्याच्या कुटुंबीयांकडून त्याला फारसं प्रेम कधी लाभलं नाही. फक्त आई त्याच्या साथीला होती. 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर बहुतेक तरुणांप्रमाणेच त्याच्यासमोर पुढे काय करायचे, हा सर्वात मोठा प्रश्न होता.
भावेश अशा वातावरणात लहानाचा मोठा झाला, जेथे ग्रामीण भागातील बहुतांश तरुण पहाटे 4 वाजता, व्यायाम धावण्यासाठी उठत. यापैकी बहुतेकांना संरक्षण क्षेत्रात करिअर करायचे असते. काही सैन्यात जातात, तर काही पोलिस किंवा निमलष्करी दलात सामील होतात. भावेशकडूनही तशीच अपेक्षा होती. पण त्याला नोकरी आजिबात आवडायची नाही..
लहानपणी जेव्हा भावेशचे वडील त्याला त्यांच्या कामाच्या ठिकाणी घेऊन जायचे, तेव्हा तो त्यांना इतरांचे नियम आणि आदेश पाळताना पाहायचा. वडील खूप तणावाखाली काम करत असल्याचे त्याला जाणवायचे. त्याला स्वतंत्र जीवनाची आकांक्षा होती. त्याला स्वतःचे घर सोडण्याचीही भीती वाटत होती. त्याने काही खोडसाळपणा केला, तर आई त्याला वसतिगृहात पाठवण्याचा दम भरायची.
बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ) मध्ये सेवा केलेल्या त्याच्या वडिलांप्रमाणेच भावेशने संरक्षण दलात सामील व्हावे किंवा चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवावी, अशी कुटुंबाची अपेक्षा होती. याउलट, भावेशला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होती. सुरुवातीला 2017 मध्ये त्याने सरकारी परीक्षा देण्याचा प्रयत्न केला, पण त्यात अपयश आले. तो परीक्षेत नापास झाल्याने कुटुंब दुःखी असताना, तो स्वतः मात्र मनोमन खुश होता. कारण, त्याला त्या वाटेवर जायचेच नव्हते. पुढे त्याचे मित्र यशस्वी झाले, सेटल झाले, नोकरीत रमले. भावेश मात्र बेरोजगारच होता, जीवनात पुढे काय करावे, याबद्दल त्याला काहीही माहिती नव्हती. घरचे टोमणे हैराण करत होते.
त्याने बीएस्सीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण सोडले. गावातील लोकांनीही त्याला टोमणे मारायला सुरुवात केली. तो एकतर शेती करेल किंवा मजुरी तरी करेल, असे लोक म्हणायचे. वडीलही त्याच्यावर खूप रागावले आणि त्यांनी त्याला जबरदस्तीने इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये दाखल केले. तिथे त्याला काही समजतच नव्हते, म्हणून महिनाभरानंतर त्याने कॉलेजला रामराम ठोकला.
2019 पर्यंत कोणताच मार्ग सापडत नसल्याने तो वर्तमानपत्रांमध्ये उदयोन्मुख स्टार्टअप्सबद्दल वाचत राहिला. YouTube वर संबंधित प्रेरक व्हिडिओ पाहायचा त्याला नादच जडला होता. तो तासनतास यशस्वी लोकांच्या स्टोरीज पाहत राहायचा.
त्याआधारे स्वतःसाठी बिझनेस आयडिया शोधत असतानाच त्याने तूप ब्रँड सुरू करण्याचे नक्की केले. भावेश सांगतो, “मी जेव्हा आर्मीच्या परीक्षेची तयारी करत होतो, तेव्हा वसतिगृहात मी अनेक मित्र बनवले. मी गावाकडून आलो की ते मला माझ्या घरून शुद्ध तूप आणायला सांगायचे. मी ते त्यांना परवडणाऱ्या किमतीत विकून चांगली कमाई करायचो. शहरात अनेक जण गायी आणि म्हशी पाळू शकत नाहीत, अशा शहरांमध्ये तूप व्यवसायाची क्षमता जाणून घेण्याचे मी ठरवले.”
शेवटी, घरबसल्या भावेशने आपल्या आईच्या मदतीने A2 गायीचे तूप तयार करण्यास सुरुवात केली. देशी गायींच्या पौष्टिक दूधापासून काढून ते तयार केले जाते. बिलोना मंथन या पारंपरिक पद्धतीचा वापर करून त्यांनी तूप बनवायला सुरुवात केली. यामध्ये पारंपरिक चुलीवर मातीच्या भांड्यांमध्ये मंद आचेवर दूध उकळले जाते. त्याला शुद्ध सोनेरी रंग आणि छान सुगंध येतो.
2019 मध्ये, भावेश तूप व्यवसायात उतरला; पण त्याला मार्केटिंगचे फारसे ज्ञान नव्हते. तो फक्त दिवास्वप्न पाहत होता. भावेशने देशी तुपाच्या ऑनलाइन व्यवसायासाठी वेबसाइट डिझाइन करण्यासाठी बेंगळुरूमधील एका संस्थेला नियुक्त केले. त्याच्याकडे बचत नसल्याने त्याने त्यासाठी मित्रांकडून 21 हजार रुपयांचे कर्ज घेतले. परंतु वेबसाइट तयार केल्यानंतरही त्याला कोणतीही ऑर्डर मिळाली नाही. वेबसाईट बनवणाऱ्या कंपनीने त्याला सांगितले की, ऑनलाईन ऑर्डर मिळविण्यासाठी उत्पादनाचे चांगले फोटो पोस्ट करावे लागतील. त्यावेळी भावेशाला ते फोटो कुरिअरने कसे पाठवायचे, वेबसाईटवर नेमकी पोस्ट कशी करायची, हे काहीही माहित नव्हते. त्याला ते शिकण्याची भीती वाटली आणि वेबसाइट सुरू होण्यापूर्वीच बंद झाली.
त्यानंतर भावेशला एक जाणीव झाली की, जो दिखता है, वही बिकता हैं. त्याला त्याच्या उत्पादनाची आकर्षक छायाचित्रे क्लिक करायची गरज वाटू लागली. त्यासाठी त्याने दोन काचेच्या बरण्या आणि सेलोटेपची ऑनलाइन ऑर्डर दिली. “माझ्या आईने मला ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी 3,000 रुपये दिले होते; पण मी ही रक्कम गुपचूप काचेची भांडी घेण्यासाठी वापरली. तोपर्यंत माझ्या कुटुंबाला माझ्या व्यवसायाची कुणाला कल्पनाही नव्हती,” भावेश सांगतो.
पुढे व्हॉट्सॲपचा वापर करून, त्याने व्यवस्थित कॅटलॉग बनवले. शुद्ध तूप खाण्याचे फायदे सांगितले गेले आहेत अशा संबंधित YouTube व्हिडिओंवर त्याच्या ब्रँडची जाहिरात करण्यास सुरुवात केली. तेव्हा भावेश अहोरात्र यूट्यूबवर पडीक असायचा. त्याने अनेक व्हिडिओंवर कॉमेंट्स करून त्याचे संपर्क तपशील शेअर केले, शुद्ध तूप उत्पादनांची जाहिरात केली. एका आठवड्याच्या आत त्याला पहिली ऑर्डर मिळाली. त्यातून भावेशने 1,125 रुपये कमावले! ही त्याची आयुष्यातली पहिली कमाई होती. जेव्हा ही रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा झाली, तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
हळूहळू अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भावेशने स्वतःचे YouTube चॅनल सुरू केले. सुरुवातीला तो कॅमेरासमोर उभे राहायलाही लाजायचा. त्याला एक वाक्य पूर्ण करण्यासाठी 20 मिनिटे लागायचे. तसाही तो हिंदीत बोलला की त्याचे कुटुंबीय त्याला थट्टेने ‘मास्टर’ म्हणायचे. कारण त्यांच्या घरी फक्त राजस्थानी आणि हरियाणवी बोलली जाते. त्यांच्या प्रदेशात फक्त शिक्षकच हिंदीत बोलायचे. त्यामुळे आजूबाजूला कोणी नसताना भावेशने गुपचूपपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले. एक लिटर शुद्ध तूप बनवण्यासाठी किती लिटर गाईच्या दुधाची गरज आहे, यासारख्या आकर्षक विषयांवर त्याने व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. व्यवसायाला चालना देण्यासाठी, त्याचा उपयोग करण्यासाठी तो डिजिटल मार्केटिंग देखील शिकला.
सुरुवातीच्या अडथळ्यांनंतर, भावेशने एप्रिल 2021 मध्ये दीड लाख रुपयांची विक्री केली. हे प्रोत्साहन मिळाल्याने त्याला भलताच आनंद झाला. कारण, हे त्याच्या सरकारी नोकऱ्यांमधील मित्रांपेक्षाही जास्त उत्पन्न होते. एका महिन्यानंतर, मे मध्ये, भावेशने 6 लाख रुपयांची तूप विक्री केली. त्यातून त्याला एक लाख 80 हजारांचा नफा झाला. त्यामुळे तो इतका रोमांचित होतो की, दिवसातून अनेक वेळा बँक खाते रीफ्रेश करून शिल्लक तपासायचा. त्याच्यासारख्या बेरोजगार व्यक्तीसाठी तशीही ती मोठी रक्कम होती.
त्याच वर्षी भावेशने आपल्या घरी गुरे वाढवण्यासाठी शेड उभारली. सुरुवातीला 3-4 गायींपासून, भावेशच्या घरी आज किमान 20 गायी आहेत. याशिवाय, 150 स्थानिक शेतकऱ्यांकडून तूप मिळवण्यासाठी त्यांनी करार केला आहे. एके काळी अयशस्वी, बेरोजगार असलेला भावेश चौधरी आज एका महिन्यात 70 लाख रुपये कमावतो. त्याने देशभरात 15,000 ग्राहकांचे लॉयल नेटवर्क उभे केले असून ते वाढतच आहे. ग्राहक त्याच्या तुपाच्या गुणवत्तेवर समाधानी आहेत. रिपीट ग्राहकांची संख्या मोठी आहे. सर्व ऑनलाईन पोर्टलवर आता “कसुतम” घी ब्रँड परिचित आहे. त्याचे रेटिंगही सरासरी चारहून अधिक आहे.
भावेश सांगतो, “सुरुवातीला, मी सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करण्यास नकार दिल्याने, घरच्यांनी माझी निरुपयोगी म्हणून हेटाळणी केली. मी किमान दोन वर्षे धडपडत राहिलो. जेव्हा मी चांगली रक्कम कमवू लागलो, तेव्हाच माझ्या कुटुंबाचा माझ्या स्वप्नांवर विश्वास बसला. मी आज आईचा कृतज्ञ आहे, जिच्या पाठिंबा अन् प्रोत्साहनामुळे मी आज सरकारी नोकऱ्यांमध्ये असलेल्या माझ्या मित्रांपेक्षाही जास्त कमवू शकलो आहे. याशिवाय, गावातच कुटुंबासह मी सुखी-समाधानी, आनंदाचे जीवन जगत आहे. माझ्या गावातील पारंपरिक तुपाला आज देशभर मागणी आहे, हेच भरपूर झाले.” भावेश आता कोल्ड प्रेस राईचे आणि इतरही तेल बाजारात आणत आहे.
संपर्क :
भावेश चौधरी, कसुतम फार्म, 343, बेरला रोड, असल्वास ग्राम, सूरजगड, राजस्थान-333033
मोबाईल : 07427003708
ई-मेल : [email protected]
वेबसाईट : https://kasutam.com/