मुंबई : मान्सूनच्या (Monsoon Update) आगमनाची प्रतिक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. केरळमध्ये मान्सून सुरु होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याची माहिती भारतीय हवामान विभाग म्हणजेच आयएमडीने (IMD) दिली आहे.
याआधी भारतीय हवामान विभागाने (IMD) मान्सून मालदीव, कोमोरिन, बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील भाग, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्र या भागात 19 मेपर्यंत मान्सूनचं आगमन झाल्याची माहिती दिली आहे. मान्सून अंदमान – निकोबार मध्ये दाखल झाल्यानंतर आता केरळमध्ये मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
केरळमध्ये मान्सून दाखल होणार
मे महिन्याच्या शेवटी नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज याआधी हवामान विभागाने वर्तविला होता. मात्र, आता केरळमध्ये मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असून येत्या 5 दिवसात नैऋत्य मान्सून केरळ मध्ये दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
मे महिन्याच्या अखेरीस नैऋत्य मान्सून (Monsoon Update) केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. तर मान्सूनचं महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आगमन होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, राज्याच्या विविध भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. यंदा मान्सून समाधानकारक होणार असून सरासरीच्या 106 टक्के पाऊस होईल, असा अंदाज देखील भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.