इफको लवकरच नायट्रोजनचे प्रमाण जास्त असलेला नॅनो युरिया प्लस लाँच करणार आहे. केंद्र सरकारने 16 एप्रिल रोजी अधिसूचना जारी करून पीक पोषक घटकांचे प्रमाण बदलले आहे. त्यानुसार, आता इफकोच्या नॅनो-युरियामध्ये वजनानुसार किमान 16 टक्के नायट्रोजन असणे आवश्यक आहे. यापूर्वी नॅनो युरियामध्ये वजनानुसार 1 ते 5 टक्के दरम्यान नायट्रोजन होता.
युरियाच्या 45 किलोच्या पारंपारिक बॅगमध्ये नायट्रोजनचं प्रमाण 46 टक्के इतकं असते. त्यामुळे शेतकऱ्यांसह काही तज्ञांनी अत्यंत कमी नायट्रोजन असलेल्या नॅनो-युरियाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने शेतकऱ्यांनी नॅनो-युरियाचा वापर केला नाही. तिथे शेतकऱ्यांच्या विरोधामुळं सक्तीने नॅनो युरियाची विक्री करावी लागली होती. त्यामुळे त्यात आता त्यात नायट्रोजनचे प्रमाण वाढवले गेले आहे. नॅनो युरिया प्लसची किंमत 500 मिली बाटलीसाठी पूर्वीइतकीच 225 रुपये असेल.
येत्या 8-10 दिवसात उत्पादनाला सुरुवात
इफकोकडून आगामी खरीप हंगामासाठी नवीन द्रवरूप नॅनो युरिया प्लसचे उत्पादन विद्यमान प्रकल्पातूनच येत्या 8-10 दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने खतांच्या प्रमाणाबाबत तीन वर्षांसाठी वैध असलेली वैशिष्ट्ये 16 एप्रिल रोजी अधिसूचित केली आहेत. यापूर्वी, 24 फेब्रुवारी 2021 रोजी अशी अधिसूचना जारी केली गेली होती.
नॅनो-युरिया खरेदीला शेतकऱ्यांचा विरोध
नॅनो-युरिया खरेदीला शेतकऱ्यांच्या विरोधामुळे काही राज्यांमध्ये सक्तीने द्रव खतांची विक्री करावी लागली होती. शेतकऱ्यांच्या तक्रारींनंतर, कंपन्या आणि किरकोळ विक्रेत्यांना नॅनो-युरिया पारंपरिक युरिया बॅगसह लिंकिंग न करण्याचे आदेश केंद्र सरकारला द्यावे लागले होते.
नॅनो युरियाला अपेक्षित रिझल्ट दिसले नाहीत!
कृषी शास्त्रज्ञ ए.के. सिंग यांनी सांगितले की, “500 मिलीची एक नॅनो-युरिया बाटली ही पारंपरिक 45 किलोग्रॅम ग्रॅन्युलर युरिया बॅगच्या समतुल्य असल्याचा दावा सरकारने केला, तेव्हा अनेक शेतकऱ्यांनी त्यावर विश्वास ठेवला. मात्र, त्या प्रिस्क्रिप्शनचे पालन केल्यावर उलट परिणाम मिळाले. पारंपरिक युरियाचा 4 बॅगऐवजी तीनच बॅग वापरा आणि एक बाटली नॅनो युरिया वापरा, असे सांगितले जात होते. पारंपरिक युरियाचा वापर 25 टक्क्यांनी कमी करणे हे सरकारचे टार्गेट होते. मात्र, शेतकऱ्यांना त्यातून अपेक्षित उत्पन्न न आल्याने उत्तरेकडील राज्यात असंतोष निर्माण झाला.”
चाचण्या, परिणामकारकतेबद्दल योग्य माहिती नाही
नवीन नॅनो-युरिया प्लसमध्ये सध्याच्या नॅनो-युरियामधील 4 टक्के नायट्रोजनपेक्षा चारपट जास्त नायट्रोजन असेल. त्यामुळे नॅनो युरिया प्लसचे चांगले परिणाम होऊ शकतात. तथापि, या नवीन वैशिष्ट्यांच्या मंजुरीपूर्वी त्याच्या चाचण्यांबद्दल आणि परिणामकारकतेबद्दल योग्य माहिती दिली गेलेली नाही, असा आक्षेप कृषी शास्त्रज्ञ सिंग यांनी नोंदवला. नवीन नॅनो युरिया प्लसमध्ये पीएच, व्हिस्कोसिटी, एमव्ही मधील झेटा संभाव्यता आणि कणांचा आकार यासारखी इतर वैशिष्ट्ये तशीच राहणार आहेत.
हवामान स्मार्ट शेतीसाठी मदत
इफकोने ऑगस्ट 2021 मध्ये लाँच केल्यापासून नॅनो-युरियाच्या आतापर्यंत उत्पादित 8.53 कोटी बाटल्यांपैकी 7.5 कोटी बाटल्या विकल्याचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ यूएस अवस्थी यांनी सांगितले. ते म्हणाले, “इफ्को नॅनो यूरिया प्लस हे नॅनो युरियाचे प्रगत फॉर्म्युलेशन आहे, ज्यामध्ये पिकांच्या वाढीच्या टप्प्यावर नायट्रोजनची गरज पूर्ण करण्यासाठी पोषणाची पुनर्व्याख्या केली आहे. ते मातीचे आरोग्य चांगले राखून शेतकऱ्यांचा नफा वाढवेल आणि शाश्वत पर्यावरणाला चालना देईल. त्यामुळे सूक्ष्म पोषक घटकांची उपलब्धता आणि कार्यक्षमता देखील वाढेल. हे क्लोरोफिल चार्जर, हवामान स्मार्ट शेतीसाठी मदत करेल.”