“एल-निनो”चे ला-नीना मध्ये स्थित्यंतर; स्कायमेटनंतर भारतीय हवामान खात्याचा अधिकृत सरकारी अंदाज जाहीर; कृषी क्षेत्रासह देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा देणारा संकेत
यंदा मान्सून पाऊसफुल्ल असणार आहे. पावसासाठी भारतीय हवामान संस्थेचा (IMD) अधिकृत सरकारी अंदाज जाहीर झाला आहे. सीसीई आणि स्कायमेटपाठोपाठ “आयएमडी’चा हा अंदाजही शेतकऱ्यांना उभारी देणारा आहे. भारतातील चांगल्या मान्सूनशी संबंधित ला-निना परिस्थिती ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता असल्याचे “आयएमडी’ने म्हटले आहे.
भारतीय मान्सून साधारणपणे 1 जूनच्या आसपास केरळच्या दक्षिण टोकावर येतो आणि सप्टेंबरच्या मध्यात माघार घेतो. ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत “एल-निनो”ची तटस्थता राहील आणि पुढे ला-नीना स्थितीत बदल होईल. त्यामुळेच यंदाच्या पावसाळ्यात भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने सोमवारी सांगितले. विशेषत: कृषी क्षेत्राला मोठा दिलासा देणारा हा संकेत ठरणार आहे.
यंदा सरासरीपेक्षा 106% अधिक पाऊस
पॅसिफिक महासागरात निर्मित एल-निनोच्या घटनेमुळे गेल्या वर्षी अपुरा पाऊस झाला आणि महागाई वाढली. पर्यायाने, गेल्या वर्षभरात ग्रामीण भागातील शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यांना आयएमडी अंदाजाने खुशखबर मिळाली आहे. जूनपासून सुरू होणाऱ्या चार महिन्यांच्या पावसाळी हंगामात, दीर्घ-काळाच्या सरासरीपेक्षा (LPA) 106% अधिक पाऊस यंदा अपेक्षित असल्याचे भारताच्या हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले.
महापात्रा म्हणाले, “सध्या मध्यम एल-निनो परिस्थिती प्रचलित आहे. त्यानंतर मान्सूनचा हंगाम सुरू होईल तेव्हा तो तटस्थ होण्याचा अंदाज आहे. ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत ला-लिना परिस्थिती निर्माण होऊ शकते."
गुरुवारपर्यंत भारतातील 150 प्रमुख धरणांमधील पाण्याची पातळी क्षमतेच्या 33% पर्यंत घसरल्याने या अंदाजालाही महत्त्व आहे.
“स्कायमेट”नेही गेल्याच आठवड्यात आपला मान्सूनचा अंदाज जाहीर केला होता. देशात 2024 मध्ये सरासरीहून 102% अधिक मान्सून पाऊस पडेल, असे त्या अंदाजात सांगितले होते. गेल्या वर्षी, एल-निनो स्थितीमुळे सरासरीपेक्षा 6% कमी मान्सूनचा पाऊस झाला होता.
देशाच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना
“सरासरीपेक्षा जास्त पाऊस आणि त्याचे वेळेवर आगमन हे केवळ कृषी क्षेत्रासाठीच नव्हे तर देशाच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठीही चांगले आहे,” असे इंडिया रेटिंगचे मुख्य अर्थतज्ज्ञ देवेंद्र पंत म्हणाले.
भारतासाठी चांगला मान्सून का महत्त्वाचा?
भारतासाठी चांगला मान्सून महत्त्वाचा आहे, कारण या चार महिन्यात वार्षिक सरासरीच्या जवळपास 70% पाऊस पडतो. तो शेतीसाठी अतिशय महत्त्वाचा ठरतो. भारतातील जवळपास निम्म्या शेतीयोग्य जमिनीला सिंचनाची सोय नाही. भात, मका, ऊस, कापूस आणि सोयाबीन यांसारखी पिके घेण्यासाठी देशातील शेतकरी या पावसावर अवलंबून आहे. देशाच्या GDP मध्ये शेतीचा वाटा सुमारे 14% आहे.
भारताच्या अन्न सुरक्षेसाठी पुरेसा पाऊस आवश्यक
निव्वळ लागवडीच्या क्षेत्रापैकी सुमारे 56% पावसावर आधारित आहे, एकूण अन्न उत्पादनात त्याचा 44% वाटा आहे, त्यामुळे भारताच्या अन्न सुरक्षेसाठी पाऊस आवश्यक आहे. सरासरी पावसामुळे पिकांचे उत्पादन चांगले होते, ज्यामुळे भाज्यांसह अन्नधान्याच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास सरकारला मदत होते.
एल-निनो म्हणजे काय?
एल-निनो म्हणजे स्पॅनिश भाषेत “लहान मुलगा”. ही एक हवामान नमुना स्थिती आहे, जी मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमान वाढवते. ही घटना दर दोन ते सात वर्षांनी दिसून येते आणि ती नऊ ते बारा महिन्यांपर्यंत टिकू शकते, ज्यामुळे जागतिक स्तरावर हवामान परिस्थितीवर परिणाम होतो.
ला-निना म्हणजे काय?
ला-निना म्हणजे स्पॅनिश भाषेत “छोटी मुलगी”. या स्थितीत समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान थंड होते. साधारणपणे दर तीन ते पाच वर्षांनी होणारे ला-निना काही वेळा सलग वर्षांमध्ये घडू शकते, ज्यामुळे वाढलेला पाऊस आणि हवामानाचे वेगळे परिणाम समोर येतात.
मान्सूनवर “आयओडी”चाही परिणाम
भारताच्या मान्सून हंगामातील पावसाच्या अंदाजासाठी तीन मोठ्या प्रमाणातील हवामानातील घटनांचा विचार केला जातो – एल-निनो, ला-निना आणि हिंद महासागर द्विध्रुव म्हणजेच आयओडी (IOD). आयओडी हे विषुववृत्तीय हिंद महासागराच्या पश्चिम आणि पूर्व बाजूंच्या बर्फाचे आवरण आणि भिन्न तापमानवाढीमुळे उद्भवते. उत्तर हिमालय आणि युरेशियन लँडमासच्या विभेदक गरमीमुळे भारतीय मान्सूनवर प्रभाव पडतो.
यंदा “आयओडी”देखील मान्सूनसाठी अनुकूल
“आयओडी”बद्दल यंदाच्या पावसाळ्यात सकारात्मक परिस्थिती दिसत आहे. याव्यतिरिक्त, उत्तर गोलार्धात बर्फाचे आवरण कमी आहे. ही परिस्थिती भारतीय नैऋत्य मान्सूनसाठी अनुकूल असल्याचे आयएमडी प्रमुख महापात्रा यांनी स्पष्ट केले.
- अल्प खर्चातील फायदेशीर सेंद्रिय शेतीबाबत अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात जळगावात 30 नोव्हेंबरला चर्चासत्र…
- कृषी प्रक्रिया उद्योग व शासकीय योजनांबाबत अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात जळगावात 30 नोव्हेंबरला चर्चासत्र…
- मका – एकरी 100 क्विंटल उत्पादनाबाबत अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात जळगावात 29 नोव्हेंबरला चर्चासत्र…
- हिमाचल सरकारचा अनोखा उपक्रम ; पशुपालकांकडून 3 रुपये किलोने शेण खरेदी !
- नोकरी सोडून सुरु केला दुग्धव्यवसाय ; आता 2 कोटींची उलाढाल
- जिद्द आणि मेहनतीने सेंद्रिय शेतीतून केली लाखोंची कमाई
- सरकारी नोकऱ्या सोडून बनला शेतकरी ; आता कमावतोय लाखो रुपये
- हिवाळ्यात केळी बागेची अशी घ्या काळजी ?