शहादा : “नंदुरबार जिल्हा लवकरच 100% सिंचनक्षम करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यासाठी सातपुडा पहाडात बोगदा खोदून नर्मदा नदीचे पाणी जिल्ह्यात येईल. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा हजार कोटींहून अधिक निधीच्या तरतुदीस संमती दर्शविली आहे, अशी घोषणा नंदुरबारच्या खासदार हिनाताई गावित यांनी शहादा येथील ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात केली.
प्रदर्शनात खासदार गावित यांच्या हस्ते आदर्श शेतकरी, कृषी केंद्र चालक व शेतकरी गटांना ॲग्रोवर्ल्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. शहादा येथील प्रेस मारुती मैदानावर भरविण्यात आलेले ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन सोमवार, 26 फेब्रुवारीपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार असून त्यात प्रवेश मोफत आहे.
ॲग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या शेतकरी व ग्रामविकास हितातील कार्याची ओळख करून दिली. निर्मल सीडसचे संचालक डॉ. सुरेश पाटील, मेट्रोजेनचे संचालक प्रियंक शाह, आनंद ॲग्रो केअरचे घनश्याम हेमाडे, शोभा हेमाडे, धडगाव कॉलेजचे प्राचार्य डॉ. एच एम पाटील, हायकोर्टातील ॲड. विनोद पाटील यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. ज्योत्स्ना पवार यांनी सूत्रसंचालन केले.
वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार गावित भगिनी
खासदार हिनाताई गावित म्हणाल्या, “नंदुरबार जिल्ह्यात वडील विजयकुमार गावित यांनी अनेक विकासकामे केली. त्यांच्या 30 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक विकासकामे घडली. आता जिल्ह्यातील प्रत्येक शेतात पाणी पोहोचावे, ही वडिलांची धडपड आहे. त्यासाठी आम्ही वचनबध्द आहोत. नंदुरबार जिल्हा आगामी काळात 100 टक्के सिंचनक्षम होईल, हा विश्वास आहे.”
नर्मदा नदीतील 10.8 टीएमसी पाणी जिल्ह्यात आणणार
खासदार गावित म्हणाल्या की, परिसरातील सिंचन सुविधा वाढाव्यात म्हणून आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. गावित साहेबांचे असे स्वप्न आहे, की पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपेक्षा आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिक उत्पन्न मिळवावे, अधिक सक्षम व्हावे. जिल्ह्यालगतच्या नर्मदेचे पाणी नंदुरबार जिल्ह्याला मिळवण्याचा करार झालेला असूनही आजवर त्यासाठी विशेष प्रयत्न झालेले नाही. आता गेल्या अनेक वर्षांचे नंदुरबार जिल्ह्यातील 100% सिंचनाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. केंद्र सरकारच्या मदतीने नर्मदा नदीतील 10.8 टीएमसी पाणी नंदुरबार जिल्ह्याला मिळणार आहे. यासाठी अंदाजे 10 हजार कोटीहून अधिक खर्च येईल. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यास संमती दर्शविली आहे.
मोफत पाणी तपासणी आणि लाखमोलाची करार शेती…
आनंद ऍग्रो केअर यांच्यामार्फत शेतकऱ्यांनी प्रदर्शनला येताना सोबत आणलेल्या पाण्याची (EC, PH, TDS) मोफत तपासणी करून अवघ्या काही मिनिटांमध्ये जागेवरच रिपोर्ट देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सुशिक्षित तरुणांसाठी विविध कंपन्यांची तालुकानिहाय डीलरशिपच्या माध्यमातून व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. याच बरोबर फळे व भाजीपाला क्षेत्रात करार शेतीच्या माध्यमातून शाश्वत उत्पन्नाची हमी, मजुरीला पर्यायी यंत्र व अवजारे, आधुनिक कृषी प्रणाली, काटेकोर पाणी व्यवस्थापन तसेच बदलत्या हवामानानुसार पीक लागवड व नवीन तंत्रज्ञानाची माहितीदेखील या प्रदर्शनात उपलब्ध होईल.