वर्षभर शेतात राबून कृषी माल पिकविणारे अनेक शेतकरी घाम गाळून, कष्ट उपसून जेमतेम गुजराण करतात. त्याचे मुख्य कारण अर्थातच स्वतः उत्पादित केलेला माल स्वतः न विकणे, कृषी मालाचे मूल्य संवर्धन (व्हॅल्यू अॅडिशन) न करणे हेच आहे. अशा परिस्थितीत बटाट्यातून वर्षाला 25 कोटी कमावणारा तरुण गुजराती शेतकऱ्याची कथा नक्कीच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल.
जिग्नेश पटेल असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे पारंपरिक बटाटा पीक घेतले जात होते. नंतर त्यांनी आपल्या कृषी ज्ञानाचा वापर शेतीत केला. गेल्या 18 वर्षांपासून त्यांचे संपूर्ण कुटुंब कृषी उद्योगात गुंतले आहे. आता ते 1,000 एकर जमिनीवर दर्जेदार, उत्पादनक्षम लेडी रोझेटा वाणाच्या बटाट्याची लागवड करत आहेत.
कृषि विषयात एमएससी; नोकरीऐवजी शेतीत रमले
जिग्नेश पटेल यांनी 2005 मध्ये कृषी विषयात एमएससी पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी एका विशेष प्रकारच्या वाणाची लागवड करून आपल्या कुटुंबाची बटाटा शेती सुधारण्याचा निर्णय घेतला, या निर्णयामुळे केवळ 10-15 वर्षातच त्यांच्या कुटुंबाला 25 कोटी रुपयांचा महसूल मिळेल, असे त्यावेळी त्यांना स्वप्नातही वाटले नसेल.
बालाजी, आयटीसीसारख्या कंपन्यांना पुरवठा
राजस्थानला लागून असलेल्या अरवली प्रदेशात पटेल कुटुंब लेडी रोझेटा या बटाट्याचा विशेष वाणाची शेती करतात. या वाणाचा बटाटा चिप्स, वेफर्स बनवण्यासाठी वापरला जातो. पटेल कुटुंब आता सरासरी 20,000 मेट्रिक टन उत्पादन करतात आणि ते बालाजी आणि आयटीसीसारख्या सर्व आघाडीच्या बटाटा चिप्स निर्माता कंपन्यांना विकतात. ढोलपूर कॅम्पा गावात राहणारे हे कुटुंब कोट्यवधी रुपयांच्या व्यवसायापर्यंत कसे पोहोचले, याबद्दल जितेश पटेल सांगतात, मी 2005 मध्ये कृषी विषयात एमएससी पूर्ण केल्यानंतर, नोकरी न करता खानदानी शेतीतच काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. तथापि, बटाट्यांच्या टेबल व्हरायटी वाढवण्याच्या कौटुंबिक परंपरेला चिकटून राहण्याऐवजी मी काहीतरी वेगळे उत्पादन करायचे ठरवले.
2007 मध्ये दहा एकरात नव्या वाणाची प्रायोगिक लागवड
नव्या वाणाची 2007 मध्ये 10 एकर जमिनीवर प्रायोगिक पद्धतीने लागवड केली गेली. ती यशस्वी ठरल्यानंतर गेल्या 30 वर्षांपासून बटाट्याची शेती करणार्या पटेल कुटुंबाने एकत्रितपणे सर्व क्षेत्रात एलआर बटाट्याची लागवड करण्यास सुरुवात केली. 18 वर्षांपूर्वी घेतलेल्या या निर्णयानंतर सारे चित्रच बदलले. कुटुंबाच्या, भाऊबंदकीच्या जमिनीसह गावातील शेतकर्यांना एकत्र घेऊन त्यांच्या भाड्याच्या शेतात अशा संपूर्ण 1,000 एकर जमिनीवर आता एलआर बटाट्याची लागवड केली जात आहे.
कुटुंबातील प्रत्येकाने घेतले पूरक शिक्षण-प्रशिक्षण
पटेल कुटुंबातील सर्व दहा सदस्यांनी संबंधित शिक्षण-प्रशिक्षण घेतले आहे. वनस्पती-बटाटा प्रजनन, पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कीटकशास्त्र आणि फलोत्पादन यासह विविध क्षेत्रात आता त्यांच्याकडे घरचेच निपुण तज्ञ आहेत. बटाट्याची एलआर विविधता वेफर आणि चिप उत्पादकांना दीर्घकालीन कराराच्या आधारे पुरवली जाते. त्यांना प्रति किलो 20 रुपये इतका उच्च दर मिळतो.
नेटाफिम ठिबक सिंचनचा वापर, जागतिक परिषदेत सत्कार
जितेश पटेल यांनी आता शेतीचे पूर्णतः आधुनिकीकरण केले आहे. ते अत्याधुनिक, स्वयंचलित मशिनरीने बटाटा काढणी करतात. संपूर्ण क्षेत्रात त्यांनी नेटाफिम या जगातील आघाडीच्या सूक्ष्म सिंचन कंपनीच्या ठिबक सिंचन तंत्राचा वापर केला आहे. त्यामुळे पाण्याचा नेमका आणि अधिक प्रभावी वापर होतो. पाण्याच्या कमी वापरातून अधिक उत्पादनाबद्दल 2020 च्या जागतिक बटाटा परिषदेत पटेल यांना सन्मानित करण्यात आले. टेक्निको ग्री सायन्सेस लिमिटेडचे मुख्य कार्यकारी सचिव मदन सांगतात, बटाटा चिप उत्पादकांना एलआर प्रकाराचा सातत्यपूर्ण पुरवठा आणि गुणवत्ता आवश्यक आहे. गुजरातमधून इंडोनेशिया, कुवेत, ओमान आणि सौदी अरेबिया या प्रमुख बाजारपेठांमध्ये या जातीची एक लाख टन निर्यात केली जाते.
लेडी रोझेटा बटाट्याच्या वाणाची वैशिष्ट्ये
लेडी रोझेटा (एलआर) हे एक मध्यम आकाराचे, लवकर उत्पादन होणारे, चवीला अधिक चांगले, कुरकुरीत वाण आहे. यात साखरेचे प्रमाण (शुगर लेव्हल) कमी असते. यात तुलनेने स्टार्चचे प्रमाण कमी राहून फळ थोडे शुष्क असते. त्यामुळे टिकवणक्षमता चांगली राहते. लेडी रोझेटा वाणाचे बटाटे मध्यम आकाराचे असतात. हे वाण अतिशय एकसमान गोल कंद तयार करते. युरोप, उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्वेमध्ये ते कुरकुरीत वेफर्स तयार करण्यासाठी खूप लोकप्रिय वाण आहे.
लेडी रोझेटा बटाटे हे प्रक्रिया उद्योगात सर्वाधिक मागणी असलेले वाण आहे. ते वेफर्स किंवा इतर स्नॅक्स बनवण्यासाठी, पुनर्प्रक्रिया करण्यासाठी वापरले जाते. या वाणाच्या बटाट्याची त्वचा थोडी लालसर असते. कडक पृष्ठभाग असलेला हा बटाटा कमी साखरयुक्त असतो. फ्रेंच फ्राईज आणि इतर स्नॅक्ससाठी देखील त्याला मोठी मागणी असते. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रोसेसरसाठी भारतातून मोठ्या प्रमाणावर या वाणाचा पुरवठा होतो. त्यात अर्थातच गुजरातचा वाटा मोठा आहे. निर्यात होणार्या लेडी रोझेटा बटाट्यातील सुमारे 20 टक्के एकटे जितेश पटेल हे पाठवतात.
लेडी रोझेटाचे भौतिक गुणधर्म
रंग : लालसर त्वचा आणि पांढरा गर
आकार : गोल 4.5 सेमी सरासरी
निर्यात पॅकिंग : 20 किलो, 30 किलो, 50 किलो, मटेरियल : ज्यूट बॅग/ लेनो बॅग
चव : साखर मुक्त, कुरकुरीत आणि स्टार्च कमी
मागणी : प्रक्रिया कंपन्या (वेफर आणि स्नॅक्स)
रेस्टॉरंट्स आणि खानपान कंपन्या (फ्रेंच फ्राईज आणि वेफर्ससाठी), सुपर मार्केट, हायपरमार्केट आणि पुनर्विक्रेते,
आयातदार, घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेते
निर्यात कंटेनर : 40 फूट एचसी रीफर
तापमान : 10 डिग्री से
प्रमाण : 29 मेट्रिक टन प्रति कंटेनर कमाल. (पॅकिंग मटेरियल सह)
बटाटा हे पीक आहे काय?
बटाटे (सोलॅनम ट्यूबरोसम) हे सोलानेसी कुटुंबातील पिष्टमय कंद पीक आहे. हे वनस्पतीचे खोड (स्टेम) आहे. प्राचीन काळापासून जगभर बटाटा लागवड केली जाते. जगाच्या काही भागांमध्ये आजही मुख्य अन्न म्हणून वापरले जाते. हे जगातील सर्वाधिक सेवन केल्या जाणार्या पिकांपैकी एक आहे. जगातील मोठ्या लोकसंख्येसाठी बटाटा हा अन्न सुरक्षेचा एक मोठा भाग आहे. जगाच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या रंगांपासून ते वेगवेगळ्या आकारापर्यंतच्या विविध जाती वाढतात, ज्यात क्रॉस ब्रीडिंग आणि परागीकरण तंत्राद्वारे अधिक जाती जोडल्या जातात. लेडी रोझेटा ही नावाप्रमाणेच एक सुंदर दिसणारी जात आहे. अन्न प्रक्रिया उद्योगाची वाढती मागणी असलेली कमी साखर, कमी स्टार्च पातळी आणि दीर्घकाळ शेल्फ लाइफ असलेली ही जात आहे. अन्न प्रक्रिया उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी क्रॉस ब्रीडिंगद्वारे हे वाण विकसित केले गेले आहे.
खुपच उपयुक्त माहिती दिली. अशाच प्रकारे नवीन ऊतप़ेरक यशोगाथा अपेक्षित आहे
धन्यवाद सर