हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे 25 सें.मी. पाणी लागते. ते लक्षात घेऊन प्रमाणशीर पाणी दर 20 ते 25 दिवसातून देणे आवश्यक आहे. स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवणेही आवश्यक असते.
हरभरा पिकास जितके पाणी दिले जाईल त्यानुसार उत्पादनात वाढ होते. तुषार सिंचनाने पाणी दिल्यास पाण्यात मोठी बचत होते.
पाणी व्यवस्थापन
• जिरायती हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे.
• बागायत हरभरा शेताची रानबाधंणी करताना दोन साऱ्यातील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच लांबीसुध्दा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी, म्हणजे पिकाला प्रमाणशीर पाणी देण्यास सोयीचे होते.
• हरभरा पिकास मध्यम जमिनीत 20 ते 25 दिवसांनी पहिले, 45 ते 50 दिवसांनी दुसरे आणि 65 ते 70 दिवसांनी तिसरे पाणी द्यावे.
• भारी जमिनीकरिता पाण्याच्या दोनच पाळया पुरेशा होतात. त्याकरिता 30 ते 35 दिवसांनी पहिले व 60 ते 65 दिवसांनी दुसरे पाणी दयावे.
• हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे 25 सें.मी. पाणी लागते. प्रत्येक वेळी पाणी प्रमाणशीर (7 ते 8 सें.मी.) देणे महत्वाचे असते.
ॲग्रोवर्ल्डचे 2024 मधील पहिले कृषी प्रदर्शन पिंपळगाव नगरीत.. । Agroworld Expo 2024।
पाणी देताना घ्यावयाची काळजी
• स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे. जमिनीस फार मोठ्या भेगा पडू देऊ नयेत. भेगा पडलेल्या शेतात पाणी दिल्यास जास्त पाणी बसून, चांगले पीक उभळण्याचा धोका असतो. पाणी दिल्यानंतर शेतात पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. अन्यथा मूळकुजव्या रोगाने पिकाचे नुकसान होते.
• हरभरा पिकास एक पाणी दिल्यास 30 टक्के, दोन पाणी दिल्यास 60 टक्के आणि तीन पाणी दिल्यास उत्पादनात दुप्पट वाढ होते.
तुषार सिंचनाचा वापर
• हरभरा पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास पाण्याची 33 टक्के बचत होते, तर उत्पादनात 10 ते 15 टक्के वाढही मिळते.
• तुषार सिंचन पद्धतीमुळे पिकास पाहिजे तेवढे आणि आवश्यक त्या वेळेला पाणी देता येते. तसेच जमीन नेहमी भुसभुशीत राहते. तुषार सिंचन पद्धतीमध्ये पाणी दिल्यास शेतामध्ये सारा, पाट, वरंबे पाडण्याची गरज नसते. पर्यायाने यावरील खर्चात बचत होते.
• तुषार सिंचनाने पाणी प्रमाणात देता येत असल्यामुळे मूळकूज रोगामुळे होणारे नुकसान टाळता येते.
• तुषार सिंचन पद्धतीने जमिनीत नेहमीच वाफसा स्थिती राहत असल्याने पिकास दिलेली सर्व खते पूर्णपणे उपलब्ध होतात आणि वाफसा स्थितीमुळे पिकाची अन्नद्रव्ये शोषण्याची क्षमता वाढते.
• पिकात तणांचा प्रादुर्भाव नेहमीपेक्षा तुषार सिंचन पध्दतीत कमी होतो आणि असलेले तण काढणे अतिशय सुलभ जाते.
घाटे अळी प्रादुर्भाव
घाटे अळी ही हरभऱ्यावरील मुख्य किड आहे. घाटे अळी ही कीड हरभऱ्याव्यतिरिक्त तूर, मका, सूर्यफुल, टोमॅटो, भेंडी, करडई, कापूस, ज्वारी, वाटाणा इ. पिकांवर उपजीविका करत असल्यामुळे या किडीचे वास्तव्य शेतात वर्षभर राहते. म्हणून जमिनीची निवड करताना खरीप हंगामात यापैकी पिके घेतली असल्यास अशा जमिनीत हरभऱ्याचे पीक घेऊ नये.
• पिकांच्या फेरपालटीकरिता तृणधान्य अथवा गळीतधान्याची पिके घ्यावीत, जमिनीची खोल नांगरट करावी.
कीड व्यवस्थापन
• एकरी 4 ते 6 कामगंध सापळे लावावेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पतंग अडकले जाऊन पुढील प्रजननास आळा बसतो. पक्ष्यांना बसण्यासाठी दर 15-20 मीटर अंतरावर काठ्या रोवाव्यात किंवा मचान बांधावीत. म्हणजे कोळसा पक्षी, चिमण्या, साळुंकी, बगळे इ. पक्षी पिकावरील अळया पकडून खातात.
• हरभरा पिकास फुलकळी येऊ लागताच 5 टक्के निंबोळी अर्काची पहिली फवारणी करावी. पहिल्या फवारणीनंतर 10 ते 15 दिवसांनी एच.ए.एन.पी.व्ही. विषाणूजन्य कीटकनाशक 500 मि.लि. 500 लिटर पाण्यातून प्रति हेक्टरला फवारावे. तरीही किडीचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास, क्लोर अँट्रानिलीप्रोल (18.5 एससी) 0.25 मि.लि. किंवा फ्ल्युबेन्डॅमाईड (48 एससी) 0.25 मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
(कंटेंट सौजन्य : ADT/KVK, बारामती & रेनट्री)