नाशिक : जिल्ह्यासह राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे वातावरणात गारठा वाढला आहे. अचानक वाढलेल्या या गारठ्यामुळे पिकांवर विशेषत: फळपिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. पिकांवर रोग पडून होणारे नुकसान टाळण्यासाठी एकात्मिक रोग व्यवस्थापन हा उत्तम पर्याय आहे. मध्येच ढगाळ तर मध्येच थंड वातावरणामुळे द्राक्षावर भुरीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून या भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत ते आपण जाणून घेणार आहोत.
द्राक्ष हे पीक अत्यंत नाजूक असून ते पीक कीड आणि रोगांना लवकर बळी पडते. हिवाळ्याच्या दिवसात या पिकाची विशेष काळजी घ्यावी लागते. सुप्तावस्थेत असणारे रोगांचे अवशेष पावसाच्या पाण्याने व वार्याने इतरत्र पसरून हिवाळ्यात अनुकूल वातावरण मिळाल्यावर सक्रिय होतात व रोगाची लागण होण्यास सुरुवात होते. या वातावरणात द्राक्ष या पिकावर रोगाची विशेषत: भुरी (पावडरी मिल्ड्यू) या रोगाची लागण झाल्याचे दिसून येते. द्राक्षाची पाने, कोवळी फूट आणि द्राक्षाचा घड या भागांवर भुरी या रोगाचा प्रादुर्भाव होतो. ढगाळ हवामान, कमी ते मध्यम प्रकाश, 22 ते 28 अंश सें.ग्रे. तापमान व दमट वातावरण हे भुरी रोगाच्या प्रादुर्भावासाठी अनुकूल आहे. भुरी या रोगाचा वार्यामार्फत अधिक प्रमाणात प्रसार होतो.
भुरी या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पानांच्यावरील बाजूस पांढरसर रंगाचे डाग दिसून येतात. काही काळानंतर हे डाग मोठे व भुरकट रंगाचे होत जातात. दाट कॅनोपी असलेल्या वेलीवर दमट हवामानामुळे बुरशीचे बिजाणू लवकर वाढतात.
असे करा व्यवस्थापन
द्राक्षावर भुरी या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आल्यास तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. द्राक्षवेलीवरील कॅनोपीच्या वाढीचे योग्यप्रकारे व्यवस्थापन केल्यास तसेच प्रकाश संश्लेषण नीट झाल्यास रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. यासोबतच बागेतील स्वच्छता, वेळेवर छाटणी आणि सल्फरची फवारणी केल्यास रोगावर नियंत्रण मिळण्यास मोठी मदत होते. भुरीच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही बुरशीनाशकांसोबत जैविक नियंत्रकांचा वापर केल्यास फायदा होवू शकतो.
ॲग्रोवर्ल्डचे 2024 मधील पहिले कृषी प्रदर्शन पिंपळगाव नगरीत.. । Agroworld Expo 2024।
अशी आहेत करप्याची लक्षणे
द्राक्ष पिकात कॉलेटोट्रिकम ग्लेओस्पोरॉईडीस किंवा एल्सिनॉई अंप्लिना या बुरशीमुळे करपा रोगाची लागण होते. द्राक्षाच्या पानावर बारीक ठिपके पडणे, ठिपक्यांची वाढ झाल्यावर ते एकमेकांत मिसळून पूर्ण पानं करपणे, मणी तडकणे अशी या रोगाची लक्षणे आहेत. सलग तीन ते चार दिवस 32 अंश सें.ग्रे. तापमान व पाऊस असल्यास या रोगाचा झपाट्याने प्रसार होतो. करपा या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगग्रस्त भाग छाटून नष्ट करावा. पिकांची काढणी झाल्यावर बुरशीग्रस्त भाग किंवा जुन्या रोगग्रस्त फांद्या नष्ट करून द्राक्षबाग स्वच्छ ठेवावी. करपा रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सप्टेंबर आणि ऑक्टोबर दरम्यान ट्रायकोडर्माची फवारणी उपयुक्त ठरते.
डिसेंबर महिन्यात घ्यावयाची काळजी
डिसेंबर महिन्यात होत असलेल्या वातावरणीय बदलांमुळे अवकाळी पावसाची शक्यता असते. त्यातच या महिन्यात थंडी मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने द्राक्ष या पिकाची विशेष काळजी घ्यावी लागते. थंडीमुळे दंव पडून ते द्राक्षांच्या घडांमध्ये साचून राहते. यामुळे फळकूज होण्याचे प्रमाण वाढते. यामुळे घडांची प्रत ढासळून आर्थिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी हे पाणी काढून घेणे गरजेचे असते. त्यासाठी सकाळी द्राक्षाच्या वेली हालवून ते पाणी काढून घ्यावे आणि नंतरच फवारणी करावी. ओलांडा पूर्णपणे कोरडा करून नंतरच बुरशीनाशकांची फवारणी करावी.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- कांदा बाजारभाव ; या बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक दर
- राज्यात रविवारपासून पुन्हा तीन दिवस अवकाळी पाऊस; उत्तर-मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याला तडाखा, विदर्भात ऑरेंज अलर्ट