यंदा जागतिक सफरचंद उत्पादन 12 वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आहे. खराब हवामान आणि खराब परागीकरणामुळे हा फटाका बसल्याचे मानले जात आहे. युरोप आणि चीनमधील सफरचंद पिकांना त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. भारतात हिमाचल प्रदेशातील उत्पादनही खालावण्याची भीती आहे.
चीन आणि अमेरिकेपाठोपाठ पोलंड, तुर्कस्तान आणि भारतात मोठ्या प्रमाणावर सफरचंद उत्पादन होते. याशिवाय, इराण, इटली आणि रशियातही चांगले सफरचंद उत्पादन होते. यंदा सर्वत्र लहरी हवामानाचा फटका बसला आहे. त्यामुळे सफरचंदाचे भाव चढे राहण्याची शक्यता आहे.
जोरदार पाऊस, उबदार हिवाळा ठरला घातक
तज्ज्ञांच्या मते, वर्षाच्या सुरुवातीपासूनच हवामान सफरचंद उत्पादनासाठी अनुकूल राहिलेले नाही. सफरचंदला फुलांच्या अवस्थेपूर्वी सुमारे 200-300 शीतकरण तास लागतात; परंतु बर्फाच्या कमतरतेमुळे, विशेषतः हिमाचलच्या कमी उंचीच्या भागात, थंड होण्याचे तास पूर्ण झाले नाहीत. विलक्षण उबदार हिवाळा आणि अवेळी पाऊस यामुळे हिमाचलच्या सफरचंद उत्पादनात यंदा घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या 3.36 कोटी बॉक्सच्या तुलनेत यंदा केवळ 1.77 कोटी सफरचंदाच्या पेट्या बाजारात आल्या आहेत, असे हिमाचल कृषी विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे.
खालावलेले तापमान, पुरेसा सूर्यप्रकाश नसल्याने बुरशी
फेब्रुवारी महिन्यात पिकांना चांगल्या बर्फाची गरज असताना हिमाचल राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. मार्चमध्ये सुरू होणार्या आणि एप्रिलपर्यंत सुरू राहणार्या फुलांच्या अवस्थेवरही गंभीर परिणाम झाला. कारण या कालावधीत राज्यात दीर्घकाळ पावसाची नोंद झाली. मोहोराच्या हंगामात 15°C तापमानाची आवश्यकता असते. मात्र, पावसाने तापमान 8°C पर्यंत खाली आणले. परागण आणि फलधारणेवर त्याचा परिणाम झाल्याचे परमार हॉर्टिकल्चर युनिव्हर्सिटीचे माजी सहयोगी संचालक एसपी भारद्वाज यांनी सांगितले. ते म्हणाले, “मातीतील उच्च आर्द्रता आणि सूर्यप्रकाशाच्या कमी संपर्कामुळे, बुरशीजन्य रोग उद्भवल्याने फळांच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम झाला. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना बुरशीनाशक फवारणीसाठी पुरेशी संधी मिळाली नाही. ”
चीनमध्येही प्रतिकूल हवामानाचा फटका
चीनमधील हवामानाच्या नुकसानामुळे जागतिक उत्पादन कमी होण्याची अपेक्षा आहे. ज्यामुळे जागतिक सफरचंद उत्पादन 12 वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहे. चक्रीवादळ गॅब्रिएलच्या प्रभावामुळे न्यूझीलंडमध्येही पिकांना फटका बसल्याने या क्षेत्राची चिंता वाढली आहे. युक्रेनमधील सफरचंद हंगामही कदाचित गेल्या दशकातील सर्वात कठीण होता. ब्रिटनमध्येही पुरेसे उत्पादन नसल्याने आयातीवर भर दिला जात आहे. दुसरीकडे, चीन, इराण आणि मोल्दोव्हा येथून निर्यात कमी होत असल्याने जागतिक बाजारपेठेवर परिणाम होत आहे.