भारतातील शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने तयार केलेले प्रमाणित बियाणे पुरवण्यासाठी एक नवीन सहकारी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे नाव भारतीय बियाणे उत्पादन सहकारी समिती, बीबीएसएसएल (BBSSL) असे आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी नुकतीच या समितीचे उद्घाटन केले.
गावोगावच्या विविध कार्यकारी सहकारी संस्था अर्थात विकास सोसायटीच्याच धर्तीवरील ही देशव्यापी संस्था प्रमाणित, शुद्ध बियाण्यांची गावातच उपलब्धता करून देईल. बनावट, अप्रमाणित अशा बोगस बियाण्यातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. खासगी कृषी सेवा केंद्र चालकांची मनमानी आणि लिंकिंगने होणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडवणुकीलाही यामुळे आळा बसू शकेल.
ICAR, इफको, कृभको, नाफेडचा संयुक्त उपक्रम
या समितीची स्थापना भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR), राष्ट्रीय सहकारी विकास निगम (NCDC), भारतीय किसान उर्वरक सहकारी लिमिटेड (इफको), कृषक भारती सहकारी लिमिटेड (कृभको) आणि भारतीय राष्ट्रीय कृषि सहकारी विपणन महासंघ (नाफेड) या संस्थांनी संयुक्तपणे केली आहे.
मिल्किंग मशीनचा वापर करा व दुग्धव्यवसायात वाढ करा । milking machine।
देशभरातील विकास सोसायटी, सहकारी संस्थांशी भागीदारी
बीबीएसएसएल समिती ही शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने तयार केलेले, उच्च दर्जाचे प्रमाणित बियाणे पुरवण्यावर लक्ष केंद्रित करेल. शेतकऱ्यांना बियाण्याचा पुरवठा करण्यासाठी देशभरातील विकास सोसायटी, सहकारी संस्थांशी या नव्या समितीची भागीदारी केली जाणार आहे. याशिवाय, ही समिती बियाणे उत्पादन, स्टोरेज, प्रोसेसिंग आणि पॅकेजिंगसाठी आवश्यक असलेली पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यातही मदत करेल. ही समिती बियाण्याच्या गुणवत्तेची हमी देण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणन आणि मार्केटिंगही करेल.
पारंपरिक बियाण्यांचे उत्पादन, संरक्षणातही शेतकऱ्यांना मदत
बीबीएसएसएल समिती ही पारंपरिक बियाण्यांचे उत्पादन आणि संरक्षण करण्यातही शेतकऱ्यांना मदत करेल. यामुळे शेतकऱ्यांना बियाण्यांच्या विविध वाणांची उपलब्धता होईल आणि त्यांना बियाण्यांसाठी बाजारपेठही मिळेल.
BBSSL समितीच्या स्थापनेमुळे देशातील कृषी उत्पादन वाढण्यास मदत होईल. तसेच, शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल.
BBSSL च्या लोगो, वेबसाइटचे अनावरण
केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी BBSSL च्या लोगो आणि वेबसाइटचे नुकतेच अनावरण केले. जागतिक बियाणे बाजारपेठेत भारताला एक प्रमुख स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बीबीएसएसएल भारतातील बियाणे संवर्धन, संवर्धन आणि संशोधन क्षेत्रात मोठे योगदान देईल, असे ते म्हणाले.
पारंपरिक बियाणे जपून येणाऱ्या पिढ्यांपर्यंत द्यायचेय : अमित शाह
अमित शाह यावेळी म्हणाले, “भारत जगातील अशा काही देशांपैकी एक आहे, जिथे शेती अधिकृतपणे सुरू झाली. या कारणास्तव आमचे पारंपारिक बियाणे गुणवत्ता आणि शारीरिक पोषणासाठी सर्वात योग्य आहेत. भारतातील पारंपारिक बियांचे संवर्धन करून ते येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोचवायचे आहे, जेणेकरून निरोगी धान्य, फळे आणि भाजीपाला यांचे उत्पादन सुरू राहावे आणि हे काम बीबीएसएसएलमार्फत केले जाईल. कृषी, फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय यासह इतर सर्व प्रकारच्या समित्यांप्रमाणे ही समिती विकास सोसायटी, सहकारी संस्थांना बीजोत्पादनाशी जोडण्याचे काम करेल.”
प्रत्येक शेतकरी बनू शकेल बियाणे उत्पादक
बीबीएसएसएलच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात बियाणे तयार करू शकतील, त्याचे प्रमाणीकरणही केले जाईल आणि ब्रँडिंग केल्यानंतर हे बियाणे संपूर्ण देशातच नव्हे तर जगभर पोहोचवण्यात ही समिती हातभार लावेल. या बियाणे सहकारी संस्थेचा संपूर्ण नफा थेट बियाणे उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जाईल आणि हाच सहकाराचा मूळ मंत्र आहे, असेही अमित शाह म्हणाले. या सहकारी संस्थेच्या माध्यमातून बियाण्यांची उच्च जनुकीय शुद्धता आणि शारीरिक शुद्धता कोणतीही तडजोड न करता राखली जाईल आणि ग्राहकांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाईल, या तीन गोष्टींचा मेळ घालून उत्पादन वाढवण्याचा आमचा उद्देश आहे. या सहकारी संस्थेचे उद्दिष्ट केवळ नफा कमावणे हा नसून या माध्यमातून भारताचे उत्पादन जगाच्या सरासरी उत्पादनाशी जुळवायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लहान शेतकरी, महिला, तरुणांना होणार मोठा फायदा
अमित शाह म्हणाले, की उत्पादन, गुणवत्ता, ब्रँडिंग आणि मार्केटिंग या क्षेत्रातील या संस्थांच्या यशस्वी अनुभवातून आम्ही बियाणे उत्पादन, संशोधन आणि विकास आणि निर्यात क्षेत्रात पुढे जाऊ. इंडियन सीड कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तसेच बियाणे उत्पादनात देशाला स्वावलंबी बनविण्यात आणि बियाणांच्या जागतिक बाजारपेठेत आपला वाटा वाढविण्यात मदत करेल. त्याचे सर्वात मोठे लाभधारक हे लहान शेतकरी, महिला आणि तरुण असतील. देशातील पीक पद्धती बदलण्यासाठी चांगल्या बियाण्यांचे उत्पादन करणे अत्यंत आवश्यक असून, जेव्हा आपण देशातील लाखो शेतकऱ्यांना बीजोत्पादनाशी जोडू, तेव्हा ते आपोआप गावात विपणन व्यवस्थापक म्हणून काम करतील.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇
- शेजारच्या शेतजमिनीतून बैलगाडीला मार्गासाठी सरसकट परवानगी; शेताकडील वहीवाटीचा रस्ता अडवल्याने त्रस्त लाखो शेतकऱ्यांना दिलासा
- नंदुरबार जिल्ह्यात निर्माण होणार जगातील पहिले, सर्वात मानवनिर्मित बांबूचे जंगल