जळगाव – पुणे येथील कृषी आयुक्तालयातील विस्तार व प्रशिक्षण संचालक दिलीप झेंडे यांनी आज ‘ॲग्रोवर्ल्ड’च्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यांच्या हस्ते गणरायांची आरती करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत ‘आत्मा’चे निवृत्त प्रकल्प संचालक अनिल भोकरे देखील होते.
दिलीप झेंडे यांनी ‘ॲग्रोवर्ल्ड’च्या टीमला मार्गदर्शनही केले. शेतकऱ्यांसाठी अतिशय तळमळीने काम करणाऱ्या ‘ॲग्रोवर्ल्ड’च्या सहकाऱ्यांचे त्यांनी मनापासून कौतुक केले.
शेतकऱ्यांनी सोयाबीन 750 कोटींचे बियाणे घरीच तयार केले
श्री. झेंडे यांनी कृषी निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाच्या संचालकपदावर कार्यरत असतांना 2020 मध्ये राज्यात पेरणीसाठी घरचे सोयाबीन तयार करण्याची मोहीम यशस्वीपणे राबविली होती. या मोहिमेचे फलित म्हणजे शेतकऱ्यांनी 750 कोटी रुपयांचे बियाणे स्वतःच घरी तयार करून वापरले. त्यांनी कृषी निविष्ठा व गुणनियंत्रण पदाचा कार्यभार हाती घेण्यापूर्वी राज्यभरातून सोयाबीन उगवणीबाबत तब्ब्ल दीड लाख तक्रारी होत्या. मात्र सोयाबीन बियाणे घरगुती वापराच्या मोहिमेनंतर या तक्रारी टप्प्याटप्प्याने कमी झाल्या. एवढेच नव्हे तर राज्यात सोयाबीनचा पेरा देखील वाढला.
‘स्कॉच ॲवॉर्ड’देखील मिळाला
श्री. झेंडे यांनी राज्यात ऑनलाइन परवाना प्रणालीची घडी बसवली. लॉकडाउनच्या काळात त्यांनी 12 हजार परवाने वाटले. त्यामुळे निविष्ठा उद्योगातील प्रतिनिधी काम करू शकले. राज्यात निविष्ठांची टंचाई झाली नाही. परिणामी शेतकऱ्यांची गैरसोय झाली नाही. त्यासाठी त्यांना ‘स्कॉच ॲवॉर्ड’देखील मिळाला. गुणनियंत्रण विभागात त्यांनी अनेक सुधारणा केल्या.
ड्रोनद्वारे लागवड, लेझरद्वारे तणनियंत्रण, सिंगापूरमध्ये प्रयोगशाळेत गाईच्या दुधाची निर्मिती – झेंडे
ॲग्रोवर्ल्डच्या टीम सोबत श्री. झेंडे यांनी एक तास संवाद साधला. कृषीतील जनुकीय बदलांपासून ते वातावरणातील बदल, भविष्यातील शेती, त्यातील आव्हाने व उपाय अशा विविध विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. आता ड्रोनच्या सहाय्याने फक्त फवारणीच नव्हे तर दुर्गम भागात लागवड देखील केली जात असून ती कशी केली जाते, त्यासाठी सिड्स बॉल व त्यालाच किमान सहा महिने पोषण मिळेल असे कोटींग बाऊल याचे उदाहरणही दिले. पिकांना खत व्यवस्थापन फवारणी तसेच तण नियंत्रणासाठी विकसित देशांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान व लेझरचा कसा वापर होत आहे, हे अचंबित करणारे प्रयोग देखील त्यांनी सांगितले. सिंगापूर सारख्या देशांमध्ये प्रयोगशाळेत गाईपासून मिळणाऱ्या दुधाप्रमाणेच दूध निर्मिती सुरू झाली असून त्याची चव, त्यातील फॅट व सर्व गुणधर्मासह अस्सल दुधाप्रमाणेच असल्याची नवीन माहिती त्यांनी दिली.
ॲग्रोवर्ल्ड शेती व शेतकऱ्यांसाठी करीत असलेल्या कार्याचेदेखील त्यांनी मनापासून कौतुक केले. तसेच जळगाव येथे 3 ते 6 नोव्हेंबर 2023 दरम्यान होणाऱ्या ‘ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शना’स उपस्थित राहण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी सर्व सहकाऱ्यांना दिले. टीम ॲग्रोवर्ल्डसोबत त्यांनी साधलेल्या मनमोकळ्या संवादामुळे आजचा दिवस निश्चितच सार्थकी लागल्याचे समाधान सर्व सहकाऱ्यांना लाभले.