तेजल भावसार
मुंबई : सध्या शेतकरी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. तसेच नवनवीन वाण शोधून त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन भरघोस उत्पादन घेत आहेत. त्यातच पुणे येथील अॅड. प्रा. गणेश हिंगमिरे यांनी एका लुप्त होणार्या वाणाला जीवदान दिले आहे.
अॅड. प्रा. गणेश हिंगमिरे हे पुण्याच्या गवळी आळीतले. घरची परस्थितीत अत्यंत गरिबीची. ते सहा वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांनी नगरपालिकेच्या लाईट खाली अभ्यास करून शिक्षण पूर्ण केले. उच्चशिक्षण घेऊन पुढे काहीतरी करण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या हिंगमिरे यांनी पानटपरीवर काम करून पैसा जमविला व उच्चशिक्षणासाठी इंग्लंड गाठले. येथे त्यांनी पेटंट कायद्याचा अभ्यास केला आणि त्यात तज्ज्ञ बनले. भात आंबेमोहर हे जुने वाण आहे. हे लुप्त होण्याच्या मार्गावर असतानाच अॅड. गणेश हिंगमिरे यांनी या जातीला पुनर्जीवन दिले.
अॅड. हिंगमिरे अॅग्रोवर्ल्डशी बोलताना असे म्हणाले की, भात आंबेमोहर या जातीचा शोध 2013 पासून मी घेत होता. अखेर हा शोध 2015 मध्ये लागला आणि मुळशीतल्या एका गावातील शेतकर्याकडे हे वाण भेटले. त्यानंतर 2016 मध्ये भात आंबेमोहराला जीआय टॅगिंग भेटली. भौगोलिक संकेताचा (Geographical Indication) वापर विशिष्ट भौगोलिक उत्पत्ती असलेल्या उत्पादनांसाठी केला जातो. अंबेमोहर हे वाण समजून घेण्यासाठी आणि स्विकारण्यासाठी खूप वेळ लागला. गेल्या 5 महिन्यांपासून शेतकर्यांनी त्यांच्या शेतात हे वाण लावायला सुरुवात केली आहे.
आंब्याच्या मोहोराचा सुगंध असतो म्हणूनच याला आंबेमोहर असे म्हणतात. उत्पादन कमी असल्याने लोणावळ्याजवळील तांदूळ संशोधन केंद्राने आंबेमोहर पालकत्वासह इंद्रायणी नावाचा संकरित प्रकार विकसित केला. यामुळे 1980 च्या उत्तरार्धात शेतकर्यांनी हे पारंपरिक धान्य सोडून दिले. आंबेमोहर तांदूळ हा पेशव्यांच्या आवडता होता असे देखील मानले जाते.
अॅड. हिंगमिरे सांगतात, शेतकर्यांनी हे वाण स्विकारले व आपल्या शेतामध्ये लावले, याला एकही रासायनिक खत वापरण्यात आले नाही. यात पूर्णपणे सेंद्रिय खत वापरण्यात आले आहे. संकरित भातापेक्षा याचा उगवणीचा काळ जास्त असतो. इतर भात रोपांपेक्षा याची दांडी मोठी असते. भात आंबेमोहर या वाणाचे उत्पादन संकरित भातापेक्षा कमी असले तरीही याचे गुणधर्म व उपाय अनेक आहेत. हे वाण घेत असताना असे काही घटक लक्षात ठेवले की, देशी पिकांना मान्यता मिळाले पाहिजे, मुळ वाणाला पूनर्जीवन, स्थानिक बाजारपेठ मिळणे व प्रिमीयम किंमत मिळणे.
असा आहे वाण घेण्याचा उद्देश व संदेश
आज कालची पिढी ही संकरित व तत्पर गोष्टींच्या आधीन गेली आहे तसेच आजारही अनेक वाढलेले आहेत. हे कमी करण्यास आपण आपले जुने वाण जपले पाहिजे. आपल्या जून्या परंपरांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देणे. अनेक केमिकल रसायने झाडावर व मातीवर वापरून मातीची उत्पादक क्षमता कमी केली आहे. ती वाढवण्यासाठी व जपण्यासाठी आपण पारंपरिक पद्धतीने शेती केली पाहिजे, अशी माहिती हिंगमिरे यांनी अॅग्रोवर्ल्डशी बोलताना दिली.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- जंबो भाजीपाला पिकविणारा ओमानमधील इंजिनियर शेतकरी
- हे जगातील सर्वात महाग फळ; किंमत इतकी की त्यात खरेदी करू शकाल 30 तोळे सोने!