जळगाव : खरीप हंगामाला सुरुवात झाली असली तरी पावसाअभावी अनेक ठिकाणी अद्याप पेरण्या खोळंबल्या आहेत. काही ठिकाणी शेतकर्यांकडून उशिराने कापूस लागवड केली जात आहे. उशिराने कापूस लागवड करायची असल्यास पसरणार्या वाणऐवजी उभे वाढणार्या वाणाची निवड करावी, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
मान्सून यंदा राज्यात वेळेवर दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला होता. परंतु, बिपरजॉय या वादळामुळे मान्सून लांबल्याने शेतकर्यांचा हिरमोड झाला. पाऊस लांबल्याने पेरण्या आणि लागवड देखील खोळंबल्या. त्यानंतर उशिराने का होईना? पाऊस येईल, अशी आशा शेतकर्यांना होती. मात्र, राज्यातील अनेक भागात अद्याप गरजेइतका पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक भागात अजूनही पेरण्या झालेल्या नाहीत. विशेषत: कापसाची लागवड लांबल्याने कापूस उत्पादक शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.
कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग 👇
कमी दिवसात येणार्या वाणाचा शोध
लागवडीस उशिरा झाल्याने अनेक शेतकर्यांकडून कमी दिवसात उत्पादन येणार्या वाणाचा शोध घेतला जात आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, कापूस लागवड केल्यानंतर त्याला 140 ते 160 दिवसाचा कालावधी लागणारच आहे. त्यामुळे शेतकर्यांनी कापसाऐवजी पर्यायी पिकांची लागवड करावी, असा सल्ला देखील तज्ज्ञांनी दिला आहे.
तूर, बाजरी उत्तम पर्याय
ज्या शेतकर्यांनी अद्याप कापसाची लागवड केलेली नाही, मात्र कापूस लागवडीचा विचार सुरु असेल तर अशा शेतकर्यांनी कापूस ऐवजी तूर किंवा बाजरी पिकाची लागवड किंवा पेरणी करावी. किंवा कापूस लागवड करायचीच असेल तर त्यात आंतरपिक, मिश्रपिक घ्यावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
गुलाबी बोंड अळीची शक्यता
कापूस या पिकावर आधीच मररोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. उशिराने कापूस लागवड केल्यास त्यावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होवू शकते. त्यामुळे शेतकर्यांनी पर्यायी पिकाची लागवड करावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
टोमॅटोला ‘या’ बाजार समितीमध्ये मिळतोय सर्वाधिक दर
https://eagroworld.in/tomato-fetches-the-highest-price-in-this-market-committee-11-7-2023/
या वाणाची करा निवड
कापूसऐवजी तूरची लागवड करायची असल्यास तूरीचे निर्मल 900 किंवा निर्मल तुळजा तर बाजरीची पेरणी करायची असल्यास निर्मल 5423, निर्मल 4506, किंवा निर्मल 2494 या वाणाची निवड करता शेतकर्यांना करता येईल.
बाजरीची लागवड करा – मिलींद कुलकर्णी
कापसाची आता लागवड केल्यास त्याची वाढ चांगली होणार नाही. तसेच गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्यांनी कापूसऐवजी तूर किंवा बाजरीची लागवड करावी. बाजरी हा सर्वोत्तम पर्याय असेल.
– मिलींद कुलकर्णी, वरिष्ठ शास्त्रज्ञ,
निर्मल सिड्स प्रा. लि.
उभे वाढणार्या वाणाची करा निवड
कापसाची आता लागवड केली तरी 140 ते 160 दिवसाचा कालावधी लागणार आहे. कापसाची लागवड करायचीच असेल तर पसरणार्या वाण ऐवजी उभे वाढणारे वाण निवडावे. लागवडीचे अंतर कमी करावे तसेच आंतरपिक किंवा मिश्रपिक ताबडतोब घ्यावे.
– अनिल भोकरे, सेवानिवृत्त,
कृषी उपसंचालक, कृषी विभाग, जळगाव