मुंबई : देशाने पावसाची सरासरी ओलांडली, असली तरी राज्यात अजूनही 23 टक्के तूट आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) यंदाच्या आतापर्यंतच्या नैऋत्य मोसमी पावसाच्या (Monsoon) आकडेवारीनुसार, 29 जिल्ह्यात जूनही सरासरीहून कमीच पाऊस दिसत आहे. संपूर्ण राज्यही एकत्रित पावसाच्या तुटीच्या श्रेणीत असून विभागनिहायही सर्वच विभाग तुटीत आहेत. गोवा वगळल्यास कोकण विभागात मात्र पावसाची सरासरी गाठली गेली आहे.
राज्यात 1 जूनपासून 10 जुलै अखेरपर्यंत सरासरीपेक्षा 23 टक्के कमी पाऊस नोंदविला गेला आहे. राज्यात पावसाळी हंगामात 10 जुलैपर्यंत सरासरी 310.70 मिलीमीटर पाऊस होतो. यंदा मात्र फक्त 240.50 मिमी पाऊस झाला आहे. याशिवाय, मान्सूनच्या वाटचालीवरील ‘एल निनो’चे संकट अजूनही कायम आहे.
राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा 23 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. विशेषत: मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र विभागात सरासरीपेक्षा बराच कमी पाऊस नोंद झाला आहे. हवामान खात्याच्या मध्य महाराष्ट्र विभागात पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्राचाही समावेश होतो. खान्देशातील नंदुरबार, धुळे, जळगावसह, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर हे 9 जिल्हे हवामान खात्याच्या मध्य महाराष्ट्र विभागात येतात. सध्या देशभरात जोरदार पाऊस पडत आहे. मात्र, त्याची तीव्रता तुलनेने दर वर्षीपेक्षा कमी आहे. याशिवाय, राज्यातील काही विशिष्ट भागातच हवामान जोरदार पावसासाठी पोषक असल्याने तिथेच एकत्रित जास्त पाऊस कोसळतो आणि जिल्ह्याची व विभागाची सरासरी गाठली जाते. सरासरी गाठली गेली तरी उर्वरित बहुतांश भाग प्रत्यक्षात पावसाविनाच राहतो.
मान्सूनच्या पावसावर यंदा एल निनोचा प्रभाव दिसत आहे. प्रशांत महासागरात एल निनो स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा देशात दरवर्षीपेक्षा मान्सूनचा कमी पाऊस पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. “आयएमडी”ने गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या पावसाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार मात्र देशात यंदा नेहमीच्या सरासरीइतका पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. त्यासाठी आयओडी म्हणजेच इंडियन ओशन डायपोल हा हिंदी महासागरातील घटकही अनुकूल असण्याची गरज आहे. तशी परिस्थिती अजून निर्माण झालेली दिसत नाही.
कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग 👇
https://youtu.be/vJ7zM35MvpM
पुर्वानुमानानुसार महाराष्ट्रात फारशा पावसाची शक्यता नाही
पुढील 4 आठवड्यांसाठीचा दीर्घकालीन अंदाज 6 जुलै रोजी हवामान खात्याने जाहीर केला होता. त्यानुसार 7 ते 13 जुलै हा पहिला आठवडा आता संपत आला आहे. या आठवड्यात कोकणात चांगला तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी चांगल्या पावसाचे अनुमान होते. 14 जुलैपासून 20 जुलैपर्यंत मात्र बहुतांश महाराष्ट्रात फारशा पावसाची शक्यता नाही. 21-27 जुलैदरम्यान राज्यात सर्वत्र चांगला पाऊस राहू शकेल. त्यानंतर पुढच्या आठवड्यात 28 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान मात्र पावसाचे प्रमाण पुन्हा कमी होऊ शकेल. अर्थात “आयएमडी”ने हे पूर्वानुमान जाहीर केल्यानंतर बंगालच्या उपसागरात नवी मान्सून प्रणाली निर्माण होत आहे. या बदलणाऱ्या स्थितीमुळे दीर्घकालीन अंदाजात मोठा फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यातील विभागनिहाय पावसाची तूट
1. संपूर्ण राज्य : सरासरी – 310.70 मिलिमीटर, प्रत्यक्ष – 240.50 मिमी (23% तूट).
2. मराठवाडा : सरासरी – 159.40, प्रत्यक्ष – 68.70 (-57%)
3. विदर्भ : सरासरी – 218.30, प्रत्यक्ष – 116.20 (-47%).
4. मध्य महाराष्ट्र (खान्देश, पश्चिम महाराष्ट्रसह) : सरासरी – 193.20, प्रत्यक्ष – 118.60 (-39%).
5. कोकण (गोव्यासह) : सरासरी – 885.50 मिमी, प्रत्यक्ष – 792.10 मिमी (11% तूट).
राज्यातील जूनपासून 10 जुलैपर्यंतचा जिल्हानिहाय एकूण पाऊस
सरासरीहून खूपच कमी पाऊस
(60% किंवा त्याहून अधिक तूट)
1. हिंगोली : सरासरी – 241 मिलिमीटर, प्रत्यक्ष – 42 मिमी (83% तूट).
2. सांगली : सरासरी – 161, प्रत्यक्ष – 47 (-71%).
3. अकोला : सरासरी – 210, प्रत्यक्ष – 66 (-68%).
4. जालना : सरासरी – 183 मिमी, प्रत्यक्ष – 71 मिमी (61% तूट).
सरासरीहून कमी पाऊस
(21% ते 60% तूट)
1. सातारा : सरासरी – 281 मिलिमीटर, प्रत्यक्ष – 142 मिमी (49% तूट).
2. बुलढाणा : सरासरी – 197, प्रत्यक्ष – 105 (-47%).
3. चंद्रपूर : सरासरी – 300, प्रत्यक्ष – 163 (-46%).
4. सोलापूर : सरासरी – 129, प्रत्यक्ष – 73 (-43%).
5. वाशीम : सरासरी -246, प्रत्यक्ष – 140 (-43%).
6. उस्मानाबाद : सरासरी – 167, प्रत्यक्ष – 97 (-42%).
7. बीड : सरासरी – 169, प्रत्यक्ष – 101 (-40%).
8. मुंबई शहर : सरासरी – 821, प्रत्यक्ष – 501 (-39%).
9. वर्धा : सरासरी – 254, प्रत्यक्ष – 159 (-37%).
10. अमरावती : सरासरी – 231, प्रत्यक्ष – 146 (-37%).
11. गडचिरोली : सरासरी – 342, प्रत्यक्ष – 219 (-36%).
12. नांदेड : सरासरी – 218, प्रत्यक्ष – 140 (-36%).
13. यवतमाळ : सरासरी – 251, प्रत्यक्ष – 169 (-33%).
14. कोल्हापूर : सरासरी – 575, प्रत्यक्ष – 392 (-32%).
15. औरंगाबाद : सरासरी – 168, प्रत्यक्ष – 120 (-29%).
16. परभणी : सरासरी – 199, प्रत्यक्ष – 141 (-29%).
17. अहमदनगर : सरासरी – 146, प्रत्यक्ष – 105 (-28%).
18. पुणे : सरासरी – 286, प्रत्यक्ष – 210 (-27%).
19. जळगाव : सरासरी – 178 मिमी, प्रत्यक्ष – 134 मिमी (25% तूट).
सरासरीपेक्षा थोडासा कमी पाऊस :
(20% पर्यंत तूट)
1. रत्नागिरी : सरासरी – 1210 मिलिमीटर, प्रत्यक्ष – 993 मिमी (18% तूट).
2. नागपूर : सरासरी – 271, प्रत्यक्ष – 226 (-16%).
3. नाशिक : सरासरी – 255, प्रत्यक्ष – 223 (-13%).
4. सिंधुदुर्ग : सरासरी – 1240, प्रत्यक्ष – 1134 (-9%).
5. धुळे : सरासरी – 175, प्रत्यक्ष – 163 (-7%).
6. नंदुरबार : सरासरी – 245, प्रत्यक्ष – 240 (-2%).
7. रायगड : सरासरी – 1040 मिमी, प्रत्यक्ष – 1023 मिमी (2% तूट).
सरासरीपेक्षा थोडा जास्त पाऊस :
(20% पर्यंत अतिरिक्त)
1. लातूर : सरासरी – 190 मिलिमीटर, प्रत्यक्ष – 196 मिमी (3% अतिरिक्त).
2. भंडारा : सरासरी – 288, प्रत्यक्ष – 325 (+12%).
3. गोंदिया : सरासरी – 314, प्रत्यक्ष – 342 (+9%).
4. लातूर : सरासरी – 190, प्रत्यक्ष – 196 (+3%).
5. ठाणे : सरासरी – 754 मिमी, प्रत्यक्ष – 904 मिमी (20% अतिरिक्त).
सरासरीहून बराच अधिक पाऊस :
(21% किंवा त्याहून जास्त पाऊस)
1. मुंबई उपनगर : सरासरी – 842 मिलिमीटर, प्रत्यक्ष – 1044 मिमी (24% अतिरिक्त).
2. पालघर : सरासरी – 685 मिमी, प्रत्यक्ष – 950 मिमी (+39%).