सेंद्रिय स्लरी ही पिकाला खूप फायद्याची ठरत आहे. सेंद्रिय स्लरी म्हणजे विविध सेंद्रिय स्रोतांपासून बनविलेले द्रावण. ज्यामध्ये पिकास उपयुक्त असे सर्व अन्नद्रव्ये तसेच घटक पुरेशा प्रमाणात असतात. तसेच ही स्लरी पर्यावरण पूरक असल्याने जमिनीचे आरोग्य जपण्यास उपयुक्त आहे. या प्रकारची स्लरी शेतात वापरल्याने जमिनीमधील सूक्ष्म जिवाणू कार्यक्षम होतात, त्यांना ऊर्जा मिळते व या जिवाणूंमुळे जमिनीमधील अन्नद्रव्ये पिकास उपलब्ध होतात. नत्र युक्त जिवाणू स्लरीमुळे हवेतील अन्न शोषले जाऊन ते पिंकाना फायदेशीर ठरते. त्यामुळे सेंद्रिय स्लरीकडे शेतकर्यांचा कल वाढत असून ते शेतीसाठी अमृत ठरत आहे.
जिवाणू स्लरीमुळे अतिद्रव्य स्वरूपातील स्फुरद विरघळुन पिंकाना उपल्बध करून दिले जाते. सेंद्रिय पदार्थांची जलद विघटन शमता वाढते. या उपयुक्त जीवाणूंना उत्तेजित करण्याचे महत्वाचे काम सेंद्रिय स्लरी करत असते. बियाण्यांची उगवन क्षमता वाढते. पिकांची जोमदार वाढ होऊन व रोगप्रतिकारक क्षमता वाढते. जमिनीचा पोत सुधारतो. रासायनिक खतावरील खर्चात कपात होते. हे जिवाणू नैसर्गिक आहेत म्हणून त्याचा जमिनीवर व पिकावर जास्त मात्रेने दुष्परिणाम होत नाही. ही स्लरी शेतकरी स्वतः बनवू शकतो. ती सध्या तरी बाजारात उपलब्ध नाही.
कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग
https://youtu.be/vJ7zM35MvpM
सेंद्रिय स्लरीमुळे होणारे प्रमुख फायदे
सेंद्रिय स्लरीचा वापर केल्याने जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मामध्ये सुधारणा होते. जमिनीतील पोकळी वाढते व हवा खेळती राहण्यास मदत होते. स्लरीमुळे ममिनरलायझेशनफ (ऑरगॅनिकचे इन ऑरगॅनिकमध्ये रुपांतर होणे) क्रिया लवकर होते. कारण हेच इनऑरगॅनिक स्वरुपातील अन्नद्रव्य पीक घेत असते. स्लरीमुळे जमिनीचा कर्ब-नत्र गुणोत्तर टिकून राहतो. महाराष्ट्रातील बहुतांश जमिनीमध्ये कॅल्शियम कॉर्बोनेटचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे पिकांच्या मुळ्यांमध्ये अंतर्गत अडथळे निर्माण होतात व झाड वाळते. सेंद्रिय स्लरी दिल्यास ही समस्या येत नाही.
स्लरी बनविण्याची पद्धत
स्लरी बनविण्यासाठी आपल्या जनावरांच्या गोठ्यात मलमुत्र साठवण्याची सोय असावी. जनावरांचे ताजे शेण उन्हात न ठेवता सावलीत ठेवावे. स्लरी तयार करण्यासाठी सिमेंटची 300 ते 400 लिटर टाकी असावी. स्लरी बनवतांना 20 किलो शेण, 10 लिटर गोमुत्र, 200 ते 250 लिटर पाणी सिमेंटच्या टाकीत टाकून चांगले व्यवस्थित मिसळून घ्यावे.
स्लरीचे प्रकार
स्लरींचे मुख्य चार प्रकार आहेत. त्यात मुख्य अन्नद्रव्यांची स्लरी, सूक्ष्म अन्नद्रव्यांची स्लरी, जीवाणूंची स्लरी आणि कडधान्य स्लरी अशा स्लरी प्रकारांचा समावेश आहे.
1) मुख्य अन्नद्रव्यांची स्लरी
या स्लरीमुळे रासायनिक खते पिकास लवकर लागू होतात व त्यांची कार्यक्षमता वाढते. मुख्य अन्नद्रव्यांच्या स्लरी वापरामुळे पांढर्या मुळींची भरपूर वाढ होते. त्याचप्रमाणे ही स्लरी मुख्य अन्नद्रव्यातील स्फुरदाचे स्थिरीकरण कमी करण्यास मदत करते तसेच नत्राचे बाष्पीभवन होत नाही.
मुख्य अन्नद्रव्यांची स्लरी बनविण्याची पध्दत (साधारण 300 ते 350 फळ झाडांसाठी) ताजे शेण 20 किलो + जनावरांचे मुत्र 10 लिटर + निंबोळी पेंड 15 किलो + युरिया 5 किलो + सिंगल सुपर फॉस्फेट 10 किलो + पोटॅश 5 किलो वरील सर्व मिश्रण 200 ते 250 लिटर पाण्यामध्ये मिसळावे. साधारणपणे 25 दिवसात एकदा प्रति झाड एक लिटर या प्रमाणात वापर करावा.
2) सूक्ष्म अन्नद्रव्यांची स्लरी
अन्नद्रव्य उदा. जस्त व स्फुरद जमिनीमध्ये तसेच दिल्यास ते पिकाला पुर्णतः उपलब्ध न होता जमिनीत दुसर्या स्वरुपामध्ये स्थिर होतात. म्हणुनच शक्यतो सूक्ष्म अन्नद्रव्य जमिनीतून देत असताना स्लरीच्या स्वरुपात द्यावे. सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्यांची स्लरी खालील प्रमाणे बनवाची.
सूक्ष्म अन्नद्रव्यांची स्लरी बनविण्याची पध्दत
ताजे शेण 20 किलो + जनावरांचे मुत्र 10 लिटर + निबोळी पेंड 15 किलो + झिंक सल्फेट 5 किलो + फेरस सल्फेट 3 किलो + मँगनीज सल्फेट 2 किलो + कॉपर सल्फेट 100 ग्रॅम + बोरॉन 30 ग्रॅम. वरील सर्व मिश्रण 200 ते 250 लिटर पाण्यामध्ये मिसळावे व ही स्लरी दिवसातून दोन वेळेस चांगली हलवावी. साधारणपणे महिन्यातून एकदा तरी प्रति झाड एक लिटर या प्रमाणात वापर करावा.
3) दुय्यम अन्नद्रव्यांची स्लरी
या स्लरीमध्ये दुय्यम अन्नद्रव्यांचा वापर केला जातो. दुय्यम अन्नद्रव्यांची स्लरी बनविण्यासाठी ताजे शेण 20 किलो + जनावरांचे मुत्र 10 लिटर + निंबोळी पेंड 15 किलो + कॅल्शियम 15 किलो + मॅशियम 15 किलो + गंधक 10 किलो याचे मिश्रण तयार करावे. सर्व मिश्रण 200 ते 250 लिटर पाण्यामध्ये मिसळावे व ती स्लरी दिवसातून दोन वेळेस चांगली हलवावी. सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्यांच्या स्लरी वापरामध्ये 10 ते 12 दिवसांचे अंतर ठेवावे. साधारणपणे महिन्यातुन एकदा तरी प्रति झाड 1 लिटर या प्रमाणात वापर करावा.
4) जिवाणू स्लरी
या पद्धतीच्या स्लरीमिश्रणामध्ये विविध उपयुक्त जिवाणूंचा समावेश असतो. जिवाणू स्लरी बनविण्यासाठी ताजे शेण 10 किलो + जनावरांचे मुत्र 20 लिटर + काळा गुळ 2 किलो अँझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धक 500 ग्रॅम + पोटॅश मोबिलायझर जीवाणू संवर्धक 500 ग्रॅम + फॉस्फेट सोल्यूबलायझर जिवाणू संवर्धक 500 ग्रॅम + इ.एम. (Effective Microorganism) द्रावण 1 लिटर + जैविक बुरशीनाशके 1 किलो घ्यावे. या सर्व घटकांचे मिश्रण करुन ते मिश्रण 200 ते 250 लिटर पाण्यामध्ये मिसळावे. शक्यतो जैविक खते आणि रासायनिक किटक बुरशीनाशके एकत्र वापरु नयेत.
जिवाणू स्लरी वापरण्याचे फायदे
जिवाणू स्लरी मुळे हवेतील नत्र शोषले जाऊन ते पिकांना उपलब्ध करून दिले जाते. अविद्राव्य स्वरुपातील स्फुरद विरघळवून पिकांना उपलब्ध करून दिला जातो. सेंद्रिय पदार्थांचे जलद विघटन होते. बियाण्याच्या उगवण क्षमतेत व पिकांच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते. जमिनीचा पोत सुधारतो. रासायनिक खतांवरील खर्चात कपात होते. हे जिवाणू नैसर्गिक असल्याने जमिनीवर व पिकांवर जास्त मात्रा वापरल्याने देखील त्याचा दुष्परीणाम होत नाही.
5) कडधान्य स्लरी (एक एकर क्षेत्रासाठी कडधान्य स्लरी)
या स्लरीमध्ये वेगवेगळया कडधान्यांचा वापर केला जातो. कडधान्य स्लरी बनविण्यासाठी ताजे शेण 20 किलो + जनावराचे मुत्र 10 लिटर + ह्युमीक अॅसिड व व्हर्मीवॉश 2 लिटर + भरडा कडधान्य प्रत्येकी 1 किलो (मूग, चवळी, हरभरा, मसुर वाटाणा, उडीद) + इ.एम. द्रावण 2 लिटर. वरील सर्व मिश्रण 200 ते 250 लिटर पाण्यामध्ये मिसळावे. स्लरी द्रावण हे 5 ते 6 दिवस ठेवावे. दररोज सकाळी नियमीत हे द्रावण दोन मिनीट हलवून घ्यावे व 7 व्या दिवशी जमिनीतून पिकाला आळवणी (ड्रेचिंग) करावी. ही स्लरी एक एकर क्षेत्रासाठी वापरावी. अशा प्रकारे विविध सेंद्रिय स्लरीचा शेतकर्याने आपल्या शेतात वापर केल्यास तो नक्की फायद्याचा तसेच पर्यावरण पूरक ठरेल आणि शेतीसाठी सेंद्रिय स्लरी जणू अमृतच ठरेल.
प्रा. मयुरी देशमुख
मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव