मुंबई : बायर क्रॉपसायन्स या आघाडीच्या जर्मन ॲग्रीटेक कंपनीने येत्या 2 वर्षात महाराष्ट्रासह मध्य व पूर्व भारतातील जाळे मजबूत करण्याचे ठरविले आहे. Bayer BLF (बेटर लाईफ फार्मिंग) म्हणजेच “सर्वोत्तम जीवनास पूरक शेती”च्या माध्यमातून 2025 पर्यंत देशातील 20 लाख छोट्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषी सेवा पोहोचवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट्य आहे.
बायरने 2018 मध्ये “बीएलएफ” योजना राबवायला सुरुवात केली. या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचन आणि पीक सल्ल्याबरोबरच वित्तसहाय्य केले जाते. याशिवाय, सर्वोत्तम कृषी पद्धतीबाबत मार्गदर्शन केले जाते. सध्या 1,700 केंद्रांच्या माध्यमातून भारतात सहा लाख शेतकरी “बायर बीएलएफ”चा लाभ घेत असल्याची माहिती कंपनीचे सीईओ दुराईस्वामी नारायण यांनी “ॲग्रोवर्ल्ड”ला दिली. बीएलएफ केंद्रे तांदूळ, बाजरी, मका यासह विविध पिके व भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकर्यांना या शेतमालाचे एकत्रीकरण आणि मार्केटिंगसाठी सहाय्य प्रदान करतात.
बायर क्रॉपसायन्सने 2025 पर्यंत देशातील 20 लाख छोट्या व अल्पभूधारक शेतकर्यांना बीएलएफ उपक्रमाअंतर्गत आणण्याची योजना आखली आहे. उत्तम जीवन शेती (BLF) कार्यक्रमात विविध शेती सेवांचा समावेश आहे. इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन, अॅक्सिस बँक, नेटाफिम, यारा, देहात, अॅग्री बझार आणि बिग बास्केट या कंपन्या आणि कर्ज पुरवठादारांच्या सहकार्याने शेतकऱ्यांना सक्षम केले जाईल.
बड्या कंपन्यांशी भागीदारी, शेतमालाला चांगला भाव
विक्रीतील जोखीम कमी करण्यासह शेतकर्यांना शेतमालास चांगला भाव मिळवून देण्यासाठी बायर सहकार्य करत आहे. कंपनी लहान शेतकर्यांना तसेच छोट्या समूहांना शेतमाल खरेदी करणार्या कंपन्यांशी थेट जोडत आहे. त्यामुळे उत्पादनाची चांगली किंमत मिळून शेतकरी सक्षम होत आहेत.
बायरने शेतकरी, प्रोसेसर, व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांसह अनेक पातळ्यांवर भागीदारी केली आहे. सध्या रिलायन्स फ्रेश, एलटी फूड्स , आयटीसी , नेस्ले , मॅक केन, पेप्सिको, ग्रीनयार्ड, मदर डेअरी, बिग बास्केट, यासह आघाडीच्या कॉर्पोरेट्स तसेच फॉर्च्युन राईस, पुरंदर हाईलँड्स आणि सह्याद्री अशा अनेक शेतकरी उत्पादक संघटनांशी (FPO) हातमिळवणी केली आहे.
Food Chain PartnerShip मधून शेतकऱ्यांना मदत
कृषी पिकांच्या देशांतर्गत पोषण गरजांची पूर्तता करणे, हा बायर बीएलएफ कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यातून जोडल्या गेलेल्या सर्व शेतकरी, भागीदारांना उत्पादन वाढ आणि निर्यातयोग्य उत्पादनासाठी बायर मदत करत असल्याचे सीईओ नारायण यांनी सांगितले.
कंपनीने सध्या ‘फूड चेन पार्टनरशिप’ उपक्रमांतर्गत सुमारे 70 आघाडीच्या खाद्य कंपन्यांशी सहकार्य करार केले आहेत. सध्या या कंपन्यांना आवश्यक फळे, भाजीपाला आणि इतर पिकांचे उत्पादन घेण्यासाठी तसेच निर्यात वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना चांगल्या शेती पद्धती वापरण्यास सक्षम केले जात आहे. ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी पुनरुत्पादक शेतीद्वारे मदत केली जात आहे.
Bayer BLF : Better Life Farming 1,700 केंद्रे सध्या कार्यरत
बायर बीएलएफ केंद्रे ग्रामीण कृषी-उद्योजकांद्वारे चालवली जात आहेत. प्रत्येक केंद्रातून 500 ते 1,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना सेवा पुरवली जाते. चार ते पाच केंद्रांच्या क्लस्टर्समध्ये असलेल्या मॉडेल फार्मद्वारे शेतकर्यांना संपूर्ण तंत्रज्ञान दाखवले जाते. त्यासाठी कृषीशास्त्रज्ञांचीही मदत घेतली जाते.
सध्या उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये 1,700 Better Life Farming केंद्रे कार्यरत आहेत. आता देशाच्या मध्य आणि पूर्वेकडील भागात उपक्रमाचा विस्तार केला जाणार आहे. त्यातून या भागातील छोट्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठी मदत होऊ शकेल..
जागतिक स्थिरता उपक्रमाचा एक भाग म्हणून बायरने 2030 पर्यंत विकसनशील देशांतील एक कोटींहून अधिक छोट्या व अल्पभूधारक शेतकर्यांना सक्षम करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.