कानपूर : Potato Farming… उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. परंतु सध्या सगळीकडे या उलट परिस्थिती पाहावयास मिळत आहे. घरची चांगली शेती असतांनाही आजचा तरुण शेती सोडून नोकरीच्या मागे धावतांना दिसत आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील भंवरपाल सिंह हे याला अपवाद आहेेत. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेवून तसेच युपीएससी यासारख्या नागरी सेवेचा अभ्यास करुनही शेतीलाच आपले करिअर म्हणून निवडले आणि त्यात यशस्वी देखील झाले. भंवरपाल हे शंभर एकर शेतीत बटाट्याचे उत्पादन घेत आहेत. या बटाट्याच्या लागवडीने त्यांना चांगल्या उत्पन्नासह मान सन्मानही मिळवून दिला आहे.
उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील सरसौल तालुक्यातील महुआ गावात भंवरपाल सिंह वास्तव्यास असून त्यांनी सन 1987 मध्ये त्यावेळचे इलाहाबाद व सध्याचे प्रयागराज येथे कायद्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी युपीएससीच्या अभ्यासाची तयारी सुरु केली. मात्र, 1992 मध्ये त्यांनी हे सर्व सोडून गावी परतले आणि शेती करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी गहू, मिरची आणि तांदळाची लागवड केली. काही वर्ष याची शेती केल्यानंतर भंवरपाल सिंह यांनी 2000 साली बटाट्याची शेती करायला सुरुवात केली आणि त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते सन्मान
भंवरपाल सिंह यांनी शेती क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीची दखल केंद्र व राज्य सरकारने देखील घेतली आहे. गहू, मिरची आणि तांदूळाची लागवड केल्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या विषयी बोलतांना भंवरपाल सांगतात की, मला या आधी देखील मला अनेक पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. परंतु, ऑक्टोंबर 2013 मध्ये करण्यात आलेला सन्मान स्मरणात राहणारा आहे. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील 500 जिल्ह्यातील 500 शेतकर्यांना सन्मानित केले होते. त्यामध्ये माझा देखील सन्मान करण्यात आला. हा माझ्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस होता, असे ते सांगतात.
एकाच वेळी काढणी
भंवरपाल सिंह सध्या 80 से 100 एकर क्षेत्रात बटाट्याची शेती करीत आहेत. ते जितकी लागवड करतात तितकीचे ते काढणीच्या वेळी काढून घेतात. शेतात मिळालेल्या यशाबाबत बोलतांना ते सांगतात की, शेतात कोणत्याही पिकाची लागवड करतांना त्याचा दिर्घकालिन कार्यक्रम बनवून घ्यावा. कोणत्याही प्रकारची शेती करतांना ती कमीत कमी पाच ते दहा वर्षांपर्यंत करायचीच आहे, हे ठरवून घ्या. असा सल्ला ते देतात. आजची युवा पिढी ही शेतीपासून लांब जात आहे, हे शेतीसाठी चांगले संकेत नाहीत, अशी खंत व्यक्त करतांना ते म्हणतात की, युवा पिढी शेतीकडे वळली तरच शेतीमध्ये नवनवे तंत्रज्ञान येईल. सध्या इतक्या मोठ्या प्रमाणात नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहे. कृषी क्षेत्राशी संबंधित मोबाईल अॅप्स्, यु-ट्युब चॅनेलस आहेत. त्यामुळे कोणतीही माहिती जाणून घेण्यासाठी संशोधकांकडे जाण्याची गरज नाही. काही वेळातच घर बसल्या माहिती मिळत असल्याचेही ते सांगतात.
बटाट्याची शेती अत्यंत सोपी
बटाटा लागवडीसाठी हिमाचल प्रदेशातील शिमला स्थित केंद्रीय बटाटा संशोधन संस्था देखील शेतकर्यांना मदत करत आहे. ही संस्था त्या-त्या परिसरानुसार रोग प्रतिबंधक वाण विकसीत करीत आहे. जेणेकरून शेतकर्यांना कमी खर्च लागवा. बटाट्याच्या शेतीसाठी मशिनरी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. कमीत कमी वेळेत अधिक उत्पादन देणारे वाण उपलब्ध आहेत. बटाट्याचे पिक हे 90 ते 100 दिवसात काढणीसाठी तयार होवून जाते. बटाट्याची शेती करणे खुप सोपे आहे, याचबरोबर उत्पादन देखील मोठ्या प्रमाणावर होते. आज देशातील प्रत्येक नागरिकाच्या ताटात मग तो उत्तर, दक्षिण असो की पूर्व, पश्चिम प्रत्येकाच्या ताटात बटाट्याची आवश्यकता आहे.
कमीत कमी दरातही कमाई
बटाट्याच्या दरा विषयी बोलतांना भंवरपाल सिंह सांगतात की, 2014 मध्ये बटाटा 20 ते 25 रुपये किलो दराने तर 2017 मध्ये तोच बटाटा दोन रुपये किलो दराने विकला गेला. आपण सरासरी दर पकडला तरी देखील दोन लाख रुपये प्रती हेक्टर कमाई होते, असेही ते सांगतात.