आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे, त्यामुळे आजही अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन शेतीच आहे. याशिवाय उद्योगधंदे देखील अवलंबून आहेत. त्यामुळे शेती आणि उद्योगधंदे यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे. त्यासाठी विविध योजना देखील शासनाकडून राबविल्या जात आहेत. अशाच काही योजनांपैकी अरोमा मिशन ही देखील एक योजना असून या योजनेच्या माध्यमातून औषधीय आणि सुगंधीत वनस्पतीचे उत्पादन घेणार्या शेतकर्यांना शेती करण्याबरोबर प्रक्रीया करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. या मिशनच्या माध्यमातून शेतकर्यांच्या जिवनात प्रगतीचा सुगंध आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. चला तर मग जाणून घेवूया काय आहे ही योजना.
आपला देश हा विविधतेने नटलेला देश आहे. जसे काही अंतरावर बोलीभाषा किंवा राहणीमान बदलते तसेच त्या-त्या भागाच्या वातावरणात बदल देखील जाणवतो. त्यामुळे त्या-त्या भागातील शेतकरी तिथल्या वातावरणानुसार पारंपारिक पिकांची लागवड करीत असतो. पारंपारिक पिके घेण्याच्या सवयीत शेतकरी अडकल्यामुळे अनेकदा नुकसान होते. जास्तीचे उत्पादन होवून भाव कमी मिळतो. ज्याप्रमाणे केळी, कापूस, गहू, तांदूळचे उत्पादन घेतले जाते तसे काही भागात औषधी आणि सुगंधीत वनस्पतींचे उत्पादन घेतले जाते. शेतकरी उत्पादीत करीत असलेल्या शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी व चांगला दर मिळावा यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, अरोमा मिशन यांसारख्या विविध योजना राबवित आहे.
अरोमा म्हणजे सुगंध… जे शेतकरी औषधी आणि सुंगधीत वनस्पतीचे उत्पादन घेत आहेत. अशा शेतकर्यांचे उत्पन्न वाढीसाठी हे अरोमा मिशन राबविले जात आहे. केंद्र शासनाच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (उडखठ) संचलित औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्था या मिशनचे नेतृत्व करीत आहे. या मिशनअंतर्गत औषधी आणि सुंगधीत वनस्पतीचे उत्पादन घेणार्या शेतकर्यांना शेतीविषयी माहिती, रोपे तसेच प्रशिक्षण दिले जात आहे. एवढेच नव्हे तर शेतकर्यांनी उत्पादीत केलेल्या मालावर प्रक्रिया आणि मार्केटींगसाठीही सहकार्य केले जात आहे.
काय आहे अरोमा मिशन
अरोमा मिशन विषयी बोलतांना औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्थेचे संचालक डॉ. प्रबोध कुमार त्रिवेदी सांगतात की, अरोमा मिशनच्या माध्यमातून शेतकर्यांचे उत्पन्न वाढविण्याबरोबर उद्योगांना कशी मदत करता येईल, यासाठी प्रयत्न करीत आहोत. औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्था (उखचअझ) तसेच इतर काही अशा संस्था आहेत ज्यांनी सुगंधीत वनस्पतींची उच्चप्रतीचे वाण विकसीत केले असून ते शेतकर्यांपर्यंत देखील पोहोचविले आहे. तसेच शेतकर्यांना या सुगंधीत वनस्पतींची शेती कशी करावी, या वनस्पतींवर प्रक्रिया केल्यानंतर जे तेल निघत आहे ते कंपन्यांपर्यंत कसे पोहोचवावे, याबाबत देखील प्रशिक्षण दिले जात असल्याचे डॉ. प्रबोध कुमार त्रिवेदी सांगतात. आजच्या घडीला औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्था अरोमा मिशनच्या माध्यमातून 24 राज्यातील शेतकर्यांसोबत काम करीत आहे. शिवाय 3 हजार शेतकर्यांचे क्लस्टर देखील सुरु झाले आहेत. यामुळे सुगंधित पिकावर चांगल्याप्रकारे काम होवून फायदा झाल्याचेही ते सांगतात.
600 टन लेमन ग्रास ऑईल निर्यात
केंद्र शासनाच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (उडखठ) संचलित औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्था या मिशनचे नेतृत्व करीत आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या सर्व प्रयोगशाळा औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्थेच्या नेतृत्वात शेतकर्यांसाठी अरोमा मिशन अंतर्गंत काम करीत आहेत. पुढे बोलतांना डॉ. त्रिवेदी सांगतात की, लेमन ग्रास (गवती चहा), जिरेनियम, मेंथा यांसारख्या पिकांची शेती केल्यामुळे आता बाहेरच्या देशांमधून तेल आयात करावे लागत नाही. मेंथाच्या बाबतीत सांगायचे तर गेल्या अनेक वर्षांपासून भारत याचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातक आहे. लेमन ग्रास बाबत सांगायचे तर आतापर्यंत आपण त्याची आयात करीत होतो, परंतु यंदा 600 टन पेक्षा जास्त लेमन ग्रास ऑईल आपण एक्सपोर्ट केले आहे. यामुळे लेमन ग्रास ऑईलचे सर्वात मोठे एक्सपोर्ट म्हणून आपण पुढे आले आहोत.
प्रशिक्षणासह सहकार्य…
इतर पिकांच्या जाती देखील आम्ही शेतकर्यांना दिल्या आहेत. दिल्याच नाही तर त्याची शेती कशी करावी याच्या प्रशिक्षणासोबत पिक काढल्यानंतर त्यावर प्रक्रिया कशी करावी, याचे देखील प्रशिक्षण दिले आहे. एवढेच नाही तर शेतकर्यांना सुगंधील ऑईलशी संबंधीत कंपन्यांशी देखील जोडले. अरोमा मिशनच्या माध्यमातून शेतकर्यांना फक्त बियाणे, रोपे आणि प्रशिक्षण दिले जात नाहीये तर मालावर प्रक्रिया आणि मार्केटींगला देखील एकच व्यासपीठावर आणत आहोत.
शेतकरी आणि उद्योग दोघांसाठी व्यवस्था
पुढे बोलतांना डॉ. त्रिवेदी सांगतात की, शेतकरी आणि उद्योग यांन आम्ही एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपला शेतमाल कोण खरेदी करीत आहे. उद्योगांच्या मागणीनुसार शेती केली पाहिजे, हे शेतकर्यांना माहीत असले पाहिजे. अरोमा मिशनमध्ये शेतकरी आणि उद्योग दोघांसाठी व्यवस्था आहे. अरोमा मिशनचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकरी आणि व्यापारी यांना संस्थेच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. नोंदणी झालेले शेतकरी, व्यापारी आपआपसात संवाद देखील साधू शकतील, असेही ते सांगतात.
उत्पन्नात वाढ
अरोमा मिशनच्या माध्यमातून आम्ही अशा काही आदिवासी भागांपर्यंत पोहोचलो, ज्या ठिकाणी जाणे कठीण होते. काही भाग तर असेही होते ज्या ठिकाणी जायला रस्ता देखील नव्हता. अशा ठिकाणांपर्यंत आमचे शास्त्रज्ञ पोहोचले. अशा ठिकाणी पोहचून आम्ही सुगंधित पिकांची शेती करुन त्यांच्या उत्पन्नात कशा प्रकारे वाढ होवू शकते, याबाबत मार्गदर्शन केले व त्यामुळे आम्ही देशभरात 20 क्लस्टर बनविले आहेत.
पुर आणि दुष्काळग्रस्त भागांना फायदा
पुढे माहिती देतांना डॉ. त्रिवेदी सांगतात की, आम्ही ईशान्यकडील राज्यांमध्ये देखील पोहोचले आहोत. आमचे शेतकर्यांना सांगणे आहे की, पारंपारिक शेती तर करतच आहात. परंतु पुर आणि दुष्काळग्रस्त भागात खस सारख्या पिकांची शेती करा. आसाममधील माजुली द्विपवर जिथे वर्षातील जास्तीत जास्त महिने पाणी भरलेले असते. अशा ठिकाणी शेतकरी खसची शेती करीत आहेत. आज देखील असे काही सुगंधीत तेल आहे जे बाहेरील देशांमधून आयात करावे लागते. जसे की जिरेनियम. 90 टक्के जिरेनियम आज देखील बाहेरुन आयात केले जाते. अरोमा मिशनच्या पुढील भागात आमचा या पिकांवर काम करण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचेही ते सांगतात.