मुंबई : Weather Update… राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची श्यक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या मुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीतील काम उरकून घ्यावी असे, आवाहन देखील हवामान विभागाकडून केले जात आहे.
मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड, वाढते बांधकाम यांसारख्या कारणांमुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. या सर्वांचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर तसेच शेती उत्पादनावर देखील झाला आहे. राज्यातील शेतकऱ्यांची एका संकटातून होत नाही तोच आणखी एक संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दि.5 ते 6 मार्च रोजी वादळी पाऊस तर 7 ते 8 मार्च रोजी काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
या जिल्यात पावसाचा अंदाज
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार 5 मार्च रोजी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर 6 मार्चला विदर्भात सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच उत्तर कोकणात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात सुद्धा कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार शनिवार आणि रविवारी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक हलक्या सरी, मेघगर्जना याचा अंदाज आहे. अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये रविवारी आणि सोमवारी हलक्या सरींची शक्यता आहे. सोमवारी ठाणे जिल्ह्यातही हलक्या स्वरुपातील पाऊस पडू शकतो. तर मुंबईमध्ये मात्र ढगाळ वातावरण असले तरी अद्याप पावसाचा अंदाज वर्तवलेला नाही.
देशातील या भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता
येत्या 24 तासांत जम्मू-काश्मीरमधील काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या हिमस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे. गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, लडाख, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील काही भागात पुढील 24 तास हलक्या ते मध्यम स्वरूपाची हिमवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वाढवण्यात आली आहे.
मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये पावसाच्या गडगडाची सुरुवात होऊ शकते. तर राजस्थान आणि गुजरातच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडुन वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, डोंगराळ भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी
राज्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज असून ढगाळ वातावरण देखील आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी झाली की लागलीच पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करणे गरजेचे आहे. शेतीमालाची सुरक्षा ही महत्वाची आहे. शिवाय या वातावरणामुळे शेतातील पिकांवर रोगराई पसरण्याचा धोका आहे. शेतातील काढणी आणि लागलीच मळणी कामे उरकून घेण्याचा सल्ला कृषितज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.