दिलीप तिवारी, ज्येष्ठ पत्रकार, जळगाव
जैन उद्योग समुहाने साधारणतः २३ वर्षांपूर्वी पांंढरा कांदा पिकासाठी ‘करार शेती’ हा नवा पर्याय समोर आणला. सन १९९९/२००० मध्ये त्याची व्याप्ती प्रायोगिक स्तरावर बाबई (मध्यप्रदेश) येथील केवळ ५०० एकरवरील पांंढरा कांदा पिकासाठी होती. आज महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यात १२ हजार एकरवर पांढरा कांदा लागवड करार शेतीतून होत आहे. ५ हजार शेतकरी यात सहभागी आहेत. जैन कृषितंत्र आणि विकास केंद्राच्या तज्ज्ञांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांचे प्रती एकरी पांंढरा कांदा उत्पादन वाढले आहे. पूर्वी प्रती एकरामधून सरासरी ५ ते ६ मेट्रीक टन कांदा उत्पादन घेणारा शेतकरी आज प्रती एकर सरासरी १० मेट्रीक टन उत्पादन घेत आहे. या बरोबरच पांंढरा कांदा खरेदीचा प्रती किलो ७ रूपये हमी भाव निश्चित आहे.
महाराष्ट्रासह लगतच्या राज्यातील शेतकऱ्यांना शेतीतील प्रगत तंत्रज्ञान व सुधारित पीक लागवड पद्धती दाखविण्यासाठी जैन इरिगेशन सिस्टीम लिमीटेडच्या जैन कृषितंत्र आणि विकास केंद्रातर्फे सध्या ज्ञान संवर्धन यात्रा सुरू आहे. या उपक्रमाचा प्रारंभीचा हेतू पांंढरा कांदा लागवडबाबत माहिती देणे हा होता. नंतर मात्र सर्वच पिकांची माहिती देण्यासाठी विस्तारित नियोजन झाले. आज सर्वच पिकांसाठी आधुनिक शेतीची माहिती शेतकरी घेत पाहणी करून घेत आहे.
करार शेती विभागाचे प्रमुख श्री. गौतम देसरडा यांनी पांढरा कांदा लागवड विषयी २३ वर्षांची माहिती देत करार शेतीचे लाभ सांगितले. बाबई येथील करार शेतीचे निष्कर्ष समोर आल्यानंतर दिनांक २३ मे २००१ ला जैैन उद्योग समुहाचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी करार शेतीविषयी समुहातील सहकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर करार शेतीचे नियोजन सुरू झाले. करार शेती ही पांढरा कांदा उत्पादनासाठी करण्याचे ठरले. शेतकरी वर्गाने यात सहभागी व्हावे म्हणून कांद्याचा खरेदी हमी भाव प्रती किलो ३ रूपये देण्याचे ठरले. तेव्हा बाजारात कांदा प्रती किलो दीड ते २ रूपये होता. त्यामुळे जैन समुह भविष्यात ३ रूपये भाव देईल का ? ही शंका शेतकऱ्यांत मनांत होती.
जैन उद्योग समुहाने प्रारंभी फक्त रब्बी कांदासाठी करार शेती सुरू केली. करारात शेतकऱ्यांसाठी लाभाच्या अनेक बाबी समाविष्ट केल्या. त्यात हमी भाव देणे, जोड कांदा सुद्धा त्याच हमी भावात खरेदी करणे, आहे त्या वजनात म्हणजे जड कांदा सुद्धा खरेदी करणे आणि कांदा उत्पादनासाठी सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करणे या चार बाबी थेट शेतकऱ्यांच्या लाभाच्या आजही आहेत. याशिवाय जैन कृषितंत्र आणि विकास केंद्राने पांढरा कांदा उत्पादनासाठी ‘जेव्ही १२’ हे वाण प्रस्तावित केले आहे. जैन उद्योग समुहातील कांदा प्रक्रिया प्रकल्पास वर्षभरात दीड लाख मेट्रीक टन कांदा लागतो. तो करार शेतीच्या माध्यमातून आजही पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. काही वेळा बाजारातून आहे तसा पांढरा कांदा खरेदी करावा लागतो. म्हणूनच जैन उद्योग समुहाने कांदा विषयावरील सर्व संशोधन शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी खुले केले आहे. पांढरा व लाल कांदा लागवडीचे संपूर्ण तंत्रज्ञान, त्याच्या वापरातून केलेली जवळपास ८० वर वाणांची थेट लागवड, त्याचे वाढीव उत्पादन याची माहिती कृषीतज्ज्ञ रोज देत आहेत.
कांदा लागवडीत शेतकऱ्यांसाठी पूरक तंत्राचा शोध सतत घेतला जात आहे. आधुनिक शेती ही कमी मनुष्यबळ वापराची, पिकांसाठी गरजेएवढेच पाणी देण्याची आणि योग्य तेवढेच खत पिकांच्या मुळाशी दिले जावे अशा तंत्रावर आधारलेली आहे. याच हेतूने जैन कृषितंत्र आणि विकास केंद्राने बैलजोडीचलीत यंत्राचा वापर करून बियाणे पेरणी करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याला पाणी देण्यासाठी ठिबक वा तुषार संच वापरले जातात.
करार शेतीचा मूळ उद्देश मानवाला हानीकारक रासायिक किटकनाशकांचा पीकांवरील वापर थांबविणे आणि निर्यातक्षम कांदा उत्पादन काढणे हा आहे. यासाठी शेतकऱ्यांना थेट शिवारात मार्गदर्शन करण्यासाठी कृषी पदवीकाधारक ‘५० जैन ग्रामसेवक’ कार्यरत आहेत.
पूर्वी शेतकरी हाताने बियाणे टाकून रोपे निर्मिती करीत असे. त्यात रोपांची वाढ एकसारखी होत नसे. ही रोपे वाफा पद्धतीे लागवड करावी लागत. पाणी वापर भरपूर करावा लागत असे. हे सारे तंत्र आता जैन कृषितंत्र आणि विकास केंद्राने बदलले आहे. यातून शेतकऱ्यांना वाढीव कांदा उत्पादनाचा लाभ मिळतो आहे. जैैन उद्योग समुहाने आता कांद्यासोबत लाल टमाटा, हळद आणि अद्रक उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांशी शेतकऱ्यांशी करार करणे सुरू केले आहे.
कांदा उत्पादकांच्या अपेक्षा …
कांदा उत्पादनाशी संबंधित संशोधनात काही सुधारणांची अपेक्षा शेतकरी करीत आहे. शेतकऱ्याला नेहमी शुद्ध बियाणे हवे. कमी दिवसात कांदा हाती यावा असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकर्यांची सर्वांत महत्वाची सूचना म्हणजे, कांदा काढणीसाठी उत्तम तंत्र वा यंत्र तयार करावे. अशा यंत्र वापरामुळे भविष्यात कांद्याचे कमी नुकसान होऊन जैन उद्योग समुहाला उत्तम प्रतीचा कांदा पुरवठा करता येईल.