दिलीप तिवारी, ज्येष्ठ पत्रकार, जळगाव
जैैन उद्योग समुहातील कृषी संशोधन आणि पीक प्रात्यक्षिक शिवार भेटी, पाहणी आणि शंका निरसनासाठी शेतकर्यांची कृषीज्ञान संवर्धन, अभ्यास यात्रा सुरू झालेली आहे. जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय सहसंचालक श्री. अजीत जैन यांच्या संकल्पनेतून रोज हजार शेतकऱ्यांना संशोधन व प्रात्यक्षिक शिवारात आणले जात आहे. १५ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना ही संधी आहे.
कृषीज्ञान संवर्धन यात्रेत येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी आपापले पारंपरिक, अर्धवट आधुनिक, नवतंत्रात गरजेनुसार केलेले जुगाड व इतर अनुभव बाजूला ठेवायला हवेत. सुमारे सहा ते आठ तासांच्या पाहणी दौऱ्यात नवे तंत्र पाहणे, अनुभवणे आणि त्याविषयी उत्सुकतेने प्रश्न विचारायचा दृष्टिकोन स्वतःमध्ये अगोदर निर्माण करावा. नवे पाहून, माहित करायचे आहे नंतर माझ्या शेतात वापरायचे आहे हा निश्चय करायला हवा. केवळ पाहणी करीत सहलीच्या सारखे आटोपायला नको.
जैन कृषी संशोधनाचे क्षेत्र सन १९८७ च्या सुमारास अवघे ४० एकर होते. ते आज २२०० एकरात विस्तारले आहे. अशा अवाढव्य शेती संशोधन व प्रात्यक्षिक क्षेत्रात शेतकऱ्यांना आठ वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित शेती तंत्राविषयी माहिती मिळते. पाहणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी या संकल्पना समजून घ्याव्यात. त्यासाठी तेथील कृषी संशोधकांकडून माहिती घ्यावी. श्री. बी. डी. जडे (वरिष्ठ कृषी विद्या शास्त्रज्ञ तथा कृषी विस्तार-प्रशिक्षणाचे प्रमुख) यांनी या संदर्भात नेमके मुद्दे समोर ठेवले.
‘जैन’ मधील कृषीज्ञान संवर्धन, अभ्यास यात्रेत काय पाहावे ? यासाठी खालील आठ संकल्पना, त्याच्याशी संबंधित प्रात्यक्षिके सर्व शेतकऱ्यांनी आवर्जून पाहावीत व समजून घ्यावीत. ती खालील प्रमाणे –
१) Water Management (पिकांना पाणी देण्याचे व्यवस्थापन, पद्धती) – यात प्रामुख्याने ठिबक (Drip) आणि तुषार (Sprinkle) सिंंचन पद्धती आणि त्यातील अत्याधुनिक सुधारणा. स्वयंचलीत ठिबक सिंचन यंत्रणा (Automation) पाहणे, ठिबक सिंचनातूून पाण्यात विरघळणारी खते व्हेंचुरी, फर्टिलाझर टॅॅन्क मधून देणे गरजेचे आहे. ठिबक पद्धतीत केळीला एक ऐवजी दोन नळ्या का ? आधुनिक कांदा लागवड गादी वाफा/ बेड पद्धती वर का? जैैन ॲक्यूरेन, रेनपोर्ट स्प्रिंकलर का ? असे प्रश्न विचारायला हवेत.
२) Nutrients Management (पिकांना विद्राव्य स्वरूपात अन्नद्रव्य देण्याचे व्यवस्थापन – फर्टीगेशन) – यात सिंचनासाठी वापरलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विद्राव्य रूपातील खते नेमक्या मात्रेत व थेट मुळांशी कशी देतात ? हे समजून घ्यावे. हे तंत्र भविष्यातील शेती पद्धतीची नवी दिशा दर्शवते.
३) Ultra High Density (पिकांची अती घनदाट लागवड) – फळझाडे लागवड पूर्वी विरळ पद्धतीने होत असे. ‘जैन’ मधील संशोधनात काही पिकांसाठी गादी वाफा /बेड करून पिकांची जवळ जवळ लागवड केली आहे. यालाच अती घनदाट लागवड म्हणतात. कमी जागेत जास्त झाडे लावून, त्यांची वाढ व विस्तार नियंत्रीत करून जादा उत्पन्न घेता येते हे येथे दिसते. हा प्रयोग समजून घ्यायला हवा.
४) Future Farming (भविष्यातील शेती) – भविष्यातील शेतजमीन कमी झाली तर केवळ पाणी, हवा व माती विना शेती कशी करता येईल ? याचेही उत्कंठावर्धक प्रात्यक्षिक पाहता येते. आंबा, पेरू, चिकू, संत्रा, बटाटा लागवडीचे प्रात्यक्षिक पाहताना उत्पादन वाढीची आकडेवारी समोर येते.
५) Tissue Culture (ऊती संवर्धित रोप लागवड) – यात केळी, डाळींंब, स्ट्रॉबेरी लागवड पद्धतींविषयी माहिती मिळते. केळी संशोधनासाठी ‘जैन’ च्या संशोधन शाळा व प्रात्यक्षिक शिवार हे माहितीचे आगार आहेत. ऊती संवर्धित रोपांची वेगवेगळी मालिकाच आहे.
६) Sweet Oranges मोसंबी) – खाणे आणि ज्यूूससाठी सर्वाधिक वापरात असलेल्या मोसंबी लागवड तंत्राची माहिती उत्सुकता वाढवणारी आहे.
७) Hi Tech Plant Factory (अत्याधुनिक तंत्रावर आधारलेली रोपवाटीका) – भाजीपाला, फळे, औषधी-फुल-शोभेची आणि सुगंधी झाडांची रोपे निर्मिती करणारी रोपवाटिका पाहता येते.
८) Crop Demonstration (पीक लागवड प्रात्यक्षिके) – ‘जैन’ मध्ये कांदा पिकाच्या ८२ विविध जातींची प्रगत तंत्रावर लागवड, केळीच्या ५ प्रकारच्या जाती, तसेच मोसंबी, डाळिंब, चिकू आदी फळांचे विविध प्रकार पाहता येतात. या शिवाय पेरू, सिताफळ, पपई, मिरची, टमाटे, बटाटा या पिकांची रोपे, लागवड, उत्पादन याची भन्नाट माहिती व अफलातून प्रात्यक्षिके पाहता येतात.
पाहणीनंतर सुरूची भोजन होते. त्यानंतर प्रश्नोत्तराचे सत्र असते. शेतकऱ्यांना काय पाहिले ? काय नवीन आहे ? काय बदलायला हवे ? उत्पादनातील तफावत किती ? अशा मूलभूत प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञांकडून मिळतात. तेथे तज्ञ मंडळी श्री. जडे, श्री. देसर्डा, श्री. ढाके, श्री. बर्हाटे हे माहिती देतात.
ता. क. – ‘जैन’ च्या कृषी संशोधन शिवार पाहणीसाठी शेतकर्यांनी आपल्या गाव-शहरातील कृषी वितरकाकडे संपर्क करावा त्यांच्या माध्यमातून पुढील सेवा-संधी मिळत आहेत …