तंत्रज्ञान / हायटेक

‘जैन’ चे कृषी संशोधन शिवार सर्व शेतकऱ्यांसाठी झाले खुले.. भाग – 1

दिलीप तिवारी

जळगाव : जैन उद्योग समुहांतर्गत कृषी क्षेत्राशी संबंधित विविध प्रयोग व नवतंत्र शोधशाळा असून प्रयोगांचे परिणाम दर्शविणारे पिकांचे प्रात्यक्षिक शिवार आहेत. गेल्या तीन दशकात नवे वाण वा ऊती संवर्धित रोपे, लागवड वा रोपण पद्धती, अत्याधुनिक यंंत्र-तंत्राचा वापर, जलसिंचनाच्या ठिबक-तुषार या सुधारित पद्धती, द्रवरूप खते, पीक वाढीसाठी शेेडनेेट, ग्रीन हाऊस, पीक संरक्षणाचे तंत्र, उत्पादन वाढ, साठवणूक आणि विक्री या बाबत ठराविक पिकांसाठी मर्यादित शेतकऱ्यांना मार्गदर्शन, पाहणी, तंत्रप्रदान व इतर सहकार्य जैन उद्योग समुह करीत आला आहे. हे कार्य अविरत सुरूच आहे.

गेल्या चार दिवसांपासून जैन उद्योग समुहाने कृषी संशोधनाचे शिवार शेतकऱ्यांसाठी स्थळ भेट, पाहणी, निरीक्षण, शंका निरसन आणि स्वीकृती यासाठी खुले केले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसोबत लगतच्या राज्यातील जवळपास एक हजार शेतकरी जैनच्या कृषी संशोधन शिवारात येत आहेत. ही एक प्रकारे ‘कृषीज्ञान यात्रा’ ठरली आहे.

Jain Irrigation

शेतकरी वर्ग केळी, कांदा, फळझाडे, भाजीपाला, तृणधान्ये आदी पिकांचे नवतंत्र वापरून उत्पादन घेत असला तरी त्यात काही प्रमाणात पारंपारिक सवयी कायम आहेत. नवतंत्रात काही कमी खर्चाचे आणि जुगाड करणारे बदल शेतकरी परस्पर करीत आहे. अशा स्थितीत कृषी विषयक नवतंत्राच्या शोधातून प्रात्यक्षिक शिवारात मिळणारे उत्पन्न आणि शेतकऱ्यांच्या शेत शिवारात मिळणारे उत्पन्न यात काही तफावत दिसत आहे. मोजकेच शेतकरी नवतंत्र परिपूर्ण वापरून वाढीव उत्पन्न घेत आहेत.

दुसरीकडे शेत जमिनीचे प्रमाण झपाट्याने कमी होते आहे. वाढीव नागरी वसाहती, वाढते औद्योगिकीरण रस्ते-रेल्वे-विमानतळ, सिंचन प्रकल्प यात जाणारी शेत जमीन, अती खते, रसायने वापरामुळे पोत खराब होऊन नापीक होणारी व भाऊबंदकी हिस्सेदारीत वाटली जाणारी शेतजमीन या कारणांमुळे भविष्यात एकर वरून गुंठेवारी आणि भविष्यात स्क्वेअर फुटावर शेत जमिनीची विभागणी होईल. अशा स्थितीत कमी जागेत, कमी पाण्यात, कमी खर्चात, कमी श्रमात अत्यंत प्रगत नवतंत्र वापरून अधिकाधिक उत्पन्न देणारी शेती करावी लागणार आहे.

Sunshine Power Of Nutrients

जैन उद्योग समुह याच विषयांवर सतत आणि अखंडपणे काम करीत आहे. अनेक कृषी संशोधक, अभ्यासकांनी शेतीचे नवतंत्र विकसित केले आहे. यांत्रिक शेतीचे अनेक पर्याय विकसित आहेत. त्यांचे प्रात्यक्षिक, परिणाम व वाढीव उत्पादन पाहणे, अनुभवणे यासाठी ‘जैन’ चे कृषी संशोधन शिवार सर्व शेतकऱ्यांसाठी खुले झाले आहे. येत्या १५ मार्चपर्यंत महाराष्ट्रातील कुठलेही व इतर राज्यातील शेतकरी ‘जैन’ चे कृषी संशोधन शिवार पाहू शकतील. तेथील अभ्यासकांना प्रश्न व शंका विचारू शकतील …

मी स्वतः आज या कृषीज्ञान यात्रेत सहभागी झालो. ‘जैन’ च्या कृषी विषयक संशोधनाचे व त्यानुसार प्रात्यक्षिकांसह शिवार पाहून मी स्तंभित झालो आहे. जे काही पाहिले-अनुभवले त्याविषयी आज हा परिचयात्मक लेख लिहिला. उद्यापासून शेतीतील नवतंत्र व प्रात्यक्षिक या विषयी स्वतंत्र भाग लिहीणार आहे …

ता. क. – ‘जैन’ च्या कृषी संशोधन शिवार पाहणीसाठी शेतकर्‍यांनी आपल्या गाव-शहरातील कृषी वितरकाकडे संपर्क करावा त्यांच्या माध्यमातून पुढील सेवा-संधी मिळत आहेत …

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button