गुजरात : E- Tractor… देशात अनेक ठिकाणी डिझेलच्या किंमतींनी देखील पेट्रोलप्रमाणे शंभरी पार केली आहे. त्यामुळे शेतात वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरवरील खर्च वाढला आहे आणि शेतकऱ्याची कमाई घटली आहे. ही परिस्थिती पाहता गुजरातमधल्या एका शेतकऱ्याने घरीच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर तयार केला आहे. चला तर मग बघुया या ई- ट्रॅक्टरमध्ये काय खासियत आहे.
सर्वात आधी सेंद्रिय शेतीला केली सुरुवात
जामनगरचे रहिवासी असलेले ३४ वर्षीय महेश भुत हे लहानपणापासूनच वडिलांना शेतीत मदत करत असायचे. वडिलांसोबत काम करताना शेतीतील अडचणी कमी करण्याचा विचार त्यांच्या मनात होता आणि 2014 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर, जेव्हा ते पूर्णपणे शेतीमध्ये गुंतले तेव्हा त्यांनी कीटकनाशके आणि खतांचा खर्च कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय ट्रॅक्टरची देखभाल आणि पेट्रोल-डिझेल वरही खूप खर्च होत असल्याचे पाहून त्यांनी स्वतः ई-ट्रॅक्टर (E- Tractor) बनवला. त्याचा ‘व्योम’ नावाचा ट्रॅक्टर सध्या खूप चर्चेत आहे.
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8
इतका खर्च करून बनवले ई- ट्रॅक्टर (E- Tractor)
महेश यांना आतापर्यंत देशभरातून सुमारे २१ ई-ट्रॅक्टर्सच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, महेश हे ना इंजिनियर आहेत, ना कोणत्याही मोठ्या शहरात राहतात. गावात राहत असताना त्यांनी सुमारे पाच लाख रुपये खर्च करून हा ई-ट्रॅक्टर बनवला आहे.
एका वृत्त संस्थेशी बोलताना ते म्हणतात, “माझे वडील सुशिक्षित शेतकरी होते. त्यामुळेच ते नेहमी शेतीतील गुंतवणूक आणि वर्षअखेरीस होणारे फायदे याबद्दल अंदाज लावत असायचे. मी त्यांच्याकडून शेती शिकलो आणि त्यांच्याकडूनच जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी खर्च कमी करायला शिकलो आहे.
शेतीतील खर्च कमी करण्यासाठी घेतला शोध
वास्तविक, ई-ट्रॅक्टर बनवण्याचा विचार त्यांच्या मनात नेहमीच होता आणि ते त्या दिशेने काम करत होते. अनेक प्रयोग करूनही समाधान न मिळाल्याने त्यांनी उत्तर प्रदेशातून ई-रिक्षा बनवण्याचे प्रशिक्षण घेण्याचा विचार केला. ते शाहजहानपूर (उत्तर प्रदेश) येथून ई-रिक्षा बनवायला शिकले.
असे ठेवले ई-ट्रॅक्टरचे नाव
प्रशिक्षण घेतल्यानंतर 2021 मध्ये त्यांनी ई-ट्रॅक्टर्स अधिक जोमाने बनविण्यावर भर दिला. त्यांनी हा ट्रॅक्टर नव्या पद्धतीने बनवण्यास सुरुवात केली. ट्रॅक्टरच्या बॅटरीपासून ते त्याच्या बॉडीपर्यंत सर्व काही त्यांनी स्वतः बनवले आहे. जवळपास सात महिन्यांच्या मेहनतीनंतर आणि अनेक प्रयत्नांनंतर अखेर त्यांना यश मिळाले. गेल्या चार महिन्यांपासून ते त्यांच्या शेतात या ई-ट्रॅक्टरचा वापर करत आहेत. त्यांनी त्यांच्या मुलाच्या नावावरून ट्रॅक्टरचे नाव ‘व्योम’ ठेवले आहे.
काय खास आहे या ट्रॅक्टरमध्ये ?
हा ट्रॅक्टर त्यांनी एका अॅपसह देखील जोडला आहे. ज्यामुळे तुम्हाला ट्रॅक्टरची सर्व माहिती मिळेल. बॅटरी किती चार्ज केली जाते? कोणत्या वायरची समस्या आहे? ही सर्व माहिती तुम्हाला अॅपवरूनच मिळेल. महेश सांगतात, जेव्हा ट्रॅक्टर बिघडतो तेव्हा तुम्हाला अॅपवरून कळेल की बिघाड कुठे आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती करणेही सोपे जाते. याशिवाय मी त्यात रिव्हर्स गिअरही दिले आहेत, जेणेकरून कधी ट्रॅक्टर कुठेतरी अडकला तर ते बाहेर काढणे सोपे जाईल.
एक तास चालवायचा खर्च फक्त 15 रुपये
महेश यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याची रचना केली आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना जास्त त्रास सहन करावा लागणार नाही. फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, पूर्वी एका तासासाठी डिझेल ट्रॅक्टर चालविण्यासाठी सुमारे 125 रुपये खर्च येत होता, तर इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्टर केवळ 15 रुपये प्रति तास चालतो.
होय, ते खरेदी करताना तुम्हाला सुरुवातीला थोडा जास्त खर्च करावा लागेल. साधारण ट्रॅक्टर तीन लाखांच्या आसपास बाजारात उपलब्ध आहेत तर महेश यांनी ‘व्योम’ ट्रॅक्टरची किंमत 5 लाख रुपये ठेवली आहे. तसेच महेश सांगतात की, सरकारने ई-ट्रॅक्टरला सबसिडी दिली तर त्याची किंमत आणखी कमी होऊ शकते. महेश यांनी बनवलेले ई-ट्रॅक्टर पाहण्यासाठी सध्या अनेक लोक त्यांच्या शेतात येत असतात. त्यांना देशभरातून 21 पेक्षा जास्त व्योम ट्रॅक्टरच्या ऑर्डरही मिळाल्या आहेत.
ट्रॅक्टरचे नाव व फीचर्स
• या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे नाव ‘व्योम’ आहे.
• ट्रॅक्टरची क्षमता 22 एचपी आहे.
• ट्रॅक्टर 72 वॅट लिथियम बॅटरीद्वारे चालतो.
• ट्रॅक्टरची बॅटरी उत्तम दर्जाची असल्याने सतत बदलण्याची आवश्यकता नाही.
• ट्रॅक्टरची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 4 तास लागतात.
• बॅटरी फुल चार्ज झाल्यानंतर त्यावर 10 तास इतके काम करू शकता.
• या ट्रॅक्टरचा वेग मोबाईलद्वारेही नियंत्रित करता येतो.
• ट्रॅक्टरमुळे कोणतेही प्रदूषण होत नाही.