पुणे : शाश्वत विकास संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरपंचांचा सहभाग महत्वाचा असून गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रबोधनाच्या माध्यमातून जनतेच्या मानसिकतेतही परिवर्तन घडवून आणणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी केले.
चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे भारत सरकारचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्रालय व राज्य शासनाचा ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
किसान क्रेडिट कार्ड योजना ; यासाठी मिळू शकते २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/SckaImzMZFk
यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, केंद्रीय पंचायत राज विभागाचे सचिव राजेश कुमार,अतिरिक्त सचिव चंद्रशेखर कुमार,सह सचिव रेखा यादव, राज्याच्या ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, यशदाचे उप महासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी आदी उपस्थित होते.
ग्राम विकास मंत्री महाजन म्हणाले, देशात व राज्यात शाश्वत विकासांच्या ध्येयांची पंचायत राज यंत्रणेमार्फत प्रभावी अंमलबजावणी करणे हे महत्वाचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्यातील पंचायत राज संस्थांचे योगदान अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. ग्राम पंचायतीमध्ये या ध्येयांची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनाने नऊ संकल्पना निश्चित केल्या असून या संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा ठरणार आहे.
शाश्वत विकासाचे उद्दिष्टे साध्य करण्यासोबतच देशाच्या विकासात भर घालण्यासाठी गावाला स्वच्छ-सुंदर बनवावे लागेल. यासाठीच पंचायत राज विभागाच्या माध्यमातून सरपंचांना महत्वाचे अधिकारी देण्यात आले आहेत. ग्रामपंचायतींना विकास काम तसेच विविध योजनांची अंमलबजावणीसाठी थेट निधी देण्यात येतो. गावात मुलभूत सुविधांसोबतच गाव स्वच्छ, सुंदर, पाणी, आरोग्य यासह गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल. असे ते म्हणाले.
राज्यात राळेगण सिद्धी व हिवरेबाजार या गावांनी ग्राम विकासात केलेले काम समोर ठेवून सरपंचांनी आपले गाव स्वच्छ, सुंदर व जलसमृद्ध करावे, असे आवाहन श्री. महाजन यांनी केले.
केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील म्हणाले, शहराप्रमाणे गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. गावाला सुरक्षित व समृद्ध करण्यासोबतच गावांचा शाश्वत विकास करण्यासाठी सरपंचांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. संकल्प, स्वप्न, सामर्थ्य या तीन सूत्रांच्या आधारे सरपंच काम करतात. शाश्वत विकासाचे लक्ष साध्य करण्यासाठी सरपंचासोबतच गावाती प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्वाचा ठरणार आहे.
जलजीवन मिशनच्या माध्यमातून ‘हर घर नल’ संकल्पना पूर्ण करण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा. पाणी वाचविण्यासाठी गावात विचार होण्याची गरज आहे. स्वच्छ, सुंदर गावासोबत जलसमृद्ध गाव निर्माण करण्यासाठी ही कार्यशाळा नक्कीच दिशादर्शक ठरेल. राज्यातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्यशासन एकत्रितपणे सर्वोतोपरी मदत करेल असे त्यांनी सांगितले.
भारत सरकारचे सचिव सुनिल कुमार म्हणाले, देशाला विकासित करण्यात ग्रामीण भारताची भूमिका महत्वाची आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचा जीवन स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. गाव व शहर हा भेद दूर करण्यासाठी १७ उद्दिष्टांपैकी ९ उद्दिष्ट केंद्रीत करण्यात आली आहेत. असे त्यांनी सांगितले.
राज्याचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार म्हणाले, पंचायतराज विभागाने शाश्वत विकासासाठी नऊ संकल्पना विकसीत केल्या आहेत. नऊ संकल्पनेला विचार घेत ग्रामपंचायतींना विकासाचे नियोजन करावयाचे आहे. राज्यात राळेगण सिद्धी, हिवरेबाजार, पाटोदा ही आदर्श गावे आहेत. लोकसहभाग व शासकीय योजनांची जोड देवून हजारो गावे विकासाच्या प्रक्रियेत पुढे येत आहेत. महाराष्ट्रात ग्राम विकासाच्या दृष्टीने अनेक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्वपूर्ण ठरतो आहे. यासाठीच ग्राम विकासाचे प्रशिक्षण व संशोधन केंद्र सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जलसमृद्ध गाव, स्वच्छ गाव पुस्तिका तसेच नऊ उद्दिष्टावर आधारीत पोस्टर पुस्तिका व ‘ग्राम विकासाचा रोड मॅप’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच महा ई ग्राम पोर्टलचा शुभारंभही करण्यात आला. यावेळी देशातील विविध राज्यातील सरपंच, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
गावाच्या शाश्वत विकासाबाबत विविध पैलूंवर चर्चा
‘स्वच्छ व हरित ग्राम’ व ‘जलसमृद्ध गाव’ या शाश्वत समान विकास ध्येयावर आधारित राष्ट्रीय कार्यशाळेत गावाच्या शाश्वत विकासाच्यादृष्टीने विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली. यावेळी जलशक्ती मंत्रालयाच्या पाणी पुरवठा विभागाच्या सचिव विनी महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सहसचिव अभय महाजन, आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार आदी उपस्थित होते.
सचिव श्रीमती महाजन म्हणाल्या, गावातील नागरिकांचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी स्वच्छता पंधरवड्यामध्ये आपल्या गावातील कचऱ्याचे वर्गीकरण करुन विल्हेवाट लावावी. विकास कामे करतांना सामाजिक स्वयंसेवी संस्था, तांत्रिक सल्लागारांची मदत घ्यावी. ग्रामीण भागातील शौचालयाचा वापर, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक निर्मूलन, विविध शासकीय योजना याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
सहसचिव श्री. महाजन म्हणाले, स्वच्छ व हरित ग्राम व जलसमृद्ध गाव या शाश्वत समान विकासाच्या ध्येयपूर्तीसाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेत ५० हजार नागरिकांचा सहभाग घेतला आहे. येत्या २ ऑक्टोबर स्वच्छता दिनी श्रमदानाच्या माध्यमातून ५०० गावे हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न आहे. माहिती, शिक्षण आणि संवाद या त्रिसूत्रीच्या माध्यमातून स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी गावपातळीवर संवाद साधून स्वच्छतेचे महत्व पटवून देत आहे, असेही श्री. महाजन म्हणाले.
आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार म्हणाले, स्वच्छ, हरीत व पाणीदार गावे तयार करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये केवळ पाच वर्षाचा विचार न करता दिर्घकालीन नियोजनाची गरज आहे. पाण्याच्या गुणवत्तेबरोबरच मातीच्या आरोग्याची दक्षता घेण्याची गरज आहे. यासाठी पुढच्या २५ वर्षाचे नियोजन आज हाती घ्यावे लागेल.हिवरेबाजारसारख्या प्रयोगातून आपण गावाकडील स्थलांतर थांबवू शकलो तर शहरे सुरक्षित ठेवता येतील.
यावेळी कार्यशाळेत उपस्थित सरपंच, ग्रामसेवक, कृषी अधिकारी आदींनी चर्चेत सहभागी तज्ज्ञांशी संवाद साधला. कार्यशाळेत देशातील विविध गावातील यशकथा चित्रफीतीच्या माध्यमातून दाखविण्यात आल्या.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- गावोगावच्या विकास सोसायटी लवकरच विकणार पेट्रोल-डिझेल; रेशन दुकानेही चालवणार!
- Best Idea! झाडावर न चढता सहजपणे फळ तोडा; A1 भन्नाट देसी जुगाड! पाहा हा व्हिडिओ …