लँकेस्टर (ब्रिटन) : Urban Agriculture … लँकेस्टर विद्यापीठातील संशोधनात शेतीविषयी एक आश्चर्यकारक वास्तव समोर आले आहे. काकडी, बटाटे आणि कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणाऱ्या फळभाज्यांची पीके ग्रामीण भागाऐवजी शहरी भागात घेतली गेली तर त्यांचे उत्पादन चार पट जास्त असू शकते. लँकेस्टर विद्यापीठातील हे नवीन संशोधन शेतीच्या भविष्याला नवी दिशा देणारे ठरू शकेल.
सध्या, 15-20 टक्के जागतिक अन्न शहरांमध्ये पिकवले जाते. यात 5-10 टक्के शेंगा, भाज्या आणि कंदांचा समावेश आहे. परंतु शहरे स्वतः अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण होऊ शकतात की नाही, याचा अंदाज घेण्यासाठी अधिक प्रयोगांची आवश्यकता आहे.
जगभर सर्वत्र शहरीकरण वाढत आहे. त्यामुळे अन्न सुरक्षा आणि शाश्वत मार्ग म्हणून शहरी शेतीच्या (अर्बन ॲग्रीकल्चर) व्यवहार्यता कृषी संशोधक पडताळून पाहत आहेत. सध्याच्या संशोधनात सहभागी असलेले लँकेस्टर विद्यापीठातील पर्यावरण शास्त्रज्ञ फ्लोरियन पायन म्हणतात, “शहरी शेतीची लोकप्रियता व गरज वाढत असूनही, अजूनही आपल्याला त्याबद्दल निश्चित, ठोस असे काहीच माहिती नाही. यातील उत्पादन हे पारंपरिक शेतीसारखे आहे की नाही किंवा सामान्यतः कोणती पिके घेतली जाऊ शकतात, याचा आणखी अभ्यास जगभर व्हायला हवा.”
आजवर जगभरात कृषी शास्त्रज्ञांनी याविषयी 53 देशात 200 हून अधिक प्रयोगातून संशोधन केले आहे. या अभ्यासांच्या विश्लेषणाद्वारे 2,000 पेक्षा जास्त डेटा पॉइंट्स कव्हर केले गेले आहेत. त्यातून संशोधकांना काही ठोस उत्तरे मिळू शकली. हे सर्व प्रयोग ग्रे स्पेसेस म्हणजे रस्त्यालगतची निवासी जागा, घरासमोरची व लगतची मोकळी जागा आणि छत, गच्ची, टेरेस याबरोबरच ग्रीन स्पेसेस म्हणजे उद्याने, बगीचे आणि मोकळ्या भूखंडावर केले गेलेले आहेत.
कोणत्या शहरी जागा पिकांच्या वाढीसाठी सर्वोत्तम काम करतात या संदर्भात, कोणताही स्पष्ट निष्कर्ष आताच पुरेशा डेटाअभावी सांगता येत नाही. तथापि, काही प्रकारची पिके ही वाढीच्या विशिष्ट जागा व पद्धतींना अनुकूल असतात, असे संशोधनात दिसून आले.
उदाहरणार्थ, भरपूर पाणी असलेल्या भाज्या जसे की टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या या हायड्रोपोनिक वातावरणात जास्त उत्पादन देतात, जेथे मातीऐवजी पाण्याचा वापर केला जातो.
सलाड व कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारे लेट्युस तसेच कोबी आणि ब्रोकोली सारखे खाद्यपदार्थ हे उभ्याने म्हणजे व्हर्टीकली वाढीसाठी अधिक नैसर्गिकरित्या अनुकूल आहेत, असे संशोधकांना आढळले. अभ्यासात असेही दिसून आले आहे, की शहरी शेती ही ग्रामीण शेते व इतर पर्यायांच्या तुलनेत विशिष्ट प्रकारच्या उत्पादनांसाठी अधिक सरस ठरू शकणार आहे.
संशोधक पायेन सांगतात, “आश्चर्याची गोष्ट म्हणजे, इनडोअर स्पेसेस आणि आउटडोअर ग्रीन स्पेसेसमध्ये एकूण उत्पादनात तर फरक होताच. शिवाय, ग्रे स्पेसेसमध्ये उगवलेले पीक हे अधिक दर्जेदार व जास्त योग्यतेचे होते.”
“तुम्ही सफरचंदाच्या झाडांना पाच किंवा दहा स्तरांच्या व्हर्टीकल ग्रोथ चेंबरमध्ये तंतोतंत स्टॅक करू शकत नाही. मात्र, आम्हाला एका अभ्यासात आढळले की गहू अशा प्रकारे चांगला वाढू शकतो.”
ग्रामीण शेतीपेक्षा शहरी शेती किती किफायतशीर आहे, हे अजून पुरेसे स्पष्ट झालेले नाही. शहरी शेतीला हवामान-नियंत्रित वातावरण आवश्यक असते. त्याचा खर्च तसेच आवश्यक प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करणे, या दोन्ही बाबी विचारात घेऊनच खर्चाचा तुलनात्मक आढावा घेतला जाऊ शकतो.
शहरी शेती विकसित करणे आणि ती विविध मार्गांनी फायदेशीर केली जाऊ शकते. कोरोनासारख्या भविष्यातील साथीच्या रोगात अधिक सुसज्ज आणि नियंत्रित पर्याय आवश्यक राहील. याशिवाय, खाद्यान्न उत्पादनाचा पर्यावरणीय खर्च कमी करण्याचीही आवश्यकता वाढत आहे. यातून आता शहरी शेती किती व्यवहार्य आहे, याबाबत अंदाज देणारा काही ठोस डेटा संशोधकांकडे जमा होऊ लागला आहे.
पायेन म्हणतात, “आगामी संशोधनातून शहरी शेतीचे विशिष्ट तंत्र किती सहजतेने विकसित केले जाऊ शकते आणि शहराच्या प्रदूषणाचा पिकांच्या गुणवत्तेवर कसा परिणाम होऊ शकतो, हे पाहता येईल. अजून बरेच काही शोधायचे आहे, परंतु सुरुवात करण्यासाठी हा एक भक्कम पाया आहे.”
“ही पहिली पायरी आहे. छतावरील गार्डन्स किंवा ग्रीनहाऊसमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर आहे की नाही, ते या डेटासेटच्या आधारे, नियोजक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते पाहू शकतात. उदाहरणार्थ, हायड्रोपोनिक सिस्टीम अधिक चांगली आहे का, व्यवहार्य आहे का, हे आता आकडेवारीच्या आधारे तपासून पाहिले जाऊ शकते.”
“अर्थस् फ्यूचर” (Earth’s Future) या जागतिक प्रतिष्ठेच्या संशोधन नियतकालिकात शहरी शेतीविषयी हे ताजे संशोधन प्रकाशित झाले आहे .
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
शेती ड्रोन : ॲग्री इन्फ्रा फंडने धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी गरूड ड्रोनसाठी मंजूर केले पहिले किसान ड्रोन कर्ज
जगातील पहिल्या ड्रायव्हरविना चालणाऱ्या, फुल्ली स्मार्ट इलेक्ट्रिक ट्रॅक्टर कंपनीचे आता भारतातही पदार्पण
Comments 2