विष्णू मोरे
कोणत्याही शेतकर्याला त्याच्या मुलाने शेतकरी व्हावे, असे वाटत नाही. त्याला वातावरणातील बदल, वेळी-अवेळी होणार्या पावसामुळे होणारे नुकसान, शेत मालाला न मिळणारा भाव… यासारखी अनेक कारणे आहेत. त्यामुळे अनेक शेतकर्यांची मुले शेतीपासून लांब जात आहेत. मात्र, याला जळगाव जिल्ह्यातील करंज येथील शेतकरी अनिल सपकाळे हे अपवाद ठरले आहेत. त्यांनी करणार तर शेतीच… असा चंग मनाशी बांधत शेती करायला सुरुवात केली. आज ते केळीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेत आहेत. ही केळी ते इराणसारख्या देशात निर्यात करुन वर्षाला 35 लाखांपर्यंत कमाई करीत असून त्यांचा हा यशाचा प्रवास गावासह परिसरातील शेतकर्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
जळगाव शहरापासून अवघ्या 20 ते 25 कि. मी. अंतरावर करंज हे एक छोटेसे गाव असून याठिकाणी प्रयोगशिल शेतकरी अनिल सपकाळे हे कुटूंबियांसह वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे वडीलोपर्जित 40 बिघे शेती असून त्यांचे वडील जिवराम सपकाळे हे पारंपारिक पद्धतीने शेती करुन कापूस, ज्वारी आदी पिकांचे उत्पादन घेत होते. वाहतूकीसाठी व्यवस्था तसेच शेतात पाण्याची सोय नसल्याने केळी पिकाचे उत्पादन ते क्वचितच घेत. आता मात्र, त्यांच्या शेतात मोठ्याप्रमाणावर केळीचे उत्पादन घेवून तिची निर्यात देखील केली जात आहे. या शेतीचा भार वडील जिवराम सपकाळे यांच्याकडून अनिल आणि सुनील सपकाळे या दोघा भावंडांनी घेतला आहे. त्यांनी पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत, नवनवीन पद्धती अंगीकारत अत्याधुनिक पद्धतीने शेती करायला सुरुवात केली आहे. अनिल सपकाळे शेतीविषयी बोलतांना, वडीलांपासूनच मला शेती करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सपकाळे आवर्जून सांगतात.
कृषी विज्ञान मंडळाची स्थापना
सपकाळे यांनी सुरुवातीला पारंपारिक पद्धतीने शेती केली. या पध्दतीने शेती करीत असतांना खर्च वाढत होता, परंतु उत्पन्नात वाढ होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनतर त्यांनी शेतीत काहीतरी मोठे करण्याचा ठरविले व त्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली. त्याचे पहिले पाऊल म्हणून त्यांनी ओम साईनाथ कृषी विज्ञान मंडळाची स्थापना केली. या मंडळाच्या माध्यमातून आणि जळगाव कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र आणि आत्मा विभागाच्या सहकार्याने त्यांनी गावात शेती शाळांचे आयोजन केले. या शेती शाळेत त्यांना घड व्यवस्थापन यासह विविध विषयांवर मार्गदर्शनासह प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर खर्या अर्थाने त्यांना दिशा मिळाली. या विषयी बोलतांना सपकाळे सांगतात की, शेती करतांना अनेक अडचणी येत होत्या. परंतु, कृषी विभाग, केव्हीके, आत्मा विभाग आणि विशेषत: कृषी विभागाचे कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी केलेले मार्गदर्शन यातून त्या अडचणी दूर होत गेल्याचे ते सांगतात.
एक गाव एक वाण संकल्पना
सपकाळे यांनी बायोडायनॅमिक शेती करण्याचा निर्णय घेवून स्वत:सह इतर शेतकर्यांचाही विकास व्हावा, यासाठी पुढाकार घेतला. सन 2007-08 साली त्यांनी मोहनचंद सोनवणे यांच्या शेतीचा अनुभव पाहून त्यांच्या अध्यक्षतेखाली शेतकर्यांचा आहिल्याबाई होळकर विकास बचत गट स्थापन केला. या गटांच्या माध्यमातून त्यांनी करंज गावात कापूस पिकात एक गाव एक वाण ही संकल्पना राबवून यशस्वी केली. तसेच शेतकरी चर्चासत्र, किसान गप्पा गोष्टी, शेतकरी शास्त्रज्ञ यांसारखे कार्यक्रम देखील गावात राबविले आहेत.
थोडक्यात महत्वाचे…
* कृषी विज्ञान मंडळाची केली स्थापना
* कृषी शाळेत घड व्यवस्थापनासह विविध विषयांवर घेतले प्रशिक्षण
* गावातील सर्व शेतकरी एकूण क्षेत्रापैकी एक एकर क्षेत्रावर करतात सेंद्रिय शेती
* बायोडायनॅमिक शेतीचे जनक पिटर प्राक्टर यांची गावास भेट
* इराणला होतेय केळीची निर्यात
* स्थानिक बाजार भावापेक्षा प्रति क्विंटल 400 ते 500 अधिक दर
* बायोगॅस, सौरउर्जेचा करतायेत वापर 50 टक्के क्षेत्र सेंद्रिय शेतीसाठी
शेतीत राबत असतांना सपकाळे यांनी रसायनांच्या वापरामुळे खराब होत असलेली जमीन व मनुष्याच्या शरीरात होणारे दुष्परिणाम लक्षात घेवून यातही समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपल्या गावातील शेतकर्यांशी चर्चा करुन प्रत्येक शेतकर्याने आपल्या एकूण क्षेत्रापैकी 1 एकर क्षेत्र सेंद्रिय शेतीसाठी देण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत इतर शेतकर्यांनीही या उपक्रमात सहभाग नोंदविला. करंज गावाने केलेल्या या कामाची पाहणी करण्याकरीता बायोडायनॅमिक शेतीचे जनक पिटर प्राक्टर यांनी गावास भेट दिली होती. अनिल सपकाळे यांनी ऐवढ्यावर न थांबता सेंद्रिय शेतीच्या प्रचार व प्रसारासाठी स्थानिक युवकांचे गट स्थापन केले. त्यामाध्यमातून त्यांनी शासनच्या कृषी विकास योजनेतून स्वत:सह गावातील शेतकर्यांना सेंद्रिय शेतीचा मिळवून दिला आहे.
फळ झाडांच्या वाढीसाठी आता कृषिसम्राटचे ग्रोफास्ट। Growfast।
इराणला केळीची निर्यात
करंज येथे ओम साईनाथ कृषी विज्ञान मंडळाची स्थापना केल्यानंतर सपकाळे यांनी केळी पिकाशी संबंधित घड व्यवस्थापन, केळी निर्यात यासारख्या विषयांवर शेती शाळा आयोजित करुन प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांच्या 40 बिघे शेतीपैकी 30 बिघे क्षेत्रावर केळी या पिकाची लागवड करुन निर्यात करण्याचा निर्णय घेतला. त्यानूसार ते गेल्या तीन वर्षांपासून कोल्हापूर येथील धरती कृषी संवर्धन प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून ते इराणसह इतर देशात आपल्या केळीची निर्यात करीत आहेत. यातून त्यांना वर्षाकाठी 30 ते 35 लाखांचे उत्पन्न मिळत असल्याचे ते सांगतात. केळी एक्सपोर्ट केल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत मिळणार्या दरापेक्षा 400 ते 500 रुपये प्रति क्विंटल दर जास्त मिळतात. याआधी बेकीकॉर्न मक्याची लागवड करुन त्याची देखील निर्यात केल्याचे सपकाळे सांगतात.
माती आणि पाण्याची तपासणी
अनिल सपकाळे हे पिकांइतकीच जमिनीची देखील काळजी घेतात. ते दरवर्षी आपल्या शेतातील माती आणि पाण्याची तपासणी करुन घेतात. तसेच जमिनीची सुपिकता टिकून राहावी, यासाठी शेतात शेणखत टाकतात. त्यांनी जीवामृत व दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी 200 लि. क्षमतेच्या टाक्या ठेवल्या असून आपल्या शेतातील काडी कचरा, परिसरातील उकीरडा, गाईचे शेण व गोमूत्र एकत्रित करुन बायोडायनॅमिक डेपो तयार केला करतात. त्यापासून त्यांना दर दीड महिन्यांनी सेंद्रिय खत उपलब्ध होते. गावातील उकीरडे, काडी कचराही ते एकत्रित करुन एस-9 कल्चरचा वापर करुन ते बी.डी. डेपो तयार करतात. यामुळे गावातील स्वच्छता राखण्यातही मोठी मदत होत आहे.
शेतीला व्यवसायाची जोड
शेतीला जोडव्यवसाय म्हणून सपकाळे यांनी पशुपालन, गांडूळ खत, बी. डी. कम्पोस्ट निर्मिती सुरू केले आहे. त्यांच्याकडे 30 पेक्षा जास्त गाई-म्हशी असून यात देशी गाईंचा सर्वाधिक समावेश आहे. गाई-म्हशींपासून मिळणारे दूध ते घरीच तसेच गावातील दुग्धउत्पादक संस्थेला विक्री करतात. यातून त्यांना महिन्याकाठी 15 ते 20 हजार रुपये मिळतात. गोठ्यातून निघणारा कचरा म्हणजेच शेण, गोमुत्र, चार्याचे अवशेष याचा वापर देखील ते कंपोस्ट खत, एस-9 कल्चर बनविण्यासाठी करतात. स्वत: तयार केलेल्या गांडूळ खताच्या विक्रीतून ते वर्षाला दीड लाख तर बी. डी. कम्पोस्टच्या विक्रीतून वर्षाला 30 हजार हजार रुपयांपर्यंत उत्पन्न घेतात.
नैसर्गिक साधनांचा वापर
सपकाळे यांनी बायोगॅस प्लॅन्टची देखील उभारणी केली असून त्यापासून मिळणार्या गॅसचा वापर ते आजही आपल्या घरातील स्वयंपाक गृहात करतात. पिकांना पाण्याची कमतरता भासू नये म्हणून शेतात बोअरवेल करुन घेतली आहे. या बोअरवेलची पाणी पातळी टिकून राहावी यासाठी ते बोअरवेलचे पूर्नभरण करीत असतात. तर विजेची समस्या भासू नये म्हणून 7.5 एच.पी. क्षमतेचा सौर पंप देखील बसविला आहे. यातून त्यांचा खर्चातही मोठी बचत होत आहे.
अनेक पुरस्कारांनी सन्मानित
सपकाळे यांनी शेती क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याची दखल घेवून त्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागासह अनेक संस्थांकडून विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून त्यांना सेंद्रिय शेतीमध्ये केलेल्या कार्याबद्दल 2018 साली कृषीभूषण पुरस्काराने तसेच जळगाव जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून आदर्श शेतकरी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. यासोबतच विविध विषयांवरील परिषदांमध्ये सहभाग नोंदविल्याबद्दल जैन इरिगेशन, निर्मल सिड्स यांसारख्या नामांकित कंपन्यांकडूनही त्यांना गौरविण्यात आले आहे.
तरुणांनी शेतीकडे वळावे
पूर्वी शेतीकडे कनिष्ठ व्यवसाय म्हणून पाहिले जात होते. परंतु, शेतीसारखा दुसरा व्यवसाय नाही. त्यामुळे आजच्या तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता शेतीकडे वळावे. आधुनिक पद्धतीने शेती करुन भरघोस उत्पादन घ्यावे. दर्जेदार शेतमालाचे उत्पादन घेवून त्यांची निर्यात करावी. तरुण शेतीकडे वळल्यास त्यांचा रोजगाराचा प्रश्न मिटू शकेल.
– अनिल सपकाळे, प्रयोगशिल शेतकरी,
करंज, ता. जि. जळगाव.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇
- नोंदणी करूनही पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नसेल तर करा हे काम ?
- बोगस बियाणे विरोधातील कायद्यावर सूचना मागविणार – कृषीमंत्री मुंडे
Comments 3