प्रत्येक ऋतूमध्ये जनावरांच्या समस्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे जनावरांच्या शरीरावर त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात. हे टाळण्यासाठी हवामानानुसार जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये काही बदल करणे आवश्यक असते. यामध्ये लसीकरण देखील महत्वाचे आहे. 25 ते 30 दिवस अगोदर लसीकरण करावे, ह्याचे तांत्रिक कारण आहे. मानवी किंवा पशुधनाच्या शरीरात त्या त्या विशिष्ट रोगाविरुद्ध सशक्त (स्ट्राँग) प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) निर्माण होण्यास 29 ते 30 दिवसांचा कालावधी लागतो.
थंडीपासून वाचवा आपल्या गुराना ढोराना
वासरांची काळजी
1) गाई, म्हशी साधारणतः थंडीच्या दिवसांत वितात. अशा जनावरांची आणि वासरांची थंडीपासून अतिशय जाणीवपूर्वक काळजी घ्यावी. जनावरांना बसण्यासाठी भुश्याची गादी करावी.
2) नवजात वासराची नाळ शास्त्रीय पद्धतीने कापून त्यावर निर्जंतुकाचा बोळा लावावा. वासरास तत्काळ योग्य प्रमाणात चीक पाजावा. गोठ्यात शेकोटी करावी, त्यामुळे गोठ्यात उबदार वातावरण तयार होते.
3) दायी पद्धतीने ठेवलेल्या वासरांना थोडेसे कोमट दूध पाजावे. वासरांच्या अंगावर पोत्याचे पांघरूण टाकावे. गोठ्यात उबेसाठी बल्ब लावावेत.
4) पशुवैद्यकाच्या सल्ल्याने अशा वासरांना लसीकरण करावे. कृमी निर्मूलनासाठी जंतनाशक द्यावे. गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवावी.
आजारी जनावरांचे व्यवस्थापन
1) गोठ्यातील जनावरांची संख्या मर्यादित ठेवावी. गोठ्यात जनावरांच्या अंगाखाली पसरलेला चारा, शेण, मूत्रामुळे जनावरांच्या पायाला चिखल्या, जखमा होऊ शकतात. चिखल्यामुळे थंडी वाढते. शिवाय जंत, कृमी, माश्या यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन गोठा स्वच्छ ठेवावा. नियमितपणे गोठ्याचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे.
2) अतिशय थंडीमुळे जनावरांच्या पायाला भेगा पडून जखमा, चिखल्या होतात आणि अशा जखमांमध्ये संसर्ग होतो. या दिवसांत जनावरांच्या खुरांची विशेष काळजी घ्यावी म्हणजे पायाचे विकार टाळता येतील. खूर वाढलेले असल्यास कापून घ्यावेत.
3) गाई, म्हशींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यास दूध उत्पादन, प्रजोत्पादनावर परिणाम होतो.
4) जनावरांना प्रवासाचा ताण पडल्यास प्रतिकारशक्तीचा ऱ्हास होऊन संसर्गजन्य जिवाणूजन्य आणि विषाणूजन्य आजार उद्भवतात. यामध्ये प्रामुख्याने घटसर्प, प्लुरोन्यूमोनिया, आंत्रविषार, पीपीआर अशा रोगांचा प्रादुर्भाव होतो.
5) जनावरे आजारी वाटल्यास तत्काळ पशुवैद्यकांमार्फत औषधोपचार करावेत. आजारी जनावरांच्या अंगावर ऊबदार घोंगडी टाकावीत.
6) तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार जनावरांचे लसीकरण करावे. सप्टेंबर महिन्यात आंत्रविषाराची लस देणे गरजेची असते. त्या पुढील पंधरवड्यात तोंडखुरी आणि पायखुरीची लसीकरण केलेले असावे. डिसेंबर-जानेवारीत एकटांग्या आणि प्लुरोन्यूमोनियाचे लसीकरण करावे, तसेच कृमीनाशकांचादेखील वापर करावा.
7) या दिवसांत जनावरांच्या अंगावरदेखील पिसवा, माशा, डास, गोचीड यांचा जास्त प्रादुर्भाव होऊ शकतो म्हणून गोठ्याची आणि जनावरांची स्वच्छता ठेवावी.
8) थंडीच्या दिवसांत जनावरांना व्यायामाची जास्त गरज असल्याने त्यांच्या शरीराची जास्तीत जास्त हालचाल होईल यावर लक्ष द्यावे.शेळ्यांचे व्यवस्थापन
आता तापमानात घट होण्यास सुरवात झाली आहे. सध्याच्या काळात शेळ्यांच्या गोठ्यात जमिनीवर झाडपाला, भुश्याचे आच्छादन करावे. त्यामुळे त्यांना ऊब मिळेल; पण हे आच्छादन जर मलमूत्राने ओले राहिले तर त्याच्यात अमोनिया वायू निर्माण होतो. हा वायू जड असल्यामुळे जमिनीपासून 7 ते 8 इंचापर्यंत त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे अशा जागी जर शेळ्या आजारामुळे बसून अथवा झोपून राहत असतील तर त्यांना न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. जीवाणू आणि विषाणूंचा संसर्ग होऊन फुफ्फुसाचा गंभीर दाह होतो, त्यामुळे हिवाळ्यात जनावरांच्या गोठ्यात स्वच्छ खेळती हवा असणे गरजेचे असते