‘आंबा पिकतो रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो’ असा दिमाख असणारा गाण्यातील कोकणचा राजा सध्या मात्र कल्टार संस्कृतीचा बळी ठरत आहे. यामुळे २०१४ साली युरोपीय देशांनी आपला आंबा नाकारला. ही बातमी त्यावेळी सर्व वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर ठळक मथळा देऊन प्रसिद्धी दिली. या सर्व प्रकारात कोकणचा राजा बदनाम झाला. आता सर्वांनी या कल्टार संस्कृतीच्या अतिरेकाबद्दल विचार करण्याची वेळ आली आहे. गुणवत्तेच्या बाबतीत नेहमी युरोपीय लोक सजग राहिले आहेत. काही वर्षांपूर्वी घडलेले द्राक्ष प्रकरण त्याच जागरूकतेचे प्रतिक आहे. पण आपल्याकडे अजूनही सर्वसामान्य नागरिकांना कल्टार म्हणजे काय हेच माहित नाही. त्याच्यासाठी खालील माहिती नक्कीच माहितीप्रत ठरेल.
काय आहे ‘कल्टार’
आज कोकणातील बागा या ‘कल्टार’मय आहेत. कल्टार म्हणजे पॅक्लोब्यूट्रॉझॉल, या संजीवकाने आंबा बागायतदारांचं गणितच बदलून टाकलं आहे. साधारणत: जूनच्या सुरुवातीला वा मध्यापर्यंत आंबा बागांची मशागत केली जाते. या मशागतीत बागेला खतपाणी घालणे, आळी करणे आदी कामे फार निगुतीने केली जातात. मात्र आता या कामांत कल्टार घालणे हे नवे काम गेले काही वर्षे केले जाते. त्यामुळे हापूसच्या बागा पर्यायाने झाडे फारच लवकर फलधारणा देऊ लागली. साधारणत: दोन महिने फळे अगोदर बाजारात येण्याने नफ्याची गणिते बदलू लागली. या कल्टारने प्रतिवर्षी कोणाच्या बागेत किती लवकर फळे आली, कोणाची पेटी किती पहिल्यांदा बाजारात दाखल झाली या बातम्या स्थानिक वर्तमानपत्रांसह राज्यस्तरीय व कृषी वर्तमानपत्रांत यायला लागल्या. केवळ कल्टारच नव्हे तर विविध संजीवके व रसायने फळधारणेच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावायला लागल्या. सारं गणित इथंच बिघडलं .
हापूस एप्रिलमध्येच का खावा?
आंबा बागायतदारांत एक म्हटले जाते की, उशिरा आलेल्या सोन्याचा उपयोग काय? म्हणजेच जर तुमचा आंबा जर एप्रिल-मे महिन्यात हाती आला तर काय उपयोग? आजही अशी अनेक घराणी आहेत की त्यांची आंबा खाण्याची सुरुवातच १५ मे नंतर होते. मात्र आपण सारे कल्टार संस्कृतीचे बळी आहोत. आपणाला फळे हवीत जानेवारीतच. आंबा बाग जरी या नवश्रीमंतांनी केली तरी आम्ही रोपवाटिका मालकाकडे मागणार लगेचच फळे देणारी हापूस कलमे. तीन वर्षांची मेहनत केलेली वा पोसलेली वा शिंपलेली हापूसची कलमे रोपवाटिकेत मिळतात. मात्र आता लगेचच फळधारणा देणाऱ्या रोपांची व कलमांची मागणी होऊ लागली आहे. म्हणजे जर सहा वर्षांची मेहनत केलेली कलमे असतील तर त्यांना जोरदार मागणी नवीन बागायत करीत असलेल्यांकडून आहे. आपली हीच मानसिकता म्हणजे कल्टार संस्कृती.परंतु हापूस मध्ये खऱ्या अर्थाने नैसर्गिकरीत्या गोडवा हा एप्रिलमध्ये तयर होतो त्यामुळे तो तेव्हाच खाणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य
सारे काही आपणाला झटपट हवे आहे. मग फळे पिकवायला तरी वाट का पाहायची? मग यासाठीच कार्बारील पावडर किंवा ईथिरील वा बाविस्टीनचा प्रयोग आलाच. गुढीपाडव्याच्या वा अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावरील ग्राहक जर बागायतदाराला खुणावत असेल तर या उपायांचा अवलंब करावाच लागतो. ही बाजारपेठीय संस्कृतीची गरज आहे. थांबण्याला वेळ कोणाला आहे? सारे काही झटपट हवे आहे. शेतकरीही याला अपवाद का असावा? मग तो कोकणातला असो वा देशावरचा वा विदर्भातील वा मराठवाडय़ातील. केवळ शेतीच नव्हे तर दैनंदिन जीवनातही आम्ही कल्टार संस्कृतीचे बळी आहोत. आज आपली सारी शेती या मानसिकतेत अडकली आहे. शेती आता रासायनिक पद्धतीत होते ती फळाच्या आशेने. चव, रंग, रूप, रस, स्वाद आता यातून हद्दपार झाला आहे. केवळ फळांची आशा हेच खरे.
सेंद्रिय पद्धतीच्या हापूस बागा तयार होतायेत
सेंद्रिय पद्धतीच्या हापूस बागा तयार करण्याचा ट्रेण्ड आता कोठे हळूहळू रुजत आहे, मात्र आपला सेंद्रिय आंबा घेणार कोण, हा प्रश्न आज सर्वच आंबा शेतकऱ्यांसमोर आहे. त्याचे कारण म्हणजे सेंद्रिय आंबा काहीसा उशिरा सुरू होतो. तोपर्यंत बाजारात रासायनिक आंब्याने धुमाकूळ घातलेला असतो. आंब्याचे दर कोसळले असतात. अशा परिस्थितीत सेंद्रिय आंब्याला उठाव कसा मिळणार, हा खरा प्रश्न आहे. त्यासाठीच स्वतंत्र सेंद्रिय बाजारपेठ विकसित करण्याची गरज आहे. नुकतेच त्यासाठी चिपळूण उपविभागीय कृषी कार्यालयामार्फत खरेदीदार आणि शेतकरी यांची एक संयुक्त कार्यशाळा घेण्यात आली होती. असे प्रयत्न आणखी वाढण्याची गरज आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हल्ली ग्राहकांनादेखील आंबा लवकरच हवा असतो. अशा वेळेस रासायनिक आंबा बाजी मारतो. जी मानसिकता युरोपीय बाजारपेठ दाखविते ती भारतीय ग्राहक केव्हा दाखवणार? महत्त्वाचे म्हणजे आज युरोप आणि आखातात पोहोचणारा देवगड, रत्नागिरीचा हापूस अजून आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यातदेखील पोहोचला नाही. इतकेच काय तर आपल्याच राज्यातील नागपूरलादेखील हापूसची चांगली फळं मिळू शकत नाही.
संदर्भ व माहितीश्रोत- समाजमाध्यम