घाटे अळी ही हरभ-यावरील मुख्य कीड आहे. घाटे अळी ही कीड ज्वारी, वाटाणा इ. पिकांवर उपजीविका करत असल्यामुळे या किडीचे वास्तव्य शेतात वर्षभर राहते. म्हणून जमिनीची निवड करताना खरीप हंगामात यापैकी पिके घेतली असल्यास अशा जमिनीत हरभ-याचे पीक घेऊ नये. पिकांच्या फेरपालटीकरिता तृणधान्य अथवा गळीतधान्याची पिके घ्यावीत. तसेच जमिनीची खोल नांगरट करावी. हेक्टरी १o ते १२ कामगंध सापळे लावावेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पतंग अडकले जाऊन पुढील प्रजननास आळा बसतो. पक्षांना बसण्यासाठी दर १५ ते २० मीटर अंतरावर काठ्या रोवाव्यात किंवा मचाण बांधावीत म्हणजे कोळसा पक्षी, चिमण्या, साळुंकी, बगळे इ. पक्षी पिकावरील अळ्या पकडून खातात. कोड नियंत्रण प्रभावी होण्याकरिता एकाच कीटकनाशकाचा सारखा वापर न करता फवारणीकरिता आलटून-पालटून औषधे वापरावीत.
हरभरा पिकास फुलकळी येऊ लागताच ५ टक्के निंबोळी अर्काची (२५ किलो/ हे.) पहिली फवारणी करावी. यासाठी ५ किलो निंबोळी पावडर १o लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवावी. दुस-या दिवशी सकाळी कापडाच्या सहाय्याने त्याचा अर्क काढावा आणि त्यामध्ये आणखी ९o लिटर पाणी टाकावे. असे एकूण १०० लिटर द्रावण २० गुंठे क्षेत्रावर फवारावे. पहिल्या फवारणीनंतर १० ते १५ दिवसांनी हेलिओकील (विषाणूग्रासीत अळ्यांचे द्रावण) ५०० मि.लि. ५०० लिटर पाण्यातून प्रति हेक्टरला फवारावे. यानंतर किडीचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास पुढे दर्शविल्याप्रमाणे कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी.
कीटकनाशक | प्रती १ लिटर पाण्यामध्ये कीटकनाशकाचे प्रमाण | प्रती १० लिटर पाण्यामध्ये कीटकनाशकाचे प्रमाण | कीटकनाशकाचे प्रतीएकर प्रमाण | कीटकनाशकाचे प्रतीहेक्टर प्रमाण |
---|---|---|---|---|
प्रवाही १८.५ टक्के क्लोरअॅन्ट्रीनीलीप्रोल | ०.२० मी.ली. | २.० मी.ली. | ४० मी.ली. | १०० मी.ली. |
प्रवाही ४८ टक्के फ्ल्युबेनडमाइड | ०.५ मी.ली. | २.५ मी.ली. | ५० मी.ली. | १२५ मी.ली. |
स्पिनोसॅड ४५ एससी प्रवाही | ०.४ मी.ली. | ८० मी.ली. | ८० मी.ली. | २०० मी .ली. |
स्त्रोत – कृषी विभाग महाराष्ट्र शासन