अमरावती जिल्हयातील अजित जोशी यांची अभिनव विक्री पध्दती
व्यवसायीक कंपन्याद्वारे आपल्या उत्पादनांचे आकर्षक पॅकींग आणि ब्रॅण्डींग केल्या जाते. या माध्यमातून ग्राहकांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न होतो. जागतीकीकरणाच्या काळात शेतमालाच्या मार्केटींगकरीता देखील अशाच पर्यायाचा वापर करणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेत मोर्शी (जि. अमरावती) येथील अजित जोशी या युवा शेतकऱ्याने थेट लिंबूचेच पॅकींग आणि ब्रॅण्डींग करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सिडलेस लिंबूचे उत्पादन घेणाऱ्या अजित यांना या प्रयत्नात चांगले यश मिळाले असून अल्पावधीतच मागणीही वाढली आहे.
27 एकराचे होते व्यवस्थापन
अजित जोशी यांची 27 एकर शेती. त्यातील सव्वा एकरावर लिंबू तर उर्वरित क्षेत्रात 1300 संत्रा झाडे आहेत. सोबतच आले, कपाशी, हळद यासारखी व्यवसायीक पीके त्यांच्याव्दारे घेतली जाते.
सिडलेस वाणाचा निवडला पर्याय
नाशिक येथील अनंत भाकरे या मित्रामार्फत त्यांना अनंतम या सिडलेस लिंबू वाणाची रोपे उपलब्ध झाली होती. 300 रुपयांना एक प्रमाणे 415 रोपांची खरेदी करण्यात आली. सव्वा एकरावर त्यांनी याची लागवड केली. त्याकरीता 10 बाय 12 फुटाचे अंतर सोडण्यात आले. ऑगस्ट 2015 मध्ये लावलेल्या या झाडांपासून नोव्हेंबर 2016 पासून उत्पादनास सुरवात झाली. खऱ्या अर्थाने उत्पादकता मिळण्यास जानेवारी 2017 वर्ष उजाडले. या लिंबूचे वैशिष्ट म्हणजे यात सायट्रीक ऍसीड 60 टक्के पर्यंत आढळते. व्हिटामीन “सि’ चे प्रमाण देखील अधिक असल्याचा दावा त्यांनी विविध चाचण्याअंती केला आहे.
लिंबूची केली पॅकींगमध्ये विक्री
ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी कंपन्यांव्दारे आपल्या उत्पादनांचे ब्रॅण्डींग आणि पॅकींग होते. हाच फंडा शेतमालाच्या विक्रीसाठी अवलंबल्यास काय गैर ? असा विचार अजित जोशी यांच्या मनात आला. मनातील ही संकल्पना त्यांनी अल्पावधीतच प्रत्यक्षात आणली. लाईम फ्रेश या ब्रॅण्डखाली ते लिंबूची विक्री करतात. सहा लिंबू या प्लॅस्टीक पॅकींगधील बॉक्समध्ये बसतात. 40 रुपयांना या सहा लिंबूची घाऊक दराने विक्री होते. सुरवातीला दलालाशी त्यांनी संपर्क साधला त्यावेळी बाजारात या लिंबूला उठाव नसल्याची आवई त्यांनी उठविली. लिंबाचा आकार मोठा असल्याचे कारण त्यामागे त्यांनी दिले.
सोशल मिडीयाचा केला प्रभावी वापर
दलाल व व्यापाऱ्यांनी नकार दिल्यानंतर हताश न होता. बाजारपेठ शोधण्यासाठी त्यांनी सोशल मिडीयाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. मित्रांच्या व्हॉटसअप, फेसबुकवर त्यांनी आपल्या लिंबाचे फोटो शेअर करण्यास सुरवात केली. या लिंबू वाणाची वैशिष्टये देखील ते आपल्यापरीने सोशल मिडीयातून सर्वांपर्यंत पोचवित होते. सातारा येथील मंत्री नामक व्यापाऱ्याला या लिंबाचा दर्जा व प्रत आवडली. जानेवारी महिन्यात 50 रुपये किलो दराचा करार त्यांच्याशी करण्यात आला. तेव्हापासून त्यांना त्याच दराने लिंबाचा पुरवठा होत असल्याचे अजित जोशी यांनी सांगीतले.
बसने साताऱ्याला पुरवठा
व्यापारी मंत्री यांच्याकडून फोनवरुनच मागणी नोंदविले जाते. आठवड्याला 50 ते 60 किलोची मागणी सरासरी राहते. अमरावतीवरुन सुटणाऱ्या खासगी प्रवासी बसमध्ये हा माल टाकला जातो. त्यानंतर व्यापाऱ्याची माणसे साताऱ्याला हा माल उतरवितात. व्यापाऱ्याकडून मालाचे पैसे खात्यात टाकले जातात. अशाप्रकारची मार्केटींगची साखळी त्यांनी विकसीत केली आहे. यामध्ये वाहतूकीचा अतिरिक्त भारही उचलावा लागत नाही. वाहतूकीपोटी होणारा खर्च व्यापाऱ्यांकडूनच केला जातो, असे त्यांनी सांगीतले.
स्थानिक बाजारपेठेत किलोने विक्री
नागपूर बाजारपेठेतही दलालांकडून लिंबाच्या खरेदीला नकार देण्यात आला. या ठिकाणी देखील मार्केटींगसाठी वेगळा पर्याय निवडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. बाजारपेठेतून बाहेर पडत त्यांनी तडक नागपूरातील रिलायंस फ्रेश आणि पूर्ती सुपर बाजारात आपल्या लिंबाचे सॅम्पलींग केले. लिंबाचा आकार आणि दर्जा पाहता त्यांच्याकडून या लिंबाला तत्काळ मागणी नोंदविण्यात आली. आठवड्याला 2 ते 3 क्विंटलचा पुरवठा सद्यस्थितीत नागपूरातील विविध मॉलला केला जात आहे. त्यांची मागणी अधिक असली तरी तुलनेत पुरवठा सद्या त्यांना शक्य होत नाही.
वर्षभर लिंबाचे मिळते उत्पादन
पारंपारीक पध्दतीत लिंबूची लागवड 20 बाय 20 फुट अंतरावर लागवड होते. सिडलेस लिंबू वाणाची लागवड सघन पध्दतीने करण्यात आल्याने या लिंबाचे एकरी झाडांची संख्या वाढते. या लिंबूचा आकार मोठा तर पारंपारीक लिंबाच्या तुलनेत रसाचे प्रमाण तिप्पट राहते. आंबीया, मृग आणि हस्त बहाराचे नियोजन पारंपारीक लिंबूसाठी करावे लागते. या लिंबाचे वैशिष्टय म्हणजे वर्षभर त्यापासून उत्पादकता मिळत राहते. वर्षभर उत्पादनक्षम असल्याने पैसा खुळखुळ राहतो, असे अजित जोशी यांनी सांगीतले.
प्रसारासाठी तयार केले फेसबुक पेज
उत्पादनाची ब्रॅण्डींग हे आजच्या काळात शाश्वत बाजारपेठेचा सक्षम पर्याय आहे. ही बाब लक्षात घेत अजित जोशी यांनी आपल्या उत्पादनाच्या ब्रॅण्डींग करीता फेसबुक या सोशल मिडीयाचा देखील प्रभावी वापर करण्यावर भर दिला. लाईमफ्रेश सिडलेस लेमन या नावाने त्यांनी फेसबुक पेज सुरु केले. त्यावर या लिंबू वाणाची वैशिष्टये त्यांनी नोंदविली आहेत. लिंबाचे आरोग्य विषयक उपयोग, लिंबाच्या विविध रेसीपीज, अशी वैविध्यपूर्ण माहिती त्यांनी त्यावर नोंदविली. त्या पेजला हजारावर व्यक्तींची लाईक्स मिळाले तर अनेक विदेशी तज्ज्ञांकडून त्यावरील माहितीविषयी विचारणा झाली.
ड्रायझोन करीता ठिकबचा पर्याय
वरुड तालुका ड्रायझोन म्हणून घोषीत करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात बोअरवेलला परवानगी नाही त्यासोबतच उन्हाळ्यात पाण्याची मोठी चणचण भासते. त्यावर एका मित्राने अजित जोशी यांना ठिबकचा अवलंब करण्याचे सुचविले. ठिबक बसविण्यासाठी त्यावेळी पैशाची सोय नसल्याचे त्यांनी ठिबक वितरक आपल्या मित्राला सांगीतले. दहा हजार रुपयात त्यांनी दोन एकरातील संत्रा आणि दोन एकरातील कपाशीला ठिबक बसवून घेतले. 2009-10 या वर्षात त्यांनी ठिबक बसविले होते. ठिबकचा फायदा असा झाला की गावातील इतर शेतकऱ्यांना कपाशीची त्यावर्षी पाण्याअभावी कमी उत्पादकता मिळाली असताना जोशी यांना मात्र त्यावर्षी चांगले उत्पादन झाले. ठिबकचे अशाप्रकारचे फायदे लक्षात आल्यानंतर त्यांनी शेतात शेततळे खोदण्यासोबतच टप्याटप्याने संपूर्ण 27 एकर क्षेत्र ठिबकखाली आणले आहे. पाण्याकरीता त्यांच्याकडे आता शेततळ्यासोबतच विहीरीचा देखील पर्याय आहे. 125 मिटर बाय 125 मिटरचे शेततळे त्यांनी घेतले आहे.
ठिबकमुळे कपाशीच्या उत्पादकतेत वाढ
ठिबक बसविण्यापूर्वी कपाशीची एकरी उत्पादकता तीन ते चार क्विंटलच्या मर्यादेत होती. विद्राव्य खते व पाण्याचा पुरवठा आता ड्रिपमधून होत असल्याने हीच उत्पादकता आता 12 ते 13 क्विंटलवर पोचल्याचे ते सांगतात.
नाल्यावरील जलस्त्रोताचा केला वापर
त्यांच्या शेतालगत नाला गेला आहे. त्या नाल्यावर कृषी विभागाने दोन बंधारे बांधले. त्यातील पाणी अडल्याने भुगर्भातील पाणी साठ्यात वाढ झाली. त्याचा फायदा अजित जोशी यांच्या शेतातील विहीरीची पाणी पातळी वाढण्यात देखील झाला आहे.
संपर्क
अजित जोशी
9923914544