तंबाखूवरील पाने खाणारी अळी : या किडीचा प्रादुर्भाव मुख्यतः तंबाखू पिकावर दिसून येतो. परंतु या किडीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन व इतर बऱ्याच पिकांचे नुकसान होताना पाहावयास मिळते. प्रौढ पतंग २ ते ३ सें.मी. व मळकट भुरकट रंगाचा असतो, त्याच्या पंखांवर पांढऱ्या रंगाच्या वेड्या-वाकड्या रेषा असतात व खालच्या बाजूचे पंख पांढरे असतात.
प्रादुर्भावाची लक्षणे : ही बहुभाक्षीय कीड असून ती उडीद, सोयाबीन, कापूस, टमाटे, तंबाखू,एरंडी,मिरची, कांदा, हरभरा, मका इत्यादी पिकांमध्ये आढळून येते. प्रौढ अळ्या समूहामध्ये स्वतंत्रपणे व पानांना मोठी छिद्रे पाडून खातात. पूर्ण वाढ झालेल्या अळ्या पाने अधाशीपणे फस्त करतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास पानांच्या फक्त शिराच शिल्लक राहतात. तृतीय अवस्थेपासून या अळ्या विलग होऊन स्वतंत्रपणे सोयाबीनची पाने, कोवळी शेंडे, फुले व कोवळ्या शेंगा यांना नुकसान पोहोचवितात. किडीचा प्रादुर्भाव पीक फुलात असताना व शेंगा तयार होत असताना झाल्यास परिणामी उत्पादनात लक्षनीय घट येते. या किडीमुळे ३० ते ७० टक्के एवढे नुकसान होण्याची शक्यता असते.
नियंत्रण/व्यवस्थापन :
- अळीच्या नर पतंगांना आकर्षित करण्यासाठी एकरी ४ कामगंध सापळे लावावेत.
- या किडीच्या अळ्या सुरुवातीला पानावर समूहामध्ये राहतात, म्हणून प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्येच शेतामध्ये फिरून अशी पाने तोडून कीटकनाशकामध्ये बुडवावीत व या अळ्यांना नष्ट करावे.
- किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात आल्यावर पिकावर किडीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या अवस्थेच्या वेळी एन.पी.व्ही. व्हायरस आधारित जैविक कीटकनाशक २५० एल.ई./हे. फवारणीसाठी वापरावे.
- रासायनिक कीटकनाशक क्विनॉलफॉस २५ इ.सी. १.५ ली. प्रति हेक्टर किंवा इंडोक्झाकार्ब १४.५ एस.सी. ५०० मि.ली. प्रति हेक्टर किंवा ट्रायझोफॉस ४० इ.सी. ८०० मि.ली. प्रति हेक्टर फवारवे.
- किंवा स्पीनेटोरॅम ११.७ टक्के एस. सी. ४५० मि.ली./हे. यापैकी एका कीटकनाशकाचा ५०० ते ७०० ली. पाण्यात मिसळून फवारणीसाठी आलटून पालटून वापर करावा.