परभणी जिल्ह्यात मानवत हे तालूक्याचे ठिकाण असून तेथील जमीन काळी कसदार सुपीक असल्याने सर्वच पिक उत्पादनात मानवत परिसर सदा अग्रेसर राहीले आहे. येथे रब्बीत टाळकी ज्वारीचे पिक बंपर येत असते. याच मानवतमध्ये रमेश सोपानराव चौधरी आणि बाळाभाऊ सोपानराव चौधरी हे दोघे प्रगतशील शेतकरी राहतात. त्यांना मानवत शिवारात वेगवेगळ्या गटात एकूण ८२ एकर जमीन आहे. त्या पैकी ५० एकरवर बारमाही बागायती पिके ही सूक्ष्म सिंचन प्रणालीच्या पाण्यावर घेतली जातात. पूर्वी वडील सोपानराव सखारामजी चौधरी हे सलग पध्दतीने पिकांना पाणी द्यायचे. त्यामुळे पिकात तणाचा प्रार्दूभाव अधिक होवून मजूर वाढवावे लागत. पिकांच्या गरजेपेक्षा अधिक पाणी वाया जायचे. पाण्याचा निरर्थक अपव्यय होई. रमेश शेतीत उतरल्यापासून त्यांनी आता आधूनिक शेती तंत्रज्ञानाची कास धरीत शेतीत टप्या टप्याने सूक्ष्म सिंचन प्रणाली बसविली आहे. यामुळे विविध भाजीपाला व मिश्र फळबाग उत्पादनात अमूलाग्र बदल होत आहे.
२५ एकर जमिनीला ६० एकरची जोड
रमेश सोपानराव चौधरी (वय ३८, शिक्षण ९ वी) यांना एकत्रित कुटूंबात मानवत शहरालगत उत्तर दिशेला १० एकर, दिड किमी अंतरावर ३० एकर तर त्याच रस्त्यावर पुढे २ किमी अंतरावर २० एकर, ३ किमी अंतरावर २२ एकर अशी एकूण ८२ एकर एकूण जमीन आहे. या पैकी वडिलोपार्जीत २५ एकर तर उर्वरीत जमीन ही शेतीपीक उत्पन्नातून टप्या टप्याने खरेदी केली आहे. हे वडिल सोपानराव चौधरी यांच्या कष्टामुळेच शक्य झाले आहे.
सिंचनासाठी पाण्याची साधने
चौधरी यांच्या सर्वच ठिकाणच्या शेतीत विहीर व विंधन विहीर आणि झरी तलावानजीक २० आर जमीन खरेदी करुन तेथे दोन विहीरी खोदण्यात आल्यात. या विहीरीवरुन ५ कि मी लांब अंतरावरुन ४ ईंची पाइपलाइन करुन तीचे पाणी संपूर्ण शेतीला मिळते. शिवाय कमी पाण्यात अधिक उत्पादन मिळावे या करीता प्रत्येक ठिकाणच्या शेतीत कोठारी कंपनीचे सूक्ष्मसिंचन (ठिबक) प्रणालीची त्यांच्या शेतीत व्यवस्था आहे.
वडिलांचा आदर्श घेवून वळले शेतीकडे
३८ वर्षीय रमेश यांचे ९ वी पर्यंत शिक्षण झाल्यावर ते पुढे न शिकता वडिलासोबत वर्ष २००२ पासून ख-या अर्थानं शेती करण्यासाठी उतरले. त्यापूर्वी वडील दूध व्यवसाय आणि भाजीपाला शेती करत असत. आई वडीलांनी भाजीपाला स्वतः बाजारात बसून विक्री करुन आणि दूधाच्या पैशातून घरखर्च भागवत व केळी, ऊस, कापूस पिकाच्या उत्पन्नाचे जमवलेले पैसे यातून थोडी थोडी जमीन खरेदी करायचे. आज घडीला वडीलांनी २५ एकराला ६० एकरची जोड देवून मुलांना स्थावर मालमत्ता कमावून ठेवली आहे. वडीलांच्या जिद्दी आणि कष्टाळू वृत्तीला प्रेरीत होवून ते जे शेतीकडे वळले. ते आज चांगलेच स्थिरावून बारमाही विविध वाणांचा भाजीपाला व मिश्र फळबाग फुलवून ईतर शेतक-यांना आदर्श निर्माण करुन दिला आहे.
भाजीपाला पिकातील हातखंडा
वडील सोपानरावच पूर्वीपासून आपल्या शेतीत अनेक वाणांच्या भाजीपाला पिकाची लागवड करीत असत. त्यांचाच वारसा जपत रमेश यांनी देखील भाजीपाल्याची साथ न सोडता अलिकडच्या काळातील आधूनिक कृषी पध्दतीचा अवलंब अंगीकारुन भाजी पिकात सातत्य ठेवले आहे. त्यांनी आपल्या शेतीत घन मिडवार पध्दतीने लागवड केलेल्या पेरु, केशर अंबा, संत्रा, अंजीर फळ पिकात अंतरपीक म्हणून टोमॅटो, हिरवी मिरची, सिमला मिरची, दुधी भोपळा, काकडी, चवळी आदी फळ भाजी पिकांची लागवड चालू ठेवली आहे. भाजीपाला पिकांच्या उत्पादन विक्रीतून ते अर्थाजन कमावत आहेत.
केळी लागवड
वर्ष आॅक्टोबर २०१८ ला साडेतीन एकर क्षेत्रात ५ बाय ५ फूट अंतरावर विलेम्स वाणाची केळी लागवड करण्यात आली होती. तीस १६ एम.एम. साईजचे ठिबक संच बसवण्यात आले. साडेतीन एकरसाठी ६ हजार रोपे लागली. योग्य खत, औषधी फवारणी आणि पाणी व्यवस्थापन योग्य झाल्याने प्रती झाडाला सरासरी २२ किलोचे उत्पादन निघाले तर ६ हजार झाडापासून १३२००० किलो केळीचे उत्पादन झाले. प्रती किलो ११ रुपये या प्रमाणे एकूण १४५२००० रुपयाचे उत्पन्न हाती आले. त्यातून उत्पादन खर्च ४ लाख वजा जाता १० लाख ५२ हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले होते.
एक एकरवर टोमॅटो
यंदा एक एकर जमीनीत ठिबकवर यु एस ४४० वाणाच्या टोमॅटोची पाच बाय दिड फूट अंतरावर लागवड करण्यात आली होती. या भाजीपाला पिकाचे संपूर्ण व्यवस्थापन चांगले झाल्यामुळे टोमॅटोचे नेमकेच उत्पादन चालू झाले आहे. सध्या बाजारात आवक वाढल्याने दर पडले असून पुढे वाढतील. त्यांना ६०००० किलो उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. प्रति किलोला १० रु दर या प्रमाणे ६००००० (सहा लाख रु) उत्पन्न तर ७०००० हजार रुपये उत्पादन खर्च वगळता ४ लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळणार आहे. याच पध्दतीने त्यांना चवळी, काकडी, हिरवी मिरची, सिमला मिरची, कारले आदी भाजीपाला पिकापासून वर्षाकाठी जवळपास आठ ते दहा लाख रुपये निव्वळ आर्थिक उत्पन्न मिळत आहे.
मिडवार पध्दतीने मिश्र फळबागेची आहे लागवड
भाजीपाला पिका बरोबरच त्यांनी मिडवार घन पध्दतीने केशर अंबा, लखनौ ४९ पेरु, लिंबोनी, संत्रा, अंजीर या फळबागेची लागवड केली असून त्यामध्येच विविध वाणांचा भाजीपाला पिकवितात.
पेरुची लागवड व उत्पादन
वर्ष २०१७ ला जुलै महिन्यात सेंद्रीय पध्दतीने ३ एकर क्षेत्रात १० बाय ८ फूट अंतरावर ठीबकवर लखनौ ४९ वाणाच्या १४५० पेरु रोपाची लागवड केली आहे. पेरु बागेला शेणखताचा वापर करतात, त्यामुळे सेंद्रीय पेरु फळांचे उत्पादन होत आहे. बागेच्या सिंचनासाठी १६ एम एम अकाराचे ठीबक संच बसवण्यात आला आहे. फळबागेवर पांढरी माशी व फळावरील अळीच्या नियंत्रणाकरीता बायो ३०३ आणि बायोझेन या औषधाची फवारणी करतात. तसेच मावा तुडतूड्यांच्या नियंत्रणसाठी गोमूत्राचा देखील स्प्रे केला जातो. दोन दिवसाआड ठीबकने पाणी दिले जाते. उन्हाळ्यात रोजच एक दोन तास कृषीपंप चालवून ठिबकने पाणी देतात. लखनौ पेरु झाडांना लागवडीपासून दुस-या वर्षी फळे लगडतात. लखनौ ४९ या पेरु वाणाचे फळ मोठे होत असून बिया कमी आणि गर अधिक तर चवीला गोड आहे. तसेच निर्यातीसाठी उत्तम दर्जेदार फळ आहे. प्रक्रिया करुन उपपदार्थही होण्यासाठी योग्य असल्यामुळे या पेरुला ग्राहक पहीली पसंती देत आहेत.
उत्पादन
१४५० पेरु झाडापासून पहिल्या वर्षी १०००० हजार किलो पेरुचे उत्पादन झाले. स्थानीक बाजारात किलोला सरासरी २५ रु दर मिळाला. एक हजार किलो फळाच्या विक्रीतून २५०००० दोन लाख पन्नास हजार रुपये आले. त्यातून ५० हजार रुपये उत्पादन खर्च जाता निव्वळ २ लाख उरले. २०१९ ला २० किलो वजनाचे ७०० कॅरेट फळे उत्पादन म्हणजे १४००० किलो फळे उत्पादीत झाले. त्यास प्रती किलोला सरासरी ३५ रु दर मिळाला. फळ विक्रीतून ४९०००० रुपये आले. यातून १ लाख रु खर्च वजा जाता ३९०००० रु निव्वळ उत्पन्न मिळाले. तसेच आता यंदा २०२० चालू वर्षात सध्या फळे काढणी चालू असून, ११००० हजार किलो फळाचे उत्पादन झाले असून, अजून शेवट पर्यंत १०००० किलो पेरु फळे निघणार आहेत. यंदा किलोला ४० रु भाव हा आॅफ सिजन असल्यामुळे मिळत असून, २१००० किलो फळ विक्रीतून ८४०००० आठ लाख ४० हजार रुपये मिळणार आहेत. त्यातून १ लाख ५० हजार रुपये उत्पादन खर्च जाता ६ लाख ९० हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
झाडांच्या फांदी छाटणी योग्य कालवधीने मिळाला अधिकचा दर
पेरु झाडांची ते जुलै आॅगष्ट मध्य फांद्यांची एक छाटणी करतात, तर कधी नोव्हेंबर मध्य एक छाटणी करतात. यामुळे एक बहार उशिरा फळे लगडून तो मार्च महिन्यात काढणीला येतात. या महिन्यात इतर पेरुचे आॅफ सिजन असल्यामुळे या पेरुला दर चांगला मिळतो. हे फांदी छाटणीच्या योग्य कालावधीने साध्य होत असल्याचा त्यांचा अनूभव आहे.
लिंबाची बाग
पेरु बरोबरच त्यांनी साडेचार एकरवर फूले शरबती जातीची ठीबकवर लिंबोनी लागवड केली आहे. तीचे यावर्षी दिडशे क्विंट्ल उत्पादन झाले. लिंबाला प्रती किलो ३० रु दर मिळाला. ४५०००० चार लाख पन्नास हजार रु लिंबू विक्रीतून मिळाले. यातून उत्पादन खर्च १ लाख ३० हजार जाता ३ लाख २० हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले. या पध्दतीने चौधरी बंधूंची भाजीपाला व फळबाग शेती ही ठीबकमुळे विकसीत झाली आहे.
शेतकरी संपर्क
रमेश सोपानराव चौधरी
मु.पो.ता. मानवत जि परभणी
मो ९९६०००८७०५
ठीबकमुळे ७० टक्के पाण्याची बचत
मी २००२ पासून शेती करतो. पूर्वी आमच्याकडे भरपूर पाणी होते. त्यामुळे आम्ही पिकांना मोकाट पध्दतीने पाणी देत होतो. पण त्यामुळे पिकात तण वाढून मजूर वाढवावी लागत. त्यामुळे आम्ही पूर्ण शेतीला ठीबक केले. त्यासाठी ७ लाख रु खर्च आला. ठीबकमुळे ७० टक्के पाण्याची बचत होवून उत्पादनही अधिक होते. शेती करताना खुप अडचणी येतात. परंतू जिद्द व लक्ष ठेवून काम केल्यावर त्यावर मात करणे सोपे आहे. शेतीसारखा दुसरा कोणताही धंदा परवडणारा नाही. शेतीमध्ये खुप काही करण्यासारखे आहे. आपण जर आलटून पालटून चार पिके घेतली, तर शेतीत कधीच नुकसान नाही. शेती करताना मला खुप अडचणी यायच्या पण प्रगतशिल शेतकरी पंडीतराव थोरात यांच्याकडून मार्गदर्शन मिळत गेल्याने त्यावर मात होत आहे. आज माझ्या शेतीत आठ ते दहा पिके असतात. त्यामध्ये भाजीपाला आवर्जून घेतो. माझे वडील सोपानराव नेहमी सांगायचे की भाजीपाला केल्यावर पैशाची अडचण येत नाही. आज आमच्या शेतीत सर्व वाणांचा भाजीपाला व सेंद्रीय पध्दतीची मिश्र फळबाग आहे. पूर्वीपेक्षा ठीबक सिंचन प्रणालीच्या वापरामुळे कमी पाण्यात अधिक उत्पादन हे भाजीपाला व फळबागेपासून मिळत असून तो सेंद्रीय असल्याने मधमाशींचा वावर मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. मला माझ्या शेतीत वडील सोपानराव चौधरी आई शंकूतलाबाई, भाऊ बाळाभाऊ, व्यंकटेश, पत्नी सौ अश्विनी, भावजया सौ राधाबाई,सौ सिमा व्यंकटेश हे कुटूंबातील सदस्य नेहमी मदत करीत असल्यामुळे एवढी मोठी शेती कसणे शक्य होत आहे.
रमेश सोपानराव चौधरी
मानवत जि परभणी
अतिशय छान,व्यवहारी आधुनिक ,व्यापारी शेतीशिवाय नफायुक्त पर्याय आपण ज्या पद्धतीने हाताळतात ती काळाची आदर्श गरज आहे.
सर्व शेतकरी बंधूंनी हा आदर्श पुढे नेण्याची गरज आहे.