प्रतिनिधी/अकोला
राज्यात दिवसेंदिवस सोयाबीन पिकाच्या पेरणीखालील क्षेत्र वाढत आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात तर सोयाबीन हे खरीप हंगामातील प्रमुख पिक ठरत आहे. खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकाची पेरणी करतांना शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. विविध कृषी विद्यापीठांच्या सूचनेनुसार बियाणे उगवण होण्यासाठी उगवणीसाठी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे. त्यासाठी सरासरी 80 ते 100 मि.मी. पाऊस पडणे आवश्यक आहे. जो पर्यंत 80 ते 100 मि.मी पाऊस होत नाही तोपर्यंत सोयाबीन पेरणी करु नका, असं आवाहन कृषी विभागानं देखील केलं आहे.
पेरणी यंत्राने पेरणी करत असल्यास काळजी घ्या.
सोयाबीन बियाणे अतिशय संवेदनशील असते, त्यामुळे त्याची साठवणूक करतांना देखील खूप काळजी घ्यावी लागते. बदलत्या धावपळीच्या काळात आता बैलाच्या आधारे सोयाबीन पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे यंत्राच्या साह्याने पेरणी करत असल्यास बियाणे जास्त खोली वरती पडणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा जास्त खोलीवर पेरणी झाल्यास बियाणे खराब होण्याची शक्यता असते.
कमी पावसावर पेरणी केल्यास दुबार पेरणीचं संकट
जोपर्यंत 80 ते 100 मि.मी. पाऊस पडत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन वारंवार कृषी विभाग करत असतो. तरीही शेतकरी बहुतांश ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या आधारावर पेरणी उरकून घेतात. त्यामुळे कमी पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केल्यास पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्याने जमिनीच्या उष्णतेमुळे बियाणे अतिशय कमी प्रमाणात अंकुरते व बियाणे जळण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार बियाणे पेरण्याची वेळ येवू शकते,
दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यावर आल्यास यामध्ये त्यांचे पैसे आणि वेळपण अधिक खर्च होतो. याचा विपरीत परिणाम उत्पादनावर होवून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. दुबार पेरणीचा खर्चही शेतकऱ्यांना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये.