पुणे ः लिंबूंच्या उत्पादनातून शेतकर्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. लिंबू फळबाग लागवडीसाठी इतर फळबागांप्रमाणे योग्य जमिनीची तसेच सुधारित जातीची निवड महत्त्वाची आहे. सेंद्रिय आणि रासायनिक दोन्ही प्रकारचा खतांच्या वापराच्या लिंबूंचे चांगले उत्पादन घेता येते.
अशी लागवडीचे अर्थशास्त्र
लिंबू पिकाला बाराही महिने जमिन ओली लागत असल्याने वर्षातून तीन वेळा म्हणजेच जून- जुलै, सप्टेंबर- ऑक्टोबर आणि जानेवारी- फेब्रुवारीत अनियंत्रितपणे फुलोरा येतो. लिंबूत विशिष्ट बहर धरणे शक्य असले तरी आर्थिकदृष्ट्या ते फायदेशीर ठरत नाही. कारण, एखाद्या विशिष्ट बहरासाठी ताण दिला, तर त्या वेळी अगोदरच्या बहराची फळे अपक्व स्थितीतच गळून पडतात. उदा. मृग बहर घेतल्यास झाडावर आंबे बहराची फळे दोन ते 2.5 महिन्यांची असतात. आंबे बहर घेतल्यास झाडावर हस्त बहराची फळे वाटाण्याएवढी असतात, ती पाण्याच्या ताणामुळे गळून जाण्याचा धोका असतो. त्यामुळे ताण देण्याच्या पद्धतीचा वापर करून एखादा विशिष्ट बहर धरणे लिंबूस शक्य होत नाही. त्यामुळे जुलै- ऑगस्ट दरम्यान 60-65 टक्के फळे मिळतात. कागदी लिंबूंना उन्हाळ्यात चांगला भाव मिळतो. लिंबू लागवडीचे अर्थशास्त्र हे प्रत्येक बहरापासून मिळणारे उत्पादन व बाजारभाव यावर अवलंबून असते. मार्च, एप्रिल व मे महिन्यात लिंबू फळांना मागणी जास्त असते, त्यामुळे त्या काळात बाजारभावही चांगला असतो. म्हणून एप्रिल व मे महिन्यात लिंबू फळांचे उत्पादन घेण्यासाठी हस्त बहराचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
लागवड आणि व्यवस्थापन
लिंबू लागवडीसाठी मध्यम प्रकारची तसेच काळी, हलकी, त्याचा चांगला निचरा होणारी, मुरमाड जमिन उपयुक्त ठरते. मात्र, ही जमिन ही चुनखडीयुक्त नसावी. ज्या जमिनीत लागवड करायची आहे, त्या जमिनीच्या मातीचे परीक्षण करून घेणे महत्वाचे आहे. लिंबंची लागवड करताना सहा बाय सहा मीटर अंतरावर 3+3+3 फूट आकाराचे खड्डे खोदावेत. खोदलेल्या खड्ड्यांची उन्हाळ्यामध्ये उन्हात निर्जंतुकीकरण करून घ्यावे. पावसाळ्यात लागवड करण्याअगोदर कार्बेन्डाझिम दोन ग्रॅम + क्लोरोपायरीफॉस(50 टक्के इसी) अडीच ग्रॅम प्रती लिटर पाणी या द्रावणाने खड्ड्यांची निर्जंतुकीकरण करावे. खड्डा भरताना त्यामध्ये दहा किलो शेणखत, एसएसपी 2किलो, निंबोळी पेंड एक किलो आणि ट्रायकोडर्मा 25 ग्रॅम पोयटा माती मध्ये मिसळून घ्यावे व त्यानंतर लागवड करावी. कलमांची निवड करताना गोर आणि कीड प्रतिकारक्षम असलेल्या वाणांची निवड करावी. तसेच रोप घेताना ते खात्रीलायक रोपवाटिकांमधून घ्यावे. लिंबू लागवडीसाठी फुले शरबती किंवा साई शरबती या जातीची निवड आपण करू शकतो.
ठिबकद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन
अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी शिफारशीच्या मात्रांच्या 80 टक्के (1083 ग्रॅम युरिया आणि 960 ग्रॅम 00:00:50) प्रती झाडासाठी, प्रती वर्ष दीड महिन्याच्या अंतराने समान हप्त्यांमध्ये ठिबक सिंचनाद्वारे द्यावे. 1875 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट प्रति झाड द्यावे. सिंगल सुपर फॉस्फेट हे 15 किलो निंबोळी पेंड+15 किलो सेंद्रिय खतांबरोबर द्यावे. लिंबूंच्या झाडांमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असेल तर त्यामध्ये अनेक विकृती निर्माण होतात. त्या टाळण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या संयुक्त मिश्र खतांची फवारणी करणे आवश्यक आहे. एका वर्षात साधारण दोन वेळा झिंक सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, मॅग्नीज सल्फेट प्रत्येकी पाच ग्रॅम प्रती लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. त्यासोबतच फेरस आणि कॉपर सल्फेटची प्रत्येकी तीन ग्रॅम प्रती लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करणे फायदेशीर ठरते.