पीकांची काळजी घ्या, पुर्वहंगामी मशागतीसाठी याेग्य वेळ
जळगाव । अरबी समुद्रात मान्सुनसाठी अनुकुल स्थिती निर्माण झाली असतांना दुसरीकडे देशभर अवकाळी पाऊस, गारपीटीचे संकेत आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या २१ एप्रिल पर्यंत मराठवाडा, मध्य-उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात अवकाळी पाऊस हाेवू शकताे. या इशाऱ्यानुसार शेतकऱ्यांना या काळात रब्बीच्या पीकांची काळजी घेण्यासह पुर्वहंगामी मशागत चांगल्या पद्धतीने करणे शक्य हाेईल.
राज्यावर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरावरून होणारा बाष्यपाचा पुरवठा यामुळे राज्यात 19 ते 21 एप्रिल पर्यंत पावसाची शक्यता आहे. रविवारी राज्यात वादळी वारे वाहण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील 10 जिल्ह्यांना या वाऱ्याचा फटका बसू शकतो. दरम्यान राज्यातील काही भागात उन्हाचा कडाका वाढला आहे .
प्रभावित होणारे क्षेत्र
हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे . कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात वादळी वारे होण्याची शक्यता 51 ते 75 टक्के आहे. या जिल्ह्यातील वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर राहील असे त्यांनी म्हटले आहे.
अधुन-मधुन सुरू असलेल्या अवकाळी पावसाची मालिका अजुनही सुरूच आहे. सध्या पुर्व, उत्तर आणि ईशान्य भारतामध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे. वातावरण बदलाची ही शुंखला महाराष्ट्रात देखील सुरू आहे. तापमान ४३ अंशावर गेले असतांनाच दुसरीकडे अवकाळी पावसाचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी योग्य खबरदारी घेऊन अवकाळी पावसापासून रब्बीच्या पीकांना वाचवावे. मका, कांदा, केळी,भाजीपाला काही भागातील उर्वरीत गहू पीकांची काळजी घ्यावी. भुईमुंगाची पेरणी केली असल्यास अवकाळी पावसानंतर भुईमुंग काढणे साेईचे हाेईल. शेतातील तयार शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. आपल्या पशुधनास संरक्षित ठिकाणी हलवावे.
खरिपाच्या मशगतीसाठी होऊ शकते सुरूवात
काही भागात गेल्याच पंधरवाड्यात अवकाळी पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी नांगरटी, वखरटी, ट्रिलर, राेटाव्हेटर सारखी पुर्व हंगामी मशागतीची कामे करून घेतली आहेत. या आठवड्यात हाेणाऱ्या अवकाळी पावसानंतर देखील शेतीच्या मशागतीची कामे साेपी हाेतील. पावसानंतर योग्य वापसा आल्यानंतर नांगरटी केल्यास जमीन भुसभूशीत हाेते. त्यामुळे हवामानाच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी या आठवड्यात शेतीच्या कामांचे नियाेजन करणे आवश्यक आहे.