प्रतिनिधी/पुणे
राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाची उघडीप राहणार असून, तापमानात किंचित वाढ होऊ शकते. पूर्व विदर्भात मात्र पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. राज्यात पूर्व विदर्भात गुरुवार (दि.२६ ऑगस्ट) पासून तुरळक ठिकाणी पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण वगळता राज्यातील इतर भागात मात्र पुढील काही दिवस पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे वातावरण अंशतः कोरडे व ढगाळ हवामान असणार आहे. कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सक्रीय होत असून त्यामुळे उत्तर भारतातील राज्यांकडे पावसाची शक्यता आहे.
यामुळे पावसाची उघडीप
मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानपासून आसामपर्यंत सक्रीय आहे. राजस्थान लगत चक्रकार वाऱ्याची स्थिती आहे. त्याचबरोबर हरियाणा लगत अशीच स्थिती असल्याने तेथून अरबी समुद्रापर्यंत दोन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. श्रीलंका व तामिळनाडू किनारपट्टीवर देखील चक्रकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे पावसाला पोषक वातावरण नाही परिणामी राज्यात पावसाने उघडीप घेतली आहे.