मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसत असला तरी अनेक ठिकाणी अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यात एकीकडे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे, तर दुसरीकडे 27 जुनअखेर राज्यात सरासरीच्या फक्त 7 टक्के इतकीच कडधान्य पेरणी होऊ शकली आहे. त्यात तेलबियांची पेरणीही धोक्यात आलेली असून तीळ, कारळची पेरणीच झालेली नाही. कडधान्य पेरणी लांबल्यास राज्याच्या संपूर्ण खरीप हंगामावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यातच पावसाने ओढ दिल्याने अनेक धरणातील पाणीसाठा आटू लागला आहे. अनेक शहरातील पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली आहे.
राज्यात गेल्यावर्षी आजच्यातारखेपर्यंत सरासरी 270 मिलीमीटर पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा मात्र केवळ 134 मिमी. पाऊस झाला आहे. गतवर्षी आजच्या दिवशी पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा मात्र खरीपाखालील क्षेत्रापैकी केवळ 13 टक्के (20.30 लाख हेक्टर) क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.
आमदारांच्या अध्यक्षतेखाली तालुका पीक कर्ज वाटप आढावा समितींची स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
भात, मका, बाजरीचीही पेरणी असमाधानकारक
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 27 जूनअखेर सरासरीच्या तुलनेत तृणधान्यापैकी भाताची पाच टक्के, खरीप ज्वारी एक टक्का, बाजरी सहा टक्के, रावी तीन टक्के आणि मक्याची दहा टक्के इतकीच पेरणी होऊ शकली आहे. सह्याद्री घाट परिसरात पाऊस सुरू झाल्यामुळे राजगिरा, कोडू, कोद्रा, कुटकी, वरई, बार्टी, सावा, राळा, नाचणी याची पेरणी दोन टक्केच झाली आहे. तृणधान्याची एकूण पेरणी सहा टक्के झाली आहे. कडधान्य पिकाची पेरणी सरासरीच्या सात टक्के झाली आहे. त्यात तूर आठ टक्के, मूग दहा टक्के, उडीद सात टक्के, तर कुळीथ, चवळी, मटकी, राजमा या इतर कडधान्याची पेरणी फक्त तीन टक्केच झाली आहे. तेलबियाची पेरणी सरासरीच्या दहा टक्के झाली आहे. त्यात भुईमुग सहा टक्के, सूर्यफूल नऊ टक्के, सोयाबीन दहा टक्के इतकी पेरणी झाली आहे. याऊलट तीळ, कारळची पेरणीच होऊ शकलेली नाही.
जुलैत कडधान्य पेरण्यांना वेग येण्याची शक्यता
राज्याचे कृषी व प्रशिक्षण संचालक विकास पाटील यांनी, जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरण्यांना चांगला वेग येईल, अशी आशा व्यक्त केली. राज्यभरात आता पावसाळी वातावरण निर्माण होऊ लागलेले आहे. त्यामुळे तूर, सोयाबीन, कापसाची 15 जुलैपर्यंत पेरणी करता येऊ शकेल. तर, कडधान्यांची पेरणी सरासरीच्या 60 टक्क्यांपर्यंत पोहोचेल, असा अंदाजही विकास पाटील यांनी वर्तविला. मात्र, मूग, उडीद, मटकी, चवळी खालील क्षेत्र तूर, बाजरी, सूर्यफूल, सोयाबीनकडे वळण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
काय सांगता काय, आता चंद्रावरही करता येणार शेती..!
शेतकरी कडधान्य पेरणी टाळण्याची शक्यता
लहरी पावसाचा खरीप पेरण्यांना मोठा फटका बसला आहे. सात जुलैअखेर पाऊस सुरू न झाल्यास खरीप हंगामातील पीकउत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. कडधान्यांची पेरणी जूनअखेर न झाल्यास काढणीच्या वेळी ही पिके परतीच्या मोसमी पावसात सापडून मोठे नुकसान होण्याचा धोका असतो. त्याशिवाय रब्बी ज्वारी पेरणीसाठी शेत वेळेवर मोकळे होत नसल्याने शेतकरी सहसा उशिरा कडधान्य पेरणी करण्याचे टाळतात. त्याऐवजी शेतकरी मग ऊस, ज्वारी, चारा पिकांकडे वळण्याचा धोका असतो. यात शेतकऱ्यांचे नुकसान तर होतेच; पण एकूण खरीप उत्पादकतेवरही मोठा परिणाम होण्याचा धोका असतो. त्यामुळे आता राज्यात सर्वत्र पावसाची मोठी गरज आहे.
राज्यातील विभागवार पाणीसाठा
राज्यातील धरणातील एकूण पाणीसाठा 28 जूनअखेर 21.82 टक्के इतका आहे. विभागवार पाणीसाठ्यामध्ये अमरावती विभागातील प्रकल्पात 33.80 टक्के, मराठवाडा विभागात 27.10 टक्के, कोकण विभागात 34.43 टक्के, नागपूर विभागात 26.81 टक्के, नाशिक विभागात 20.02 टक्के, पुणे विभागात 12.35 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
Comments 1