रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी हरभरा हे पिक महत्वाचे कडधान्य पिक आहे.राज्यासह जळगाव जिल्ह्यात सुध्दा मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाची केळी पट्ट्यात म्हणजेच रावेर,यावल,चोपडा व कोरडवाहू क्षेत्रावर उर्वरित तालुक्यात लागवड केली जाते.सध्या खरीप हंगामातील पिकांची काढणी झालेली आहे जसे की, उडीद,मुंग व लवकरच मका व सोयाबीन सारखी पिक काढणीला येतील. शेतकरी रब्बी हंगामाची पेरणी करण्यासाठी तयारी सुरु करणार असतील यामध्ये हरभरा लागवड करतांना योग्य वाणांची निवड करणे फायदेशीर ठरणार आहे.
पेरणीची योग्य वेळ –
रब्बी हंगामात हरभरा पेरणी करण्याची योग्य वेळ हस्त नक्षत्राच्या पहिल्या चरण नंतर म्हणजे २५ सप्टें.पासून ऑक्टोंबर पहिला पंधरवडा होय. बागायती हरभरा २० ऑक्टो. ते १० नोव्हें. या काळात लागवड करू शकतात मात्र याकरिता सिंचनाची सोय असणे आवश्यक आहे.
बीजप्रक्रिया आवश्यक –
पेरणी करण्यापूर्वी प्रती किलो बियाण्यास २ ग्राम थायरम अधिक २ ग्राम बाविस्टीन किंवा ५ ट्रयकोडर्मा या जैविकबुरशी नाशकाची बीजप्रक्रिया करावी.त्याच प्रमाणे २५० ग्राम रायझोबियम प्रती १० किलो बियाण्यास गुळ मिश्रित थंड द्रावणा मध्ये मिसळून चोळावे.
वाण निवड महत्वाचे
१. विजय,विशाल,दिग्विजय हे वाण देशी प्रकारातील असून जिरायती,बागायती तसेच उशिरा पेरणी करण्यास योग्य व मर रोगास प्रतिकारक आहेत.
२. काबुली हरभरा मध्ये विराट,पी के व्ही २,पी के व्ही ४, आणि कृपा हे वाण अधिक उत्पादन देणारे असून विशाल हा टपोरा दाण्यांचा वाण आहे तर विराट उच्च उत्पादनशील व मर रोगास प्रतिकारक आहे.
३. जाकी ९२१८- अति टपोरा दाणा असलेला वाण आहे व शून्य मशागतीवर पेरणीसाठी योग्य आहे.
४. गुलक १ – या वाणाचे दाणे टपोरे,गोल व गुळ गुळीत असतात तसेच फुटाणे करण्यासाठी योग्य आहे.
५. पी के व्ही हरिता- दाण्याचा रंग वाळल्यानंतर सुध्दा हिरवा राहतो.उसळ,पुलाव करण्यास उत्कृष्ठ आहे
६. बी डी एन जि ७९७- या वाणाचे दाणे टपोरे असून अवर्षण व मर रोगास प्रतीकाक्षम आहे.
७. फुले विक्रम – राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने नुकताच हा वान प्रसारित केलेला आहे.वाढीचा कल उंच असल्यामुळे यांत्रिक पध्दतिने (कम्बाईन हर्वेस्टर)काढणी करण्यास उपयुक्त आहे.तसेच जास्त उत्पादनक्षम असून उशिरा पेरणी करण्यास योग्य आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
प्रमुख,कृषी विज्ञान केंद्र,पाल जि- जळगांव
फोन.नं- 02584288525
महेश वि महाजन विषय विशेषज्ञ(पिक सरंक्षण) कृषी विज्ञान केंद्र,पाल जि.जळगाव
मो.8669791959