फुले त्रिवेणी गाय
ही गाय म्हणजे तीन जातींचा संकर आहे. गो-संशोधन आणि विकास प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील शास्रद्यांनी 27 वर्षांच्या अथक परिश्रमातून या त्रिवेणी गायींची पैदास केली आहे. स्थानिक गीर गायींबरोबर जर्सी, या विदेशी वळूचा संकर करून 50 टक्के जर्सी आणि 50 टक्के गीर हि गाय तयार करण्यात आली. या संकरीत गीर गायीची प्रजोत्पादन क्षमता, रोग प्रतिकार शक्ती, वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता, दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण चांगले दिसून आले. फक्त दुध देण्याचे प्रमाण वाढवून मिळावे यासाठी प्रयत्न चालले.
वैशिष्ट्ये- संकरीत गीर या निर्मित जातीचा पुन्हा होल्स्टिन-फिजियन आणि 25 टक्के जर्सी, 25 टक्के गीर हि तीन जातींची संकरीत गाय तयार झाली आहे. या परजातीय संकरीत गायीत सर्व गुण चांगले दिसून आले. गो-पैदास केंद्र आणि काही गोपालकांच्या स्तरावर अनेक वर्षांच्या अनुभवावरून या थ्री जातीय संकरीत गायीत ठळक वैशिट्ये दिसून आलीत. फुले त्रिवेणी गाय एका वितात जास्तीत जास्त 6 ते 7 हजार लिटर दुध देते. दुधात 5.2 टक्के स्निग्धांश (फॅट) जास्तीत जास्त मिळाला. रोग प्रतिकार शक्ती चांगलीच आहे. वातावरणाशी लवकर समरस होण्याची क्षमता. मृत्यूचे अल्प प्रमाण. पुढच्या पिढीतही दुग्धोत्पादनाचे प्रमाण टिकून राहते. दुधात सातत्य राहते. भाकड काळ 70 ते 90 दिवस आहे. रोजचे सरासरी दुधाचे प्रमाण 10 ते 12 लिटर (एका गोपालकाच्या त्रिवेणी गायीने एका दिवसात 4.2 फॅटचे 32 लिटर दुध दिल्याची नोंद आहे. त्रिवेणी गायीच्या दुधातील फॅट 4 ते 5 पर्यंत असल्याची आढळून आले आहे. या कालवडी 18 ते 20 महिने वयाच्या असताना माजावर येतात. पहिली गर्भधारणा 20 ते 22 महिन्यांत होते. प्रथम विण्याचे वय 28 ते 30 महिने असते. दोन वितातले अंतर 13 ते 15 महिने असते. अशी फुले त्रिवेणी गाय मध्यम बांध्याची, 335 ते 350 सें.मी. लांबीची, 150 ते 160 ते सें.मी. उंचीची, 300 ते 400 किलो वजनाची असते. कपाळ चपटे, नाक फुगीर आणि बाकदार असे असून दुधाल गायीची सर्व वैशिष्टये या गायीत पाहायला मिळतात. फुले त्रिवेणी हि संकरीत गाय दुध व्यवसायातल्या क्रांतीत चांगला सहयोग देतेय. हे अनेक गोपालकांच्या अनुभवावरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे गोपालकांनी या जातीच्या गायीचं दुग्ध व्यवसायासाठी पालन करावे. त्यांच्या व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे. किंबहुना बेरोजगार तरुणांनी फुले त्रिवेणी या गाई किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी निश्चितपणे पाळाव्यात.
गीर (गुजरात)
भारतीय गोवंशामध्ये दूध उत्पादनासाठी जेवढे गोवंश प्रसिद्ध आहेत, त्यापैकी सर्वोत्तम गोवंश म्हणून गीर गोवंशचा पहिला क्रमांक आहे. आपल्या देशामध्ये गुजरात राज्याचा पश्चिम व दक्षिण भाग, महाराष्ट्र राज्यातील गुजरातच्या सीमेलगतचा प्रदेश तसेच राजस्थान राज्यामधील टोंक व कोट जिल्हे गीर गोवंशाचे उगमस्थान मानले जातात. या भागामध्ये ह्या गोवंशाची मोठ्या प्रमाणावर संशोधनात्मक उत्तम वंश निर्मिती केली जाते आणि मोठ्या प्रमाणावर गोवंश विक्रीसाठी उपलब्ध असतो. गुजरात सरकार गीर गोवंशावर मोठ्या प्रमाणावर संशोधनात्मक कार्य उंच वंशावळ प्राप्तीसाठी करत आहे. कॅटल ब्रिडींग फार्म जुनागड – अँग्री. युनि. हे त्याचे आदर्श उदाहरण आहे.
वैशिष्ट्ये- या जातीचे बैल गायींप्रमाणेच धष्टपृष्ट व थोराड असतात, बैलांचे मस्तकाची ठेवण चेहर्याचे मानाने मोटे व नजरेत भरणारी असते. बैलांमध्ये वशिंड मोठे व घट्ट आणि गडद अशा काळसर छटेचे असते, बैल लाबपौंडी असतात, बैल अत्यंत शांत व सुस्वभावी असतात मारकेपणा क्वचीतच आढळतो, पूर्ण वाढ झालेल्या गायीचे वजन साधारण: 350 ते 400 कि. ग्रॅ. असते आणि पूर्ण वाढ झालेल्या बैलाचे वजन 450 ते 550 किलोग्रॅम पर्यंत असते.
या गोवंशाच्या कालवडींचे प्रथम माजावर येण्याचे वय साधारणपणे 30 ते 38 महिन्यांचे असते. चांगल्या सांभाळलेल्या कालवडी 24 महिन्यांच्या सुद्धा माजावर आल्याची उदाहरणे पाहण्यात आहेत. दुग्धोत्पादनाची क्षमता प्रथम वेतापासन तिसर्या वेतापर्यंत आकर्षक चढत्या कमानीची असते. हा गोवंश सलग जास्तकाळ, उत्तम स्निग्धांश व भरपूर दुग्धोत्पादन यासाठीच प्रसिद्ध आहे. सर्वसाधारण मेहनतीवर दिवसाकाठी 6 ते 7 लिटर दूध सहज देतात. आपल्या देशामध्ये दुग्धोत्पादन स्पर्धेमध्ये 24 तासांमध्ये 17 लिटर दूध देण्याची नोंद आहे. सरासरी स्निग्धांश 4.50 ते 5.50 पर्यंत असू शकतो. एका वेतामधील सरासरी दुग्धोत्पादन 3210 कि.ग्रॅ. मिळते. दोन वेतामधील अंतर 18 ते 24 महिन्यांचे असते. दोन वेतांमधील भाकडकाळ 100 ते 150 दिवसापर्यंत असू शकतो. अशा उत्तम गुणवत्तेच्या गोवंशावर ब्राझील व अमेरीकेमध्ये संशोधन झाले व त्यातून मब्राह्मणीफ गोवंश विकसित झाला. या गायी एकाच किणी उत्तम पद्धतीने सांभाळल्यास 10 ते 12 वेणी एकाच घरी निश्चित होतात. तसेच चांगली बैलजोडी 15 ते 18 वर्षे उत्तम काम करु शकते. या जातीची खोंड वयाच्या तिसर्या वर्षापासून शेतीकामात हळूहळू धरण्यास योग्य असतात.
कांकरेज (गुजरात)
भारतीय गोवंशामधील बघताच क्षणी प्रेमात पडावे असा लोभस गोवंश म्हणजे कांकरेज गोवंश होय. ह्या गोवंशाने त्याच्या अंगच्या गुणवत्तेने परदेशीयांना सुद्धा संशोधन करण्यास भाग पाडले आहे. आर्यांनी ज्यावेळी आक्रमण केले त्यावेळी त्यांच्या बरोबर असलेला गोवंश म्हणून ह्या गोवंशाची नोंद आहे. कमी पावसाच्या प्रदेशात निकृष्ट अन्नावर पोषण होऊन देखील उत्तम गुणवत्ता सिद्ध करणे, हे या गोवंशाचे प्रमुख वैशिष्टय आहे. भारतामध्ये कच्छच्या रणाच्या दक्षिण भागात म्हणजेच पुर्वेकडील देशापासून ते पश्चिमेकडील राधानूपूर जिल्ह्यापर्यंत हा गोवंश उत्तम पद्धतीने सांभाळला जातो व दरवर्षी उत्तम जनावरे माघ महिन्यापासून चैत्र पौर्णिमे पर्यंत विक्रिसाठी उपलब्ध असतात. त्याच प्रमाणे काठेवाड, बडोदा, सुरत या भागात सुद्धा हा गोवंश मोठ्या प्रमाणावर व उत्तम पद्धतीने सांभाळला जात आहे. ह्या गोवंशाला स्थानिक भाषेत वडीहार, वगाड, वगाडीया अशा उपनावांनी देखील संबोधले जाते.
वैशिष्ट्ये- या गोवंशाच्या कालवडीचे प्रथम माजावर येण्याचे वय साधारणत: 30 ते 36 महिन्यांचे दरम्यान असते. प्रथम वेतामध्ये या गायी दिवसाकाठी सर्वसाधारण मेहनतीवर 6 ते 7 लिटर दूध सहज देतात, सलग 270 ते 300 दिवस विनातक्रार जेवढे आहे तेवढे दूध देणे ही या गोवंशाची खासीयत आहे. सर्वसाधारणपणे दूधाची फॅट 3.5 ते 4 चे दरम्यान असते. दोन वेतांमधील अंतर 18 ते 22 महिन्यांचे दरम्यान असते तर संपुर्णत: भाकडकाळ 4 ते 6 महिन्यांचा असतो. जन्मत: वासरांचे अंगावर विविध रंगाच्या छटा असतात पण वासरू जसे 6 ते 7 महिन्यांपेक्षा मोठे होऊ लागते तसा मुळ गोवंशाचा रंग येऊ लागतो. ह्या गोवंशाचे बैल वयाची चार वर्षे पुर्ण झाली की शेतीकामास योग्य होतात. बैल लांब पौंडी असल्यामुळे अंतर कमीतकमी श्रमात व झपाट्याने कापतात. बैल ओढ कामात व शेतीकामात अंगची विलक्षण ताकद सिद्ध करुन दाखवतात. या बैलांमध्ये मारकेपरणा क्वचीत आढळतो, ही जनावरे अत्यंत शांत व सुस्वभावी असतात. एका मालकाकडे उत्तम मेहनतीवर ही बैलजोडी 20 ते 22 वर्षे सहज काम करते तसेच गायीची 8 ते 10 वेणीसहज होतात. या गोवंशाच्या उत्तम बैलजोडीची किंमत 75 ते 80 हजाराचे दरम्यान असते तर उत्तम गायीची किंमत 25 ते 35 हजाराचे दरम्यान असते. आपल्या सरकारने या गोवंशाचे महत्त्व जाणून पोस्टाचे रु. 3 रुपयाचे टपालाचे तिकीट काढले आहे.
ब्राझील देशाने हा गोवंश स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांच्याकडे नेऊन अभ्यासपूर्ण संशोधन करुन उत्तम गुणवत्तेचा परीपूर्ण असा गुजेरात नामकरण केलेला गोवंश निर्माण केला. अमेरिकेमध्ये सुद्धा या गोवंशावर विशेष संशोधन झाले आहे.
थारपरकर (राजस्थान)
भारतीय गोवंशामधील दुहेरी उपयुक्तता असलेले जे गोवंश आहेत त्यामध्ये गुणवत्तेनुसार अग्रभागी असलेला गोवंश म्हणजे थारपारकरफ गोवंश होय. या गोवंशाला कमी पावसाच्या प्रदेशात सातत्याने येणा-या दुष्काळ सदृश परिस्थितीशी सामना करुन तग धरून राहण्याचे असे निसर्गाचे प्रचंड वरदान लाभलेले आहे. या गोवंशाचे मूळ उत्पत्तीस्थान दक्षिण सिंध (सध्या पाकिस्तान) येथील थारपारकर या जिल्ह्यामधील आहे. त्यावरुनच या गोवंशाला थारपारकर, असे नाव नोदणीकृत झाले. सध्या आपल्या देशामध्ये पाक सीमेजवळील राजस्थानचा भाग; या पश्चिमी भागापासून ते थेट गुजरातमधील कच्छच्या रणापर्यंत हा गोवंश मोठ्या प्रमाणात सांभाळला जातो व विक्रीसाठी उपलब्ध असतो. राजस्थान व गुजराथ मधील गोशाळांमध्ये हा गोवंश अतिशय चांगल्याप्रकारे अभ्यासपूर्वक जोपासला जात आहे.
वैशिष्ट्ये- या गोवंशाचा पूर्ण वाढ झालेल्या बैलांमध्ये मानेच्या अर्ध्यांभागापासून ते वशिंडा पर्यंतचा रंग काळसर गडद छटेचा असतो, चेहरा लांबट निमुळता असतो, नाकपुडी संपूर्णपणे काळी असते, पुढच्या ढोपराच्या जागचे केस काळ्या गडद छटेचे असतात, खुर काळे उंच टणक असतात, मागच्या मांड्या व पुठ्ठे गोलाकार असतात, बैलामध्ये कातडी जरा जाडसर असते व बैल वेसीला किंचीत जड असतात. पूर्ण वाढ झालेल्या उत्तम तयारीच्या बैलाचे वजन 475 ते 500 कि. ग्रॅ पर्यंत असते तर पूर्ण वाढ झालेल्या व उत्तम गायीचे वजन 375 ते 400 कि. ग्रॅ. पर्यंत असू शकते. या गोवंशाच्या कालवडींचे प्रथम माजाचे वय 32 ते 36 महिन्यांचे दरम्यान असते. प्रथम वेतापासून चौथ्यावेतापर्यंत दुग्धोत्पादनामध्ये सातत्याने लक्षणीय वाढ दिसते. प्रथम वेतामध्ये दिवसाकाठी सर्वसामान्य मेहनतीवर 6 ते 7 लिटर दूध सहज देतात. दोन वेतांमधील अंतर 15 ते 20 महिन्यांचे दरम्यान असते तर त्यामधील संपूर्णत: भाकडाकाळ 4 ते 7 महिन्यांचा सहज असू शकतो. दुधाला सरासरी फॅट 4 ते 5 दरम्यान लागते. सन 1937 ते 1938 या काळात कर्नाळ येथे झालेल्या अभ्यासानुसार एका गायीचे एक वेतामधील 284 दिवसांमधील दूध उत्पादन 4719 पौंड भरले होते. या उत्तम गुणवत्तेमुळेच संपूर्ण भारतभर शेती महाविद्यालये, सरकारी फार्म, मिलेटरी डेअरी फार्ममध्ये मुळचा गोवंश म्हणून थारपारकर या गोवंशाची निवड करण्यात आली होती.
Comments 1