जळगाव (चिंतामण पाटील) – पॉवर टरबाईन हाताळण्यात तरबेज असलेल्या राजाराम पाटील (बाळू पाटील) यांनी नोकरी सोडून स्वतः म्हशींच्या संगोपनातून किरकोळ दुध विक्री सुरू केली. दोन म्हशींपासून झालेली सुरुवात आज दररोज 425 लिटर दूध संकलनावर पोहोचली आहे. दूध व्यवसाय म्हणजे रोख पैशांचाही रतीब, असल्याचे ते सांगतात. सध्या 40 म्हशींच्या तबेल्याची उभारणी त्यांनी सुरू केली असून अनेकांना ते रोजगार देऊ शकणार आहेत.
एरंडोलवरून चाळीसगांव जातांना कासोदा गावच्या अलीकडे वनकोठे येथे भग्नावस्थेत उभा असलेला वसंत सहकारी साखर कारखाना दिसतो. कधीकाळी कामगार आणि शेतकर्यांच्या संपन्नतेचे प्रतिक असलेला हा कारखाना काळाच्या आघातात या सार्यांच्याच दुर्दशेला देखील कारण ठरला. या दुर्दशेचे शिकार झालेल्या पैकी सुरेश त्र्यंबक पाटील हे एक, सुरेश पाटील हे मूळचे धरणगाव तालुक्यातील बोरगाव इथले..!
1980 ते 90 हा कारखान्याचा चलतीचा कालखंड. सुरेश पाटील कारखान्यात टाईम किपर म्हणून काम करीत होते. त्यांना दोन मुले पंडित व राजाराम. यापैकी राजाराम उर्फ बाळू यांनी 12 वी नंतर पॉवर टरबाईनमध्ये आयटीआय केले. या शिक्षणामुळे साखर कारखान्यात सहज नोकरी मिळू शकेल या हेतूनेच वडील सुरेश पाटील यांनी बाळू पाटील यांना पॉवर टरबाईनमध्ये शिक्षण घेण्यास सांगितले.
जळगावात मंगळवारी 19 ऑक्टोबरला अॅग्रोवर्ल्ड आयोजीत एकदिवसीय कुक्कुटपालन कार्यशाळा; प्रवेश मर्यादित..
अवघ्या 2 म्हशींपासून केली सुरुवात
नोकरीचा शोध असतानांच बाळू पाटलांनी वनकोठे येथेच 2 म्हशी घेऊन किरकोळ दूध विक्रीला सुरुवात केली. पुढे व्याप वाढत जाऊन म्हशींची संख्या 8 वर पोहोचली. कारखान्याच्या क्वार्टरवर दूध खपू लागले. आता चांगला पैसा मिळू लागला होता. दरम्यान 1998 ला कारखाना कायमस्वरूपी बंद पडला, वडिलांची नोकरी गेली. कारखान्यावरील कामगारांचे पगार थकले. परिणामी राजाराम (बाळू) पाटील यांच्या दुधाची सुमारे 2 लाख उधारी बुडाली. यात 98 ते 2000 यावर्षी दुष्काळाची भर पडली आणि धंदा बंद करावा लागला.
… आणि पुन्हा नोकरीकडे
दुधाच्या व्यवसायात स्थिरावू पहात असतांनाच अनेक संकटांमुळे तो बंद करून पुन्हा पॉवर टर्बाईन ऑपरेटर म्हणून 2000 पासून नोकरीस सुरुवात केली. 2000 ते 2018 हा 18 वर्षाचा कालखंड त्यांच्यासाठी कसरतीचा होता. हाती कौशल्य असल्याने त्यांना सतत नोकर्या मिळत गेल्या. या 18 वर्षाच्या कालखंडात त्यांनी 5 वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी केली. अखेर नोकरीत काही राम नाही या निर्णयावर ते आले आणि पुन्हा ते आपल्या मूळ गावी परतले नवा संकल्प घेऊन.
दुधव्यवसायाचा पुनश्च हरी ओम
नोकरीतील हातात उरलेले 50 हजार व त्यांचे स्नेही रतन बेलदार यांनी 3 लाखांची मदत केल्याने 8 म्हशी खरेदी करून दूध विक्रीस सुरुवात केली. दररोज 90 ते 100 लिटर दुधाची विक्री होऊ लागल्याने महिन्याला 40 ते 45 हजार रुपये कमाई होऊ लागली. परिणामी पुढील 4 महिन्यात दूध विक्री व 4 म्हशी विकून 3 लाखांची परतफेड केली. आताशी त्यांना 18 हजार रुपये महिना पगाराचाही विसर पडला होता.
मोठा भाऊ नोकरी सोडून व्यवसायात सहभागी
व्यवसायात व्याप वाढू लागल्याने पुण्यात चांगल्या नोकरीत असलेला मोठा भाऊ पंडित (अनिल) याला नोकरी सोडून व्यवसायात मदतीसाठी बोलावून घेतले. दोन्ही भाऊ एकत्र आल्याने व्यवसायात वाढ अपेक्षित होतीच. त्यातूनच कासोद्यापासून 4 किमी अंतरावरील नांदखुर्द येथे दूध संकलन केंद्र सुरू केले. तेथून आता दररोज सुमारे 300 लिटर दूध गोळा होऊ लागले. घरचे व नांदखुर्द येथील मिळून 425 लिटर दुधाची विक्री होऊ लागली. यापैकी 125 लिटर दुधाची किरकोळ विक्री होऊ लागली व उर्वरित दूध दूधसागर डेअरीला देऊ लागले.
दूध संकलन व्यवसायाने प्रगती
व्यवसायातील प्रगतीबद्दल सांगताना बाळू पाटील म्हणाले की, कारखान्याच्या भरवश्यावर वडिलांचे आयुष्य व आमचे ऐन तारुण्य हलाखीत गेले. 18 वर्षात 5 ठिकाणी नोकरी करता करता हाल झाले. अनेक बरे वाईट अनुभव आले. त्यातून बरेच शिकता आल्याने व्यवसायात अधिक जीव ओतला. त्यामुळे आज चांगले दिवस पाहायला मिळाले. या व्यवसायामुळे आम्हा भावा-बहिणींची लग्ने झाली, कर्ज फेडले, वनकोठे, कासोद्यात प्लॉट घेतले. आता 2018 ते 21 या 3 च वर्षांत आर्थिक परिस्थिती स्थिरावली असून सुमारे 15 लाखांची गुंतवणूक करता आली आहे.
दूध प्रक्रिया उद्योगाचा संकल्प
बाळू पाटील व अनिल पाटील या बंधूंनी आता 40 म्हशींचा तबेला उभारणी करण्याचे ठरविले आहे. शिवाय संकलन केंद्रावरही दुधाची आवक वाढणार आहे. आगामी काळात मोठ्या प्रमाणात दूध संकलन होणार असल्याने फक्त किरकोळ दूध विक्री व्यवसाय शक्य होणार नाही म्हणून दुग्धजन्य पदार्थ तयार करण्याचा प्रकल्प सुरू करण्याचा विचार या दोघा भावांनी केला आहे.
भाकड जनावरे ठेवत नाहीत
बाळू पाटील दुधाळ जनावरे गुजरात राज्यातून आणतात. बहुतांश जनावरे 4 ते 5 महिन्याची गाभण असतात. ती व्यालयानंतर फक्त एकच दुभते घेऊन पुन्हा ते विकून टाकतात. भाकड जनावरे पोसण्यापेक्षा ते पुन्हा गाभण जनावरे घेतात. त्यामुळे सतत दुधाची उपलब्धता होते व भाकड जनवरांवरचा खर्च वाचतो असा त्यांना अनुभव आहे.
दूध देणारी म्हैस कशी ओळखतात व जनावरांची निगा कशी राखतात
बालपणापासूनच बाळू पाटील जनावरांसोबत राहतात. त्यामुळे दूध देणार्या जनावरांची त्यांना चांगली माहिती आहे. भरपूर दूध देणारी म्हैस कशी ओळखावी, त्यांची कशी देखरेख करावी असा प्रश्न त्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितले की, म्हशींचा मागचा भाग रुंद असावी, मान लांब व बारीक आणि कास मोठी असावी, असे जनावर भरपूर दूध देते. गाय, म्हैस माजावर येण्यासाठी त्यांना मठ खाऊ घालावे. गाय, म्हैस व्याल्यावर जार पडण्यास उशीर होत असल्यास ऐनासिनच्या गोळ्या खाऊ घालतो व पशूवैद्यकांचीही मदत घेतो. जनावरे अधिकाधिक काळ दूध द्यावेत म्हणून भरपूर हिरवा व कोरडा चारा देतो. पशु आहार, मिनरल मिक्श्चर, जंताच्या गोळ्या यांचा वेळोवेळी वापर करतो. पशुपालन करण्याचा अनेक वर्षांचा आणि अनुभव स्वतःला व इतर पशुपालक यांनाही उपयोगी ठरतो, असेही ते म्हणाले.
हाती कौशल्य असूनही नोकरीत सन्मान नव्हता त्यामुळे नोकरी सोडली. दूध व्यवसायातील पूर्वीचा अनुभव कामी आल्याने व्यवसायात दिवसागणिक प्रगती होत आहे. येता काळ दूध उत्पादन व विक्री साठी पोषक असल्याने आम्ही तर त्यात अधिक वाढ करणारच आहोत पण शेतकर्यांनी दुधाळ जनावरे पालन करून या व्यवसायात उतरावे. या व्यवसायात भरपूर कष्ट घेतले तर प्रगती नक्की आहे.
– श्री. बाळू पाटील, मु. पो. वनकोठे ता. एरंडोल (जळगाव) 8855012563