जळगाव/ दिलीप तिवारी,
साधारणपणे २५ वर्षांपूर्वी जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन तथा मोठेभाऊ यांचे पहिले व्यक्तिचित्रण करणारा लेख ‘सकाळ’ मध्ये मी लिहिला होता. त्याचे शिर्षक होते ‘शिखर झालेला माणूस’. त्यानंतरच्या कालखंडात जैन पाईप, जैन ठिबक, जैन टिश्यु कल्चर, जैन सोलर, जैन फार्म फ्रेश, जैन मसाले (व्हॅली स्पाईस) अशा कित्तेक उद्योगांमध्ये मोठ्याभाऊंचे कर्तृत्व उत्तुंग आणि शिखरासारखेच राहिले. मोठेभाऊंच्या पश्चात त्यांच्या व्यक्तिमत्वाची ती उंची जागतिक विक्रम करीत पाईपांचा वापर करीत मोझॅक चित्र रुपातून साकारली आहे. जैन परिवार आणि जैन उद्योग समुहातील अभियंता, कलावंत अशा कल्पक मंडळींनी मोठेभाऊंच्या पाचव्या स्मृतीदिनी आज श्रद्धावंदन करीत मोठेभाऊंना अनोखी आदरांजली वाहिली. मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात सहभागी होता आले.
पाईप उद्योग क्षेत्रातचे पायोनियर मानले गेलेल्या मोठेभाऊंचे कृष्णधवल पाईप वापरून मोझॅक चित्र साकारण्याची मूळ कल्पना जैन इरिगेशनमधील सोलर विभागातील अभियंता प्रदीप भोसले यांची. त्यांनी यापूर्वी असे चित्र साकारण्याचा प्रयत्न अनुभूती इंटरनॅश्नल स्कूल परिसरात केला होता. तेथे मोझॅक चित्र पूर्णतः दृष्टीगोचर होत नसे. अशी चित्रे पाहण्यासाठी प्रेक्षकांना उंचावरील जागा हवी होती. ही बाब लक्षात घेऊन जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी पाईप मोझॅक चित्रासाठी ‘जैन व्हॅली’ परिसरातील ‘भाऊंची सृष्टी’ येथे जागा निश्चित केली. साकारलेले चित्र पाहता येईल, सेल्फी पॉइंट करता येईल अशी व्यवस्था तेथे केली.
पुन्हा एक मिशन म्हणून विक्रमी कमी वेळेत आणि भव्य असे पाईप मोझॅक चित्र निर्माण करायचे ठरले. अशा विक्रमांची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये केली जाते. त्यांच्या संमतीसाठी प्रयत्न झाले. १५० फूट लांब व १२० फूट रुंद असे सुमारे १८ हजार चौरस फूट जागेत काळ्या, पांढऱ्या व श्वेत छटांच्या पाईपांचा वापर करून मोझॅक चित्र निर्मितीचा आराखडा ठरला. अर्थातच जैन उद्योग समुहातील अनेक प्रकल्प हे अशाच धावाधावच्या माहौलमध्ये मूर्त रूप धारण करतात हा अनुभव आहे. त्यानुसार पथके कामाला लागली. उलटा काऊंट डाऊन सुरू झाला.
दिलीप तिवारी, ज्येष्ठ पत्रकार
सलग सात दिवसात (दि. १६ ते २२ फेब्रुवारी) रोज १४ तास काम करीत ९८ तासात पीव्हीसी पाईप वापरून मोझॅक चित्र साकारू लागले. मोझॅकचित्र रचनेसाठी जवळपास १० हजार पाईप लागले. नऊ हजार पीई पाईप (२५ मेट्रीक टन) आणि एक हजार पीव्हीसी (पाच मेट्रीक टन) पाईप वापरण्यात आले. जर हे पाईप एकमेकाला जोडले तर त्याची लांबी २१.९ किलोमीटर होईल. अशा जागतिक विक्रमांची नोंद घेताना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डतर्फे निरीक्षण व नोंदींच्या व्यवस्थेची काळजी घेतली जाते. प्रत्येक कार्यवाहीचे चलचित्रण होते. तशी व्यवस्था करण्यात आली.
गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या वतीने स्वप्नील डांगरीकर (नाशिक) व निखील शुक्ल (पुणे) या महाराष्ट्रातील प्रतिनिधींची नेमणूक निरीक्षणासाठी करण्यात आली. या दोघांनी संपूर्ण ९८ तासांचे कार्य ऑनलाईन पाहिले. याशिवाय गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने जळगाव येथील सुप्रसिद्ध आर्किटेक शिरीष बर्वे यांची सर्व्हेयर म्हणून नेमणूक केली होती. बर्वे यांनी साकारणाऱ्या मोझॅक चित्राचे अवलोकन केले. संपूर्ण तांत्रिक बाजू, मोजणी, साहित्य याची पाहणी करून सत्यता पडताळली केली. आवश्यक ती निरीक्षणे नोंदवून गिनिज वर्ल्ड रेकॉर्डकडे सादर केली. यासोबत प्राचार्य शिल्पा बेंडाळे, चित्रकार सचिन मुसळे हे या जागतिक विक्रमाचे साक्षीदार होते. विक्रमी मोझॅक चित्र साकारल्यानंतर स्वप्नील डांगरीकर यांनी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान केले. आज या मोझॅक चित्राचे लोकार्पण जैन परिवारातील मान्यवरांनी केले.
मोठेभाऊंची मोझॅक चित्र रुपातील अनोखी व भव्य कलाकृती सादर केल्याबद्दल अशोक जैन म्हणाले, ‘कंपनीतील सोलर विभागातील अभियंता प्रदीप भोसले यांच्यासह सहकाऱ्यांनी श्रद्धेय मोठ्याभाऊंच्या जन्मदिनी पाईपांचा वापर करून मोझॅक चित्र अनुभूती इंटरनॅशल स्कूलच्या क्रिडांगणावर साकारले होते. तसे मोझॅक चित्र कायमस्वरूपी जनतेला पाहण्यासाठी उपलब्ध व्हावे म्हणून ‘भाऊंच्या सृष्टी’ त आता साकारले आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डसाठी या कलाकृतीच्या माध्यमातून झालेला जागतिक विक्रम हा आनंददायी आहे. श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या कार्यकर्तृत्वाची आठवण आणि प्रेरणा ही कलाकृती निरंतर देत राहिल.’