नवी दिल्ली – बहुतांश भारतीय आता गायीच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधाला प्राधान्य देत असून बरेचसे शेतकरी दुधाच्या उत्पादनासाठी म्हशींचा वापर करीत आहेत. गायीबरोबरच सर्व म्हशीच्याही दुधामध्ये ए 2 प्रथिने असतात, असे अमूल सहकारी डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक रुपिंदरसिंग सोधी यांनी सांगितले. भारतीय दुधामध्ये आरोग्यदायी ए 1 प्रथिने कमी असल्याची चिंता सोधी यांनी फेटाळून लावली.
ए 2 दुधाच्या मार्केटिंगची टूम न्यूझीलंडहून आली. कारण तिथल्या बाजारपेठेतील मागणी संपली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या उत्पादनास वेगळेपणा आणण्यासाठी ए 2 हा शब्द आणला.
आपण भारतात ए 2 दूधच पितो, असे सोधी यांनी ठामपणे सांगितले. देशातील सर्व म्हशी आणि देशी गायीचे दूध 100 टक्के ए 2 दूध आहे, असे ते म्हणाले. ”प्रिंट”चे मुख्य संपादक शेखर गुप्ता यांच्याशी “ऑफ द कफ” या ऑनलाईन संवादात सोधी बोलत होते.
“सर्व एचएफ (होल्स्टिन-फ्रायसियन) संकरित गायी 50 टक्के ए 2 दूध आणि 50 टक्के ए 1 दूध देतात. त्यामुळे भारतातील 90 टक्के दूध हे ए 2 दूध आहे. त्यामुळे “प्रीमियम ए 2″ मिल्क हे फक्त “मार्केटिंग गिमिक्स” आहे. त्यातून कोणतेही अतिरिक्त“ आरोग्य किंवा पौष्टिक लाभ मिळत नाहीत.
ए 1 आणि ए 2 हे बीटा-केसिनचे दोन प्रकार आहेत. हा केसिनचा उपसमूह म्हणजे दुधात आढळणारा सर्वात मोठा प्रोटीन घटक आहे. सर्व गायी मुळात फक्त ए 2 प्रथिने तयार करतात. तथापि, अनुवांशिक परिवर्तनामुळे कालांतराने, बर्याच गायींनी ए 1 आणि ए 2 प्रथिने तयार करण्यास सुरवात केली, काहींनी केवळ ए 1 तयार केले.