जळगाव : ‘सद्यःस्थितीत शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रामुख्याने मजुर टंचाई व अनियमित पाऊस या प्रमुख दोन समस्यांमुळे अडचणी येत आहेत. परिणामी, शेती करणे कठीण झाले आहे. अशा परिस्थिती केवळ बांबू हे असे एकमेव पीक आहे, की ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता प्राप्त होऊ शकते. बांबू हे शेतकऱ्यांचे बहुउपयोगी पीक असल्याने त्याच्या लागवडीतून शेतकऱ्यांना एकरी 2 ते अडीच लाखांचे शाश्वत उत्पन्न मिळून त्यांचे अर्थकारण बदलू शकते’, असा विश्वास माजी आमदार तथा राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी ‘अॅग्रोवर्ल्ड’ शी बोलताना व्यक्त केला. पाशा पटेल स्वतः उद्घाटक तसेच प्रमुख वक्ते म्हणून या कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत.
पाशा पटेल यांनी सांगितले, की १९२७ साली ब्रिटिशांनी आपल्या देशात बनवलेल्या कायद्यात बांबूला झाड प्रवर्गात टाकले होते. त्यामुळे बांबू तोडणे व त्याची वाहतूक करण्यावर कायद्याने बंदी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१७ साली बांबू ला झाड प्रवर्गातून काढून गवत प्रवर्गात घातल्या मुळे आता बांबूची तोडणी व वाहतूक यावर कोणतेही कायदेशीर बंधन नाही. बांबू शेती पर्यावरणास पुरक असून कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. शेतकऱ्यांना या माध्यमातून जोडधंदा मिळवा म्हणून शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहे. बांबूपासून अनेक वस्तू बनवल्या जातात. याच अंतर्गत बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आता गावोगावी जनजागृती केली जात आहे. बांबूच्या झांडामुळे माती पकडून ठेवण्याची क्षमता वाढते. अतिवृष्टी झाल्यावरही बांबू हे माती अडवून धरण्याचे काम करते. सध्या तर वातावरणात प्रचंड बदलाव होत असल्याने अशा परिस्थितीत एकमेव बांबू हे असे पीक आहे, की जे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते.
बांबू म्हणजे कल्पवृक्ष
ज्याप्रमाणे कल्पवृक्ष हा माणसाच्या इच्छा पूर्ण करणारा वृक्ष म्हणून ओळखला जातो, त्याप्रमाणे बांबूचे आहे. बांबूमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे बांबूला खरे तर बांबू म्हणण्याऐवजी कल्पवृक्षच म्हटले पाहिजे, असे सांगून पाशा पटेल यांनी सांगितले, की आता तर जमिनीच्या पोटातून डिझेल, पेट्रोल व कोळसा काढायचा नसल्याने उर्जा तयार करण्यासाठी एकमेव बांबू हे पीकच वरदान ठरणार आहे. आसाम राज्यात बांबूपासून दररोज ५० हजार लिटर इथेनॉल तयार करणारी फॅक्टरी साधारणतः ऑगस्टमध्ये सुरु होत आहे. अशा फॅक्टरी संपूर्ण देशभरात ठिकठिकाणी सुरु झाल्यानंतर बांबूला प्रचंड मागणी राहील. बांबूपासून कपडा, तेल, फरशी, लोणचे, मुरब्बा, फर्निचर, घड्याळ, चष्म्याच्या फ्रेम, टूथब्रश, चप्पल, तांदूळ एवढेच नव्हे तर हेलीकॉप्टर व त्यासाठी लागणारे तेलही तयार होऊ शकते. नगर जिल्ह्यात तर बांबूपासून घरे देखील बांधलेली आहेत. म्हणूनच बांबू हे शेतकऱ्यांच्या जीवनात सुबत्ता आणणारा कल्पवृक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.
उसापेक्षा बांबू सरस
पाशा पटेल यांनी बांबूचे आर्थिक गणित मांडताना सांगितले, की एक हेक्टर उसाचे पीक घेण्यासाठी २ कोटी लीटर पाणी लागते आणि एक टन उसापासून ८० लीटर इथेनॉल तयार होते. तर एक हेक्टर बांबूसाठी केवळ २० लाख लीटर पाणी लागते आणि एक टन बांबूपासून तब्बल ४०० लीटर इथेनॉल तयार होते. हे गणित लक्षात लक्षात घेतले तर बांबूची उपयोगिता सहज लक्षात येईल असे सांगून त्यांनी शेतकऱ्यांनी बांबूची शेती करावी असे सांगितले.
Comments 2